आत्मकथनातील सोनियांचे 'असत्याचे प्रयोग' 
संपादकीय

आत्मकथनातील सोनियांचे 'असत्याचे प्रयोग'

सोनिया गांधींच्या राजकारणाचा हा प्रवास प्रेमाचा नव्हे तर विद्वेषाचाच होता हे साध्वी प्रज्ञा सिंह, कर्नल पुरोहित प्रकरणात दिसले आहे. या असत्य कथनातून आपली प्रतिमा उजळवण्याचा प्रयत्न सोनिया गांधींनी करून पाहिला आहे. मात्र यातून त्यांचेच पितळ उघडे पडले आहे.

नवशक्ती Web Desk

मत आमचेही

केशव उपाध्ये

सोनिया गांधींच्या राजकारणाचा हा प्रवास प्रेमाचा नव्हे तर विद्वेषाचाच होता हे साध्वी प्रज्ञा सिंह, कर्नल पुरोहित प्रकरणात दिसले आहे. या असत्य कथनातून आपली प्रतिमा उजळवण्याचा प्रयत्न सोनिया गांधींनी करून पाहिला आहे. मात्र यातून त्यांचेच पितळ उघडे पडले आहे.

काँग्रेसच्या माजी अध्यक्ष आणि २००४ ते २०१४ या काळातील पडद्यामागच्या पंतप्रधान सोनिया गांधी यांचे आत्मकथनपर पुस्तक नुकतेच बाजारात दाखल झाले आहे. काँग्रेसच्या अध:पतनाला सर्वार्थाने कारणीभूत ठरलेल्या सोनिया गांधी नामक नेतृत्वाने आत्मकथन करताना राजकीय स्वार्थापोटी आपल्याच कुटुंबीयांना बदनाम करत आपला निर्दयी, विश्वासघातकी चेहरा दाखवून दिला आहे. विवाह करून गांधी कुटुंबात दाखल झाल्यापासून २००४ ते २०१४ या दहा वर्षांतील काँग्रेसप्रणित संयुक्त पुरोगामी आघाडी सरकारच्या १० वर्षांच्या प्रवासाचा आढावा सोनिया गांधी यांनी या आत्मकथनातून घेतला आहे. हा आढावा घेताना त्यांनी या प्रवासातील काँग्रेस आणि गांधी कुटुंबाच्या दृष्टीने कसोटीच्या ठरलेल्या काही घटनांबाबत मतप्रदर्शनही केले आहे. या मतप्रदर्शनातून सोनिया गांधी यांनी आपल्या असत्याच्या प्रयोगांची दीर्घ मालिका सादर केली आहे. कमालीच्या निगरगट्टपणे त्यांनी काही घटनांबाबत साळसूद भूमिका घेत आपण, आपले पती स्वर्गीय राजीव गांधी यांना निर्दोषत्वाचे प्रमाणपत्र देऊन टाकले आहे. या आत्मकथनात त्यांनी आपण गांधी घराण्याची सून होईपर्यंतच्या घटना कथन केल्या आहेत. या घटना त्यांच्या वैयक्तिक आयुष्याचा भाग असल्यामुळे त्यावर टीकाटिप्पणी करणे योग्य ठरणार नाही. मात्र राजकीय घडामोडी, सरकारी निर्णय प्रक्रिया या संदर्भात सोनिया गांधींनी केलेले खुलासे, व्यक्त केलेली मते यांचा समाचार घेणे भाग पडते.

या आत्मकथनातील सर्वात आक्षेपार्ह भाग म्हणजे आणीबाणीच्या कालखंडाविषयीच्या मतप्रदर्शनाचा. आणीबाणीचा कालखंड अनेक कारणांनी वादग्रस्त ठरला. आणीबाणीमध्ये सामान्य माणसाच्या अभिव्यक्ती स्वातंत्र्याची गळचेपी करून, विरोधी पक्षाच्या लाखो कार्यकर्त्यांना तुरुंगात टाकून इंदिरा गांधींनी आपल्यातील क्रूर हुकूमशहाचे दर्शन घडवले होते. याखेरीज आणीबाणीमध्ये कुटुंब नियोजन कार्यक्रमाची सक्तीने अंमलबजावणी करताना सरकारी यंत्रणेने अत्याचारांचा कळस केला. हजारो अविवाहित पुरुषांवरही कुटुंब नियोजन शस्त्रक्रिया करण्यात आल्या. आणीबाणीमधील अत्याचारांबद्दल इंदिरा गांधी यांचे कनिष्ठ पुत्र संजय गांधी आणि त्यांचे सहकारी विद्याचरण शुक्ल, बन्सीलाल यांना जबाबदार ठरवण्यात आले होते. या अत्याचारामुळे उत्तर भारतात इंदिरा गांधी, संजय गांधी आणि काँग्रेसविरोधात असंतोषाची जबरदस्त लाट निर्माण होऊन १९७७ मध्ये झालेल्या लोकसभा निवडणुकीत काँग्रेसचा मोठा पराभव झाला. इंदिरा आणि संजय गांधी या मायलेकरांच्या जोडीला मतदारांनी धूळ चारली. इंदिरा गांधींनाही कालांतराने आपली चूक उमगली. आणीबाणी लादणे ही आपली चूक होती, अशी कबुलीही इंदिराजींनी दिली होती. मात्र आणीबाणीतील अत्याचार आणि अन्य अप्रिय घटनांची जबाबदारी त्यांनी संजय गांधींवर ढकलण्याचा प्रयत्न केला नव्हता. जे काही झाले त्याची संपूर्ण जबाबदारी इंदिराजींनी स्वीकारली होती. आणीबाणीच्या काळात सोनिया या राजीव गांधी आणि मुलांच्या समवेत परदेशात होत्या. ५० वर्षे उलटून गेली तरी अजून आणीबाणीच्या कटू आठवणी पुसल्या गेल्या नाहीत. या विषयावर काँग्रेसला अजूनही बचावात्मक भूमिका घ्यावी लागते. आणीबाणीतील हुकूमशाहीच्या निर्णयाचा फटका काँग्रेसला बसल्यानंतर अनेक ज्येष्ठ नेत्यांनी इंदिरा गांधींची साथ सोडली. संजय गांधींच्या अपघाती मृत्यूनंतर इंदिरा गांधी एकाकी पडल्या. त्या स्थितीत त्यांनी राजीव गांधींना भारतात बोलावून घेतले. राजीव गांधी १० वर्षे सक्रिय राजकारणात होते. या काळात त्यांनी आणीबाणीबद्दल आपल्या भावाला दोषी ठरवून स्वतःला त्या घटनापासून अलिप्त ठेवण्याचा प्रयत्न केला नव्हता. मात्र सोनिया गांधी आणीबाणीची जबाबदारी संजय गांधींवर ढकलून मोकळ्या झाल्या आहेत. त्या काळात दिल्लीतील तुर्कमान गेट भागातील अतिक्रमणे हटविण्यासाठी बुलडोझरचा वापर केला गेला. ही अतिक्रमणे मुस्लिम समुदायाची होती. बुलडोझरचा वापर करून ही अतिक्रमणे हटविल्याबद्दल सोनिया गांधी आपल्या आत्मकथनात नापसंती व्यक्त करतात. मात्र आपले पती पंतप्रधान झाल्यावर दिल्लीत आणि देशात इंदिरा गांधींच्या हत्येनंतर शीख समुदायाच्या नृशंस हत्याकांडाबद्दल मात्र त्या चकार शब्दानेही खेद व्यक्त करीत नाहीत. ५० वर्षांपूर्वीच्या तुर्कमान गेट परिसरात झालेल्या कारवाईची जबाबदारी आपल्या दिरावर ढकलून त्याबद्दल नाराजी व्यक्त करून मुस्लिम धर्मीयांना चुचकारण्याचा प्रयत्न करणाऱ्या सोनिया गांधी हजारो शीख नागरिकांच्या हत्याकांडाबद्दल मात्र मौन पाळतात. यातून त्यांचा ढोंगीपणा दिसून येतो. आणीबाणीमध्ये संजय गांधी हे घटनाबाह्य सत्ताकेंद्र बनले होते अशी टिप्पणी करणाऱ्या सोनिया गांधींना मनमोहन सिंग पंतप्रधान असताना २००४ ते २०१४ या काळात राष्ट्रीय सल्लागार परिषद अध्यक्षपद भूषविताना आपणही घटनाबाह्य सत्ताकेंद्रच बनलो होतो याचे सोयीस्कर विस्मरण झाले आहे. मनमोहन सिंग हे कसे नामधारी पंतप्रधान होते, याच्या अनेक सुरस कहाण्या त्या काळात मनमोहन सिंगांचे प्रसिद्धी सचिव असणाऱ्या संजय बारू यांनी आपल्या पुस्तकात कथन केल्या आहेत. राजीव गांधींना सत्तेतून पायउतार होण्यास भाग पडलेल्या बोफोर्स भ्रष्टाचार प्रकरणाबद्दलही सोनिया गांधींनी आपल्या पुस्तकात मौन पाळले आहे.

बोफोर्स प्रकरणातील मुख्य आरोपी क्वात्रोची याला वाचविण्यासाठी मनमोहन सिंग सरकार असताना कसे प्रयत्न झाले होते, याबद्दलच्या अनेक बातम्या त्यावेळी प्रसिद्ध झाल्या होत्या. त्याबद्दलही सोनिया गांधी अवाक्षर उच्चारीत नाहीत. मनमोहन सिंग पंतप्रधान असताना सोनिया गांधी याच सरकार चालवत होत्या, याचे अनेक किस्से संजय बारू, चित्रा सुब्रमण्यम यांसारख्या नामवंत पत्रकारांनी लिहिले आहेत. त्याच सरकारच्या काळात हिंदू दहशतवादसारखी संकल्पना रुजविण्याचा प्रयत्न हेतुपूर्वक केला गेला. सोनिया गांधींच्या राजकारणाचा हा प्रवास प्रेमाचा नव्हे तर विद्वेषाचाच होता हे साध्वी प्रज्ञा सिंह, कर्नल पुरोहित प्रकरणात दिसले आहे. या असत्य कथनातून आपली प्रतिमा उजळवण्याचा प्रयत्न सोनिया गांधींनी करून पाहिला आहे. मात्र यातून त्यांचेच पितळ उघडे पडले आहे.

- प्रदेश उपाध्यक्ष, भाजप

आजचे राशिभविष्य, १७ नोव्हेंबर २०२६ : जाणून घ्या तुमच्या दिवसाचे ग्रहसंकेत

Old Bedsheet Hacks : जुने बेडशीट्स फेकू नका! घरातील 'या' कामांसाठी होईल भन्नाट उपयोग

ना मुरंबा, ना लोणचं! हिवाळ्यात आवळा आणि गुळापासून बनवा चविष्ट लाडू; चवीला हटके, करायलाही सोपे

Thane : मुंब्रा रेल्वे स्थानकाजवळील दुकानातील मिठाईतून विषबाधा? पाच जणांची प्रकृती बिघडली, एकाचा मृत्यू, FDA कडून तपास सुरू

Diljit Dosanjh Indore Concert : दिलजीतच्या कॉन्सर्टमध्ये चोरट्यांचा धुमाकूळ; गर्दीचा फायदा घेत मोबाईल लंपास, दोघांना अटक