(Photo-X)
संपादकीय

विजयाबाईंचा लाडका ‘नान्या’ गेला...

नानाच्या करिअरमध्ये विजय तेंडुलकर, विजया मेहता, अरविंद-सुलभा देशपांडे आदींचा वाटा अतिशय मोलाचा मानला जातो. नानाला खऱ्या अर्थाने आपल्या पंखाखाली घेऊन घडवलं, आकार दिला तो अर्थातच विजयाबाईंनी. त्यांच्या स्कूलमधला हा विद्यार्थी त्यांचा प्रचंड लाडका.

नवशक्ती Web Desk

विशेष

अजितेम जोशी

नानाच्या करिअरमध्ये विजय तेंडुलकर, विजया मेहता, अरविंद-सुलभा देशपांडे आदींचा वाटा अतिशय मोलाचा मानला जातो. नानाला खऱ्या अर्थाने आपल्या पंखाखाली घेऊन घडवलं, आकार दिला तो अर्थातच विजयाबाईंनी. त्यांच्या स्कूलमधला हा विद्यार्थी त्यांचा प्रचंड लाडका.

गुरुवारी सकाळी सकाळी उन्मेष नाट्यसंस्थेच्या ग्रुपवर कोणी तरी दबक्या स्वरात विचारलं, "नानाची बातमी खरी आहे का?". काही क्षण सन्नाटा, त्या ग्रुपवर आणि माझ्या मनातही... त्यानंतर गोव्याला नाना गेल्याची बातमी भसाभस सर्वत्र व्हायरल झाली. अनेकांच्या प्रतिक्रिया येऊ लागल्या. नाना पाटेकर गेला. विजया मेहता यांच्या रंगायन शाळेतला विजयाबाईंचा तगडा, गुणी कलाकार विद्यार्थी गेला. अगोदर विक्रम गोखले, मग स्वतः विजयाबाई आणि आता बाईंचा लाडका 'नान्या' गेला.

खरं तर नाना पाटेकर अवघ्या ७५ व्या वर्षी असा अवेळी गेल्याची बातमी खरोखरच धक्कादायक. नाट्य-चित्रपटसृष्टीला नानाच्या जाण्याचा प्रचंड शॉक बसलाय. नानावर लिहायचं. पण काय? कसं? किती? फार अवघड, फार कठीण. कारण जवळ जवळ गेली पन्नास वर्षे तरी नाना पाटेकर नावाच्या अवलियाने माझ्यासारख्या अनेक रंगकर्मीयांचं जग व्यापलेलं. त्याकाळातली अग्रगण्य आविष्कार ही नाट्यसंस्था - अरविंद - सुलभा देशपांडे - काकडे काका - प्रायोगिक रंगभूमीचा केंद्रबिंदू आधारवड असलेली छबिलदास नाट्यचळवळ, 'आला अडाण्याचा गाडा' ते विजय तेंडुलकर यांनी लिहिलेल्या, अरविंद देशपांडे यांनी दिग्दर्शित केलेल्या, 'पाहिजे जातीचे' या नाटकातील नानाच्या रांगड्या, मस्तवाल, टेरर 'बबन्या'शी जोडल्या गेलेल्या आठवणी. अनेकांचा नाना पाटेकर नावाशी बांधलेला एक मजबूत धागा. नाना पाटेकर व्यक्ती एक पण त्याची रूपं अनेक. माणूस एक पण त्याचे रंग अनेक.

नानाची कारकीर्द अथांग, त्याच्या वागण्या- बोलण्यासह एकूणच व्यक्तिमत्त्वासह. विजयाबाईंची रंगायन, अरविंद-पप्पा देशपांडेची आविष्कार संस्था प्रायोगिक, हौशी नाटकांपासून सुरू केलेला प्रवास. नानाने तेव्हा पुण्यात जाऊन स्पर्धेचं भाऊ मुरारराव हे नाटक मोहन गोखलेंसोबत केलं होतं. नानाने छबिलदास ते शिवाजी नाट्य मंदिर-व्यावसायिक रंगभूमी असा प्रवास सुरू केला तो माऊली प्रॉडक्शनच्या निर्माता उदय धुरतच्या हमीदाबाईची कोठी नाटकापासून. तगडी मल्टीस्टारकास्ट असलेल्या नाटकापासून. तेव्हा छबीलदासहून रस्ता क्रॉस करून समोरच्या शिवाजी मंदिरला जाणाऱ्याचं हौशी - प्रायोगिकवाल्यांना भारी कौतुक वाटायचं. जणू आपल्या कुटुंबातील एकजण जिंकल्याची सर्वत्र भावना असायची. तत्पूर्वी पाहिजे जातीचे या नाटकाचे काही प्रयोग व्यावसायिकला झाले होते. त्यानंतर मोहन शेठ तोंडवळकर यांच्या कलावैभव संस्थेच्या महासागर या नाटकामुळे. जयवंत दळवी लिखित - विजया मेहता दिग्दर्शित महासागरमध्ये विमा एजंट दिगंबर ही नायकाची भूमिका साकारून नाना खऱ्या अर्थाने हिरो झाला.

जयवंत दळवीच्या अथांग कादंबरीवरील महासागरमध्ये खरं तर डॉ. काशिनाथ घाणेकर हे दिगंबरची नायकाची भूमिका करणार होते. पण काही करणास्तव ते झालं नाही आणि मित्रवर्य सुरेश भागवतनं सुचवल्यानुसार नाना पाटेकर नावाचा टपोरी बबन्या साक्षात सभ्य, संसारातील समस्या, अडचणी यांनी गांजलेला-रंजलेला त्रस्त पण साधा, शांत, प्रेमळ असा दिगंबर झाला आणि नाना पाटेकरच्या रूपात मराठी व्यावसायिक रंगभूमीला नव्या पिढीचा नवा नायक लाभला. नाना जरी हिरो असला तरी टिपिकल फिल्मी हिरो नव्हता, तर तो मध्यमवर्गीय तरुणांचा वेगळा प्रतिनिधी होता.

खरं तर नानाच्या करिअरमध्ये विजय तेंडुलकर, विजया मेहता, अरविंद-सुलभा देशपांडे, मोहन तोंडवळकर, जयवंत दळवी यांचा वाटा अतिशय मोलाचा मानला जातो. नानाला खऱ्या अर्थाने आपल्या पंखाखाली घेऊन घडवलं, आकार दिला तो अर्थातच विजयाबाईंनी. त्यांच्या स्कूलमधला हा विद्यार्थी त्यांचा प्रचंड लाडका. बाईंनी आपल्या या नाटकावर, भूमिकेवर अपार प्रेम करणाऱ्या सणकी, फटकळ, स्पष्टवक्ता असूनही प्रचंड मनस्वी, प्रेमळ, संवेदनशील आणि जबरदस्त अभिनय क्षमता असलेल्या, जात्यातच प्रगल्भ, बुद्धिमान, चतुर, हुशार स्टुडंटवर डोळे झाकून विश्वास दाखवला आणि अर्थातच नाना नावाच्या किमयागाराने आपल्या गुरूला प्रत्येक वेळेस चोख, खणखणीत, तगडा परफॉर्मन्स देऊन सव्याज गुरुदक्षिणा देऊन गुरूऋण फेडलं.

जयवंत दळवी-विजया मेहता-नाना पाटेकर- मोहन तोंडवळकर या चौरंगी युतीने मराठी रंगभूमीला नुसती भरमसाट प्रयोग होणारी, प्रचंड यशस्वी, धंदा करणारी, निर्मात्याला बक्कळ पैसा कमावून देणारी व्यावसायिक नाटकं दिली नाहीत, तर मराठी नाटकाला अत्यंत महत्त्वाचे, मोलाचे वळण देणारी माईलस्टोन म्हणून ओळखली जाणारी नाटकं दिली. या चौघांनी पुढलं नाटक दिलं ते हिरो नानाला मराठी रंगभूमीवरचा नवा बुकिंग सम्राट-सुपरस्टार म्हणून ओळख देणारं नाटक म्हणजे पुरुष.

जयवंत दळवीच्या या नाटकात अंबिका विरुद्ध गुलाबराव या दोघांच्या जबरदस्त लढ्यामुळे या नाटकाची सगळीकडे एकच वेगळी क्रेझ निर्माण झाली आणि नाना पाटेकर नावाचा नवा भारदस्त जमाना सुरू झाला.

विजयाबाईंच्या शाळेतून सुरेश भागवत, दिलीप कोल्हटकर, सुहास जोशी, मंगेश कुलकर्णी, नीना कुलकर्णी, भारती आचरेकर, नाना पाटेकर असे कित्येक एकापेक्षा एक भारी कलाकार इंडस्ट्रीला लाभले. नानाला विजयाबाईंनी घडवलं, वाढवलं, मोठं केलं यात शंकाच नाही पण नाट्यसृष्टीसारख्या बेभरवश्याच्या धंद्यात नानावर डाव लावून तो यशस्वीपणे जिंकणाऱ्या कलावैभवाच्या मोहनशेठ तोंडवळकर यांचाही तेवढाच महत्त्वाचा, लाख मोलाचा वाटा होता. स्वतः नाना हे नेहमीच मान्य करायचा. मोहन शेठ म्हणजे नानाचा जीव की प्राण.

संपूर्ण नाट्यसृष्टी जिंकणारा, मराठी चित्रपटसृष्टी गाजवणारा आणि बॉलिवूडमधल्या पंजाबी-मुस्लिम अशा अमराठी हिरोंच्या मक्तेदारीला सुरुंग लावून ठेसात, नडून, नमवून, वेळप्रसंगी प्रहार करून, आपल्या तालावर नाचवून आपला विजयी झेंडा ताठमानेने, स्वाभिमानाने, मराठी बाणा जपून प्रदीर्घ राज्य करणारा यशवंत नाना आणि त्याचा दबदबा, दरारा, महिमा हा त्या नायगरा फॉलसारखा.

मुरुड जंजिरा इथला. हा नाना पाटेकर ओरिजनल नाना पारकर. नानाच्या आईच्या साइडचे काही लोक नंबरकारी, भाई. पण आईवडिलांनी नानाला वेगळ्या वाटेवर नेलं. सत्तरच्या दशकात नाना जेजे स्कूल ऑफ आर्ट्समध्ये शिकत असताना नाटकबिटक न करता टगेगिरी, उनाडक्या करायचा, तेव्हा प्राध्यापक असलेल्या अभिनेता-दिग्दर्शक रमाकांत देशपांडे (होय, सर्वांचे लाडके पु. ल. देशपांडे यांचे धाकटे बंधू) यांनी सुरेश भागवत, मंगेश कुलकर्णी आणि नाना पारकर (पाटेकर) यांना पकडून तेव्हा होणाऱ्या भवन्सच्या स्पर्धेत ओढलं. एवढंच नाही, तर रमाकांत देशपांडे यांच्यामुळेच भागवत, पाटेकर, कुलकर्णी, विजया मेहता यांच्या शाळेत सहभागी झाले.

एका वर्षी माझ्या शाळेत असलेल्या मुलाला नानाचा गणपती दाखवायला नानाच्या घरी घेऊन गेलो असताना अवतीभवती गर्दी असतानाही नानानं पोटात गुद्दा मारून जवळ घेणं, मुलाचे लाड करणं कसं विसरू शकतो?

आमच्या दादरच्या शांताराम निवास चाळीतल्या गच्चीवर रिहर्सलला येणाऱ्या नानाला कसं विसरू? किंवा मोहन शेठच्या घरच्या लग्नात बॉलिवूडमध्ये स्टार झालेल्या नानाला लांबूनच मी बघत असताना पूर्वीसारखं नानानं जवळ बोलावून पोटात गुद्दा मारून माझा उद्धार करणारा नाना किंवा नाशिकच्या नाट्यसंमेलनात एका मोठ्या दैनिकाच्या तेव्हाच्या मोठ्या संपादकांनी माझ्याविरुद्ध तक्रार केल्यावर त्यांना माझ्याबद्दल स्पष्टपणे सांगणारा नाना.

तेव्हा नाना कधीही भेटायचा, विचारपूस करायचा अर्थात त्याच्या चारदोन शिव्या मिळणं म्हणजे वेगळा आनंद. नानाच्या घरी त्यावेळी जाणं, त्याच्या आईला भेटणं, तिथे नाशिकच्या अफाट, प्रगल्भ, जबरदस्त अभिनेत्री असलेल्या, युनियन बँकेत ऑफिसर म्हणून काम करणाऱ्या आणि अर्थातच नानाबरोबर लग्न करणाऱ्या नीलकांती हलदुलेला भेटणं असे कितीतरी छोटे, पण मनात जपलेले नानामय प्रसंग. भले नानाच्या घट्ट आतल्या परीघातला मी जवळचा नसेनही, जीवलग सोडा, साधा मित्रही मी नसेनही, कित्येक वर्षे आम्ही भेटलो, बोललोही नसू. तरीही होय, तरीही नाना नेहमीच मला आपलाच, हक्काचा वाटत होता, वाटायचा आणि पुढेही वाटत राहील.

खरं तर या वर्षी २७ मार्च २०२६ रोजी ज्येष्ठ दिग्दर्शक पद्मभूषण राजदत्त यांच्या ९३ व्या वाढदिवसानिमित्त आणि त्यांच्या 'मधुचंद्र' या त्यांनी दिग्दर्शक म्हणून केलेल्या पहिल्या चित्रपटाला ६० वर्षे पूर्ण झाल्याबद्दल राजदत्त यांचा विशेष सन्मान करण्याचा कार्यक्रम मी आयोजित केला होता. त्या कार्यक्रमाला नानाने हजर राहावे, अशी इच्छा होती. राजदत्त हे चित्रपट क्षेत्रातले नानाचे गुरू, ते नानावर निरतिशय प्रेम करायचे आणि नानाही त्यांना खूप मानायचा, त्यांच्यावर प्रेम करायचा. त्या सोहळ्याला त्याने उपस्थित राहावं, भेटावं, गप्पा माराव्यात असं खूप वाटत होतं, नानाचा मुलगा मल्हार यानेही खूप प्रयत्न केले, पण... नानाला शूटिंगमुळे नाही जमलं. नाना तेव्हा भेटला असता तर...

आजचे राशिभविष्य, ९ ऑक्टोबर २०२६ : जाणून घ्या तुमच्या दिवसाचे ग्रहसंकेत

सत्तेचा अहंकार आणि जनतेचा आक्रोश

Cardiac Arrest : छातीत दुखतंय? अजिबात वेळ घालवू नका; वाचा तज्ज्ञांचा सल्ला

Heart Health : रोजच्या आहारात 'या' फळांचा समावेश करा; हृदयाच्या आरोग्यासाठी ठरतील फायदेशीर

Mumbai : मुलुंडमध्ये बांधकामाधीन इमारतीच्या आवारात भीषण आग; ७ गॅस सिलिंडरचे स्फोट, परिसरात धुराचे लोट, Video व्हायरल