संपादकीय

शिक्षणातून वैज्ञानिक दृष्टिकोन

मुलांमध्ये वैज्ञानिक दृष्टिकोन रुजवणे हे शिक्षणाचे प्राथमिक उद्दिष्ट असले पाहिजे. कारण वैज्ञानिक दृष्टिकोनाअभावी समाजात केवळ अंधश्रद्धा ‌‌वाढतात असे नाही, तर कोणत्याही गोष्टीकडे आपल्याला शास्त्रशुद्ध रीतीने, वैज्ञानिक पद्धतीने पाहता येत नाही.

नवशक्ती Web Desk

भ्रम-विभ्रम

अनिल चव्हाण

मुलांमध्ये वैज्ञानिक दृष्टिकोन रुजवणे हे शिक्षणाचे प्राथमिक उद्दिष्ट असले पाहिजे. कारण वैज्ञानिक दृष्टिकोनाअभावी समाजात केवळ अंधश्रद्धा ‌‌वाढतात असे नाही, तर कोणत्याही गोष्टीकडे आपल्याला शास्त्रशुद्ध रीतीने, वैज्ञानिक पद्धतीने पाहता येत नाही.

वैज्ञानिक दृष्टिकोन विकसित करणे’ हे कर्तव्य असल्याचे भारतीय संविधानाने नागरिकांना सांगितले आहे. कलम ५१ क सांगते, “विज्ञाननिष्ठ दृष्टिकोन, मानवतावाद आणि शोधक बुद्धी व सुधारणावाद यांचा विकास करणे, हे नागरिकांचे मूलभूत कर्तव्य आहे.”

संविधानाला अभिप्रेत असणारा सुजाण नागरिक घडवणे, हे शिक्षणाचे काम आहे. त्यामुळे ‘वैज्ञानिक दृष्टिकोन विकसित करणे’ हे उद्दिष्ट शिक्षणामध्येही ठेवण्यात आले आहे.

दृष्टिकोन म्हणजे काय?

व्यक्तीचे वर्तन नियंत्रित करणारे तत्त्वज्ञान म्हणजे तिचा दृष्टिकोन होय. दृष्टिकोनामुळे व्यक्तीचे वर्तन नियंत्रित होते; वर्तन ठरते. समतावादी तत्त्वज्ञानातून स्त्रियांकडे पाहण्याचा समतावादी दृष्टिकोन तयार होईल. अशी व्यक्ती स्त्रियांचा आदर करेल, विधवा विवाहाला प्रोत्साहन देईल. वैज्ञानिक दृष्टिकोन तयार झालेली व्यक्ती मांजर आडवे गेले म्हणून पाच पावले मागे जाणार नाही. म्हणजेच ‘दृष्टिकोन’ हा वर्तनातून समजतो. ‘दृष्टिकोन’ हा जीवनाचा भाग असतो. योग्य दृष्टिकोन व्यक्तीच्या जीवनाला दिशा देतो, तर चुकीचा दृष्टिकोन जीवनाची दशा करतो!

लहानपणापासून आलेले अनुभव,आई-वडिलांची-समाजाची शिकवण यांतून दृष्टिकोन घडत जातो. ‘चांगला आणि सुजाण समाज घडवायचा असेल, तर व्यक्तीचा दृष्टिकोन चांगला असला पाहिजे’ या विचारातून संविधानामध्ये ‘वैज्ञानिक दृष्टिकोन’ हे कर्तव्य सांगितले आहे.

‘वैज्ञानिक दृष्टिकोन विकसित करणे’ हे विज्ञान विषयातील महत्त्वाचे उद्दिष्ट आहे. त्याबरोबरच एकूण शिक्षण व्यवस्थेमध्येही या उद्दिष्टाला महत्त्वाचे स्थान आहे. ‘वैज्ञानिक दृष्टिकोन निर्माण झालेल्या व्यक्तीमध्ये कोणते वर्तन-बदल अपेक्षित आहेत’ याची नोंद शिक्षणशास्त्राच्या पुस्तकातून केलेली आहे.

वैज्ञानिक दृष्टिकोन निर्माण झालेली व्यक्ती..

  • निष्कर्ष काढताना, मत बनवताना पूर्ण माहिती घेईल; अपुऱ्या माहितीवरून निष्कर्ष काढणार नाही. उदाहरणार्थ,“पाप वाढले, त्यामुळे निसर्गचक्र बदलले, पाऊस कधीही पडतो आहे.” किंवा “मुली शिकू लागल्या, म्हणून पाऊस कमी झाला.” अशी विधाने करणार नाही.

  • भोळसर समजुतीवर विश्वास ठेवणार नाही व अशा समजुती तपासेल. उदाहरणार्थ, “मांजर आडवे गेले म्हणून काम होत नाही” किंवा “तीन तिघाडा काम बिघाडा” इत्यादी.

  • विज्ञानवादी व्यक्ती पूर्वग्रहदूषित दृष्टी न ठेवता नवीन कल्पनांचा विचार करेल. पृथ्वीभोवती सूर्य, तारे आणि ग्रह फिरतात, असा एके काळी समज होता. दुर्बिणीतून पाहिल्यावर पृथ्वी सूर्याभोवती फिरत असल्याचे लक्षात आले, तेव्हा शास्त्रज्ञांनी पूर्वग्रह बाजूला ठेवले आणि सत्य सांगितले, पण इतरांना ते पटले नाही.

  • एखादी गोष्ट प्रयोगांन्ती सिद्ध झाली, तर वैज्ञानिक निष्ठा असलेली व्यक्ती आपली मते बदलते; प्रयोगाने सिद्ध झालेल्या गोष्टींवरच विश्वास ठेवते. उदा. साप चावल्यावर विष उतरवण्यासाठी मंत्रतंत्रांचा उपयोग होत नाही; योग्य इंजेक्शन घ्यावे लागते. कुत्रे चावल्यावर अँटी रेबीज इंजेक्शन घेणे आवश्यक आहे… अशा गोष्टी प्रयोगाने लक्षात आल्या. त्याप्रमाणे समाज बदलत आला.

  • पुरेसा आधार नसेल, तर थोरांचे मतही स्वीकारू नये, असे वैज्ञानिक दृष्टी असलेल्या व्यक्तीचे मत असते. उदा. सिनेनट किंवा सुप्रसिद्ध क्रिकेटीयर यांना समाजात श्रेष्ठ समजले जाते. खूप वेळा ते अतिरंजित जाहिराती करतात. त्यांना सर्वसामान्य लोक भुलतात. ‘मोठ्या माणसाचे मतसुद्धा तपासून घेतले पाहिजे’ अशी सवय लागली, तर लोक फसणार नाहीत. एक योगीबाबा, ‘योगाने कॅन्सर बरा करतो, ब्लड प्रेशर किंवा डायबिटीस बरा करतो’ असे दावे करतात. हे दावे तपासले पाहिजेत.

  • वैज्ञानिक दृष्टिकोन घटनेचा अभ्यास करताना कार्यकारणभाव तपासतो. उदा. ‘पुत्रलाभ झाला आणि नोकरीत बढती मिळाली’ असा शुभशकुन किंवा ‘नोकरीत अडचण आली’ असा अपशकुन मानला जातो. कार्यकारणभाव तपासला, तर असे होणार नाही. ‘मुलाचे लग्न झाले आणि सासू आजारी पडली’ किंवा ‘शेती पिकली नाही’ असे झाल्यास नववधूला ‘पांढऱ्या पायाची’ म्हणून हिणवले जात असे. ‘आजारी पडण्याचे कारण रोगजंतू आहेत’ किंवा ‘शेती पिकण्यामागे बी-बियाणे, खते, आणि पाऊस-पाणी या गोष्टी कारणीभूत आहेत’ हे समजून घेतल्यास नववधूबाबतची चुकीची विधाने होणार नाहीत.

  • विज्ञानवादी व्यक्ती वैज्ञानिक पद्धतीने मिळालेल्या निष्कर्षावरच विश्वास ठेवते. निरीक्षण करणे, त्यावरून काही आडाखे बांधणे, त्यानुसार प्रयोगाचे नियोजन करणे, नियंत्रित परिस्थितीत प्रयोग करून आपले निष्कर्ष तपासणे, पुन्हा पुन्हा प्रयोग करून नियम शोधणे, त्यांचे सार्वत्रिकीकरण करणे आणि पुन्हा पुन्हा तपासत राहणे ही वैज्ञानिक पद्धती आहे.

  • विज्ञानवादी व्यक्ती आपली मते वारंवार तपासते आणि चूक आढळल्यास बदल करते. उदा. शिक्षणशास्त्र, आरोग्यशास्त्र, शेतीशास्त्र इत्यादींमध्ये नवे संशोधन होत आहे. पूर्वीचे निष्कर्ष पुन्हा पुन्हा तपासले जातात आणि त्यामध्ये काही चूक आढळली, तर ते बदलले जातात. कोरोना रुग्णांसाठी सुरुवातीला रेमंडेसीवर औषध मोठ्या प्रमाणात वापरले गेले, पण ते वापरणे योग्य नसल्याचे लक्षात आल्याबरोबर जागतिक आरोग्य संघटनेने त्यावर बंदी घातली आणि चूक सुधारली.

  • विज्ञानवादी व्यक्ती ‘माझेच खरे’ असा हेका धरत नाही. ‘खरे ते माझे’ असे म्हणते. उदा. आपण सांगितलेल्या मुद्द्याचा काही जण आग्रह धरतात. नंतर त्यांच्या लक्षात येते की, ‘आपण सांगितले ते चूक होते’, पण तरी ते आग्रह सोडत नाहीत. पण विज्ञानवादी व्यक्ती आपली चूक मान्य करते.

  • कितीही मोठ्या व्यक्तीने सांगितले, ग्रंथात लिहिले आहे, वृत्तपत्रात छापले आहे, असे असले तरी विज्ञानवादी व्यक्ती अशी मते तपासूनच स्वीकारते. ‘टीव्हीवर दाखवलेले, सिनेमांमध्ये दाखवलेले किंवा वृत्तपत्रात छापलेले बरोबरच आहे’ असा एक समज असतो, पण अशा मीडियामधून आलेल्या गोष्टीसुद्धा तपासल्याशिवाय स्वीकारू नयेत. अलीकडे तर ‘गोदी मीडिया’ असा शब्दप्रयोग रुढ झाला आहे. आपल्याला हवे तसे लोकमत तयार करण्यासाठी सत्य, असत्य, भडक बातम्या दिल्या जातात; म्हणूनच प्रत्येक बातमीची सत्यता तपासल्याशिवाय विश्वास ठेवू नये.

  • विज्ञानवादी व्यक्ती नम्रतेने वागते. ‘मला सर्व कळलेले आहे. मी दिलेले उत्तर हे शेवटचे उत्तर आहे. हेच अंतिम सत्य आहे.’ हा धर्माचा दावा असतो. पण विज्ञान नेहमी नम्र असते. ते कधी अंतिम सत्याचा दावा करत नाही. ‘मला आता एवढेच समजले आहे. सध्या उपलब्ध पुराव्यानुसार हे सत्य आहे. उद्या याहून वेगळे पुरावे मिळाले, तर मी माझे मत बदलीन!’ अशी विज्ञानाची नम्रतेची भावना असते.

  • विज्ञानवादी व्यक्ती सातत्याने प्रश्न विचारते. प्रश्न पडण्यातून मेंदूचा विकास झाला. विद्यार्थ्यांना प्रश्न विचारण्याची सवय लागली पाहिजे; उत्तरे शोधण्याची सवय लागली पाहिजे. अध्यात्मवादी म्हणतात, ‘प्रश्न विचारू नका, गुरूवर श्रद्धा ठेवा.’ विज्ञान म्हणते, ‘प्रश्न विचारा.

थोडक्यात निरीक्षण, परीक्षण, पडताळा, तर्क, अनुमान इत्यादींचा वापर करूनच वैज्ञानिक दृष्टिकोन असलेली व्यक्ती निष्कर्ष काढते. प्रत्येक घटनेमागचा कार्यकारणभाव लक्षात घेते.

अंधश्रद्धा निर्मूलन समिती, कोल्हापूरचे कार्यकर्ते व अभ्यासक

GST आता फक्त ५ आणि १८ टक्के; नवीन दराचा ‘घट’ २२ सप्टेंबरपासून

शिखर धवनला ED कडून समन्स; दोषी आढळल्यास माजी क्रिकेटपटूवर काय कारवाई होणार?

मराठा आरक्षणाच्या जीआरवरून OBC नेत्यांमध्ये मतमतांतरे; जीआर प्रत फाडत लक्ष्मण हाके यांचे आंदोलन; भुजबळांचा कोर्टात जाण्याचा इशारा

मुंबईची वाढती तहान भागवायला आणखी दोन धरणांचा प्रस्ताव

सुप्रीम कोर्टाची राज्य सरकारला नोटीस; कॉ. पानसरे यांच्या कुटुंबीयांच्या याचिकेवर निर्देश