विवादे नैव कर्तव्यं प्रधानैः सह कर्हिचित् 'एआय'ने बनविलेली प्रतिमा
संपादकीय

विवादे नैव कर्तव्यं प्रधानैः सह कर्हिचित्

आपल्या पक्षाच्या काळात अतिरेक्यांच्या दहशतीमुळे लाल चौकात तिरंगा फडकवला जात नव्हता, याची जाणीव युवराज राहुल गांधींना नक्कीच असेल. पण मोदी सरकारमुळे काश्मीर खोरे दहशतवादमुक्त झाले आहे हे मान्य करण्याचा मोठेपणा राहुल गांधींना दाखवता आला नाही.

नवशक्ती Web Desk

मत आमचेही

केशव उपाध्ये

आपल्या पक्षाच्या काळात अतिरेक्यांच्या दहशतीमुळे लाल चौकात तिरंगा फडकवला जात नव्हता, याची जाणीव युवराज राहुल गांधींना नक्कीच असेल. पण मोदी सरकारमुळे काश्मीर खोरे दहशतवादमुक्त झाले आहे हे मान्य करण्याचा मोठेपणा राहुल गांधींना दाखवता आला नाही.

चाणक्य नीतीतील हे अवतरण आहे. चाणक्य नीतीनुसार विनाकारण विरोध करणाऱ्या लोकांशी कधीही वाद घालू नये. त्यांच्याशी वाद घातल्याने तुमचा वेळ आणि मानसिक शांतता दोन्ही नष्ट होते. चाणक्य नीतीच्या या अवतरणाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गेल्या १२ वर्षांत अत्यंत निष्ठेने पालन केले आहे. गेल्या १२ वर्षांत त्यांच्यावर विरोधकांनी अभद्र, गलिच्छ अशा भाषांच्या सर्व प्रकारात टीका केली. पण असल्या टीकेला नरेंद्र मोदी यांनी कधीच भीक घातली नाही. विकसित आणि आत्मनिर्भर भारताच्या उभारणीसाठी त्यांनी निर्धारपूर्वक वाटचाल सुरू आहे. मोदी सरकारच्या अलीकडील काही निर्णयांकडे दृष्टिक्षेप टाकला तर आपण समृद्ध राष्ट्र बनण्याच्या दिशेने कसे मार्गक्रमण करीत आहोत, याची कल्पना येऊ शकेल. रेल्वेमंत्री अश्विन वैष्णव यांनी अहमदाबाद-मुंबई बुलेट ट्रेनच्या पाठोपाठ हैदराबाद-मुंबई बुलेट ट्रेन प्रकल्पाची घोषणा केली. या प्रकल्पामुळे मुंबई-पुणे अंतर अवघ्या ५० मिनिटांत पार करता येणार आहे. हा प्रकल्प प्रत्यक्षात आल्यावर मुंबई-हैदराबाद प्रवास अवघ्या सव्वातीन तासांत पूर्ण होईल. सध्या या प्रवासाला किमान १० तास लागतात. २०१४ पूर्वी बुलेट ट्रेनसारख्या प्रकल्पांची भारतातील जनतेने कल्पनाही केली नव्हती. मुंबई-हैदराबाद बुलेट ट्रेनची माहिती देताना रेल्वे मंत्री वैष्णव यांनी मालवाहतुकीसाठी उभारण्यात आलेल्या पूर्व-पश्चिम स्वतंत्र रेल्वे मार्ग प्रकल्पाचे काम सुरू झाल्याची माहितीही दिली. स्वतंत्र रेल्वेमार्ग असल्याने औद्योगिक उत्पादने, शेतमाल तसेच अन्य वस्तूंची वाहतूक वेगाने होऊ शकणार आहे. सुरत-दानकुनी (पश्चिम बंगाल) असा २ हजार ५२ किलोमीटर लांबीचा हा मार्ग पश्चिम बंगाल, ओदिशा, छत्तीसगड, मध्य प्रदेश, महाराष्ट्र, गुजरात या सहा राज्यांना जोडणारा आहे. हा फ्रिट कॉरिडॉर हा देशाच्या विकासाच्या वाटचालीतील अभिमानाचा प्रकल्प असणार आहे. राहुल गांधींसारखे विरोधक पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना कोंडीत पकडण्यासाठी सातत्याने प्रयत्न करीत असताना, त्यासाठी कोणत्याही थराला जात असताना पंतप्रधान मोदी अत्यंत शांतपणे देशाच्या विकासाचे एक एक प्रकल्प मार्गी लावत आहेत. पंतप्रधानांनी अलीकडेच वीस स्पेस स्टार्टअप्सच्या सीईओ आणि संस्थापकांशी संवाद साधला. अंतराळ संशोधन क्षेत्र खासगी क्षेत्रासाठी खुले करण्याचा निर्णय मोदी सरकारने घेतला आहे. त्याचा फायदा घेत हैदराबाद येथील स्कायरूट एरोस्पेस या भारतीय खासगी अंतराळ कंपनीने विकसित केलेले विक्रम-१ या देशातील पहिले खासगी ऑर्बिटल रॉकेटचे श्रीहरिकोटा येथील सतीश धवन अंतराळ केंद्रावरून अलीकडेच यशस्वीरीत्या अवकाशात प्रक्षेपण झाले आहे. भारतीय तरुणांनी स्वतः तयार केलेल्या नव्या रॉकेटच्या साह्याने देशी-विदेशी उपग्रह अवकाशात उड्डाण घेणार आहेत. संरक्षण संशोधन आणि विकास संस्थेने (डीआरडीओ) लडाखमधील न्योमा येथे जगातील सर्वात उंचावरील ड्रॉप झोनमध्ये ‘मिलिटरी कॉम्बॅट पॅराशूट सिस्टीम’ची (एमसीपीएस) २२,००० फुटांवरून यशस्वी चाचणी घेतली आहे. अत्यंत प्रतिकूल हवामानात पार पडलेल्या या चाचणीमुळे भारताच्या स्वदेशी संरक्षण क्षमतेत आणखी एक मानाचा तुरा रोवला गेला आहे. भारतीय हवाईदलाने नुकताच न्योमा येथे लढाऊ विमानांच्या संचलनासाठी जगातील सर्वात उंचावरील हवाईतळ सुरू केला आहे. यापूर्वीही न्योमा येथे सैन्य, वाहने आणि युद्धसामग्री पॅरा-ड्रॉप करण्याच्या अनेक मोहिमा पार पडल्या आहेत. या सर्व घटना प्रत्येक भारतीयाची मान उंचावणाऱ्या ठरल्या आहेत. एकीकडे अशी घोडदौड चालू असताना देशाच्या अर्थव्यवस्थेने इराण-अमेरिका युद्धासारख्या अनेक संकटांवर मात करत, अडथळे दूर करत ७.०८ टक्क्यांचा विकास दर गाठला आहे. होर्मुझ खाडी बंद झाल्यामुळे देशाच्या इंधन पुरवठ्याची साखळी संकटात आली होती. इंधनाचे दर आकाशाला भिडण्याचा धोका होता. मात्र मोदी सरकारने आपले राजकीय आणि परराष्ट्र संबंधाचे कौशल्य पणाला लावल्यामुळे या संकटाचा देशाला कमीत कमी फटका बसला. अलीकडेच भारत-युरोपीय महासंघ मुक्त व्यापार करार झाल्यामुळे भारताची अर्थव्यवस्था आणखी मजबूत होणार आहे. युरोपीय महासंघातले सर्व २७ देश या कराराच्या बाजूने आहेत आणि आवश्यक औपचारिक बाबी पूर्ण करून हा करार लवकरात लवकर अंमलात आणण्यास उत्सुक आहेत. सेमीकंडक्टर उद्योगाला प्रोत्साहन देण्यासाठी सुरू असलेल्या भारताच्या महत्त्वाकांक्षी कार्यक्रमाची आंतरराष्ट्रीय स्तरावर प्रशंसा होत आहे. सेमीकॉन इंडियाची पहिली आवृत्ती जगभरातील गुंतवणूकदारांच्या सहभागातून यशस्वी झाली होती, तर दुसरी आवृत्ती, सेमीकॉन इंडिया २.०, नुकतीच १४ अब्ज डॉलरच्या गुंतवणुकीसह सुरू करण्यात आली आहे. या संपूर्ण मोहिमेमुळे भारतातील सेमीकंडक्टर क्षेत्रात सुमारे ७० अब्ज डॉलरच्या गुंतवणुकीला चालना मिळेल. ‘जंतरमंतर’वर गोंधळ घालण्यात धन्यता मानणाऱ्या, संसद बंद पाडण्यात पुरुषार्थ मानणाऱ्या राहुल गांधींना आपल्या देशाची ही प्रगतीमय वाटचाल ठाऊक नाही असे म्हणता येणार नाही. याच राहुल गांधींनी २९ जानेवारी २०२३ रोजी श्रीनगरच्या लाल चौकात जाऊन तेथे ध्वजारोहण केले होते. त्याची छायाचित्रेही प्रसिद्ध केली नव्हती. आपल्या पक्षाच्या काळात अतिरेक्यांच्या दहशतीमुळे लाल चौकात तिरंगा फडकवला जात नव्हता, याची जाणीव युवराज राहुल गांधींना नक्कीच असेल. पण मोदी सरकारमुळे काश्मीर खोरे दहशतवादमुक्त झाले आहे हे मान्य करण्याचा मोठेपणा राहुल गांधींना दाखवता आला नाही. अशा विरोधकांकडे दुर्लक्ष करीत देशाला प्रगतीची नवनवी शिखरे गाठून देणाऱ्या पंतप्रधान नरेंद्र मोदींचे मोठेपण आणखी उठून दिसते. विरोधकांच्या टीकेला उत्तर देत बसण्यापेक्षा आपल्या कृतीतून देशाची प्रगती साधण्याचा मार्ग त्यांनी पत्करला आहे.

प्रदेश उपाध्यक्ष, भाजप

आजचे राशिभविष्य, ८ सप्टेंबर २०२६ : जाणून घ्या तुमच्या दिवसाचे ग्रहसंकेत

सणासुदीसाठी खास मेजवानी! गुलाबाचा सुगंध, बदामाची चव अन् खिरीचा गोडवा; नक्की ट्राय करा ही सोपी रेसिपी

Air India Express : ३६,००० फूट उंचीवर तांत्रिक बिघाड; अबुधाबीला जाणारे विमान कोचीला परतले, नेमकं काय घडलं?

"कचरा का टाकला?" म्हणणाऱ्या पेट्रोल पंप कर्मचाऱ्याला मारहाण; विरारमध्ये महिला गोविंदा पथकाचा राडा, Video

Delhi Building Collapse : क्षणार्धात इमारत जमीनदोस्त; मृतांचा आकडा वाढला, थरकाप उडवणारा CCTV व्हिडीओ समोर