Asian Games 2026 Shooting : नीरूची सुवर्ण किमया; महिलांच्या ट्रॅप नेमबाजी प्रकारात नोंदवली ऐतिहासिक कामगिरी (Photo-X)
क्रीडा

Asian Games 2026 Shooting : नीरूची सुवर्ण किमया; महिलांच्या ट्रॅप नेमबाजी प्रकारात नोंदवली ऐतिहासिक कामगिरी

हरयाणातील २६ वर्षीय नीरू धांडा हिने आशियाई क्रीडा स्पर्धेत महिलांच्या ट्रॅप नेमबाजी प्रकारात सुवर्णपदक जिंकून ऐतिहासिक कामगिरी नोंदवली.

Swapnil S

नागोया : हरयाणातील २६ वर्षीय नीरू धांडा हिने आशियाई क्रीडा स्पर्धेत महिलांच्या ट्रॅप नेमबाजी प्रकारात सुवर्णपदक जिंकून ऐतिहासिक कामगिरी नोंदवली. आशियाई स्पर्धेतील महिलांच्या वैयक्तिक ट्रॅप प्रकारात सुवर्णपदक मिळवणारी ती पहिली भारतीय महिला ठरली आहे. नीरूने सांघिक प्रकारात अन्य दोघींच्या साथीने भारतासाठी रौप्यपदकही जिंकले, हे विशेष.

तिने आयची प्रिफेक्चर जनरल शूनिंग गॅलरी येथे झालेल्या स्पर्धेत २८ गुण मिळवत मागील २४ गुणांचा आशियाई विक्रम मोडित काढला. चीनच्या सन युनोंग हिने २६ गुणांसह रौप्यपदक जिंकले, तर कुवेतच्या अब्दुलमलिक हाजर हिने २१ गुणांसह कांस्य पदक पटकावले. या विजयानंतर नीरूने सांगितले की, “देशाचे रक्षण करणाऱ्या भारतीय लष्कराच्या जवानांना आणि १९७८ मध्ये आशियाई क्रीडा स्पर्धेत भारताला पहिले ट्रॅप सुवर्ण मिळवून देणारे दिवंगत राजा रणधीर सिंग यांना मी हे पदक समर्पित करते.” “माझा चुलत भाऊ लक्ष्य शेरॉन याने २०१८ मधील जकार्ता आशियाई क्रीडा स्पर्धेत ट्रॅप प्रकारात रौप्यपदक जिंकले होते, त्याच्याकडून प्रेरणा घेऊन मी ट्रॅप शूटिंगमध्ये प्रवेश केला. मला मोफत बंदूक आणि सर्व साहित्य मिळत असल्याने मी नंतर भोपाळमधील मध्य प्रदेश शूटिंग अकादमीमध्ये प्रवेश घेतला,” असेही नीरूने सांगितले.

पात्रता फेरीत नीरूने कतारच्या रे बासिलसोबत ११७ गुणांची बरोबरी करत आठ शूटरच्या अंतिम फेरीत प्रवेश केला होता, जी पात्रता खेळांमधील विक्रमी कामगिरी आहे. महिलांच्या सांघिक प्रकारात नीरू (११८), आशीमा अलावात (१०६) आणि मनिषा कीर (१०४) यांच्या त्रिकुटाने संयुक्तपणे ३२८ गुणांची कमाई करत दुसरे स्थान मिळवले. या प्रकारात चीनने सुवर्णपदक पटकावले. चीनच्या संघात ल्यू शानशान, सन युनोंग आणि झू जिंयू यांचा समावेश होता. त्यांनी ३४६ गुण मिळवले. कुवेतच्या अलहवाल शहाद, अब्दुलमलिक हाजर आणि अलहवाल सारा या त्रिकुटाने ३२५ गुणांसह कांस्यपदक पटकावले.

भारतीय पुरुष ट्रॅप संघाने मात्र निराशाजनक कामगिरी करत दहा संघांमध्ये सहावे स्थान मिळवले. मथुरेच्या २४ वर्षीय शपथ भारद्वाजने आठवे स्थान मिळवत अंतिम फेरीत प्रवेश केला. अंतिम दोन पात्रता स्थानांसाठी झालेल्या शूट-ऑफमध्ये त्याने मोहम्मद अल-रुमाईही याला मागे टाकत आठवा आणि अंतिम प्रवेश मिळवला, मात्र अंतिम फेरीत तो शेवटच्या स्थानावर राहिला आणि स्पर्धेबाहेर पडला.

२ भारतासाठी नीरूने यंदाच्या आशियाई स्पर्धेत नेमबाजीतील दुसरे सुवर्ण जिंकले. यापूर्वी सुरूची सिंग आणि कमलजित यांनी १० मीटर पिस्तूल मिश्र सांघिक स्पर्धेत सुवर्णपदक जिंकले होते.

हे महत्त्वाचे!

नीरूच्या ऐतिहासिक विजयापूर्वी आशियाई क्रीडा स्पर्धेत कोणत्याही भारतीय महिला ट्रॅप नेमबाजाला वैयक्तिक पदक मिळवता आले नव्हते. १९७८ मधील पुरुष वैयक्तिक ट्रॅप प्रकारात राजा रणधीर सिंग यांनी सुवर्णपदक जिंकल्यानंतर, २०१०च्या आशियाई स्पर्धेत रोंजन सोधीने पुरुषांच्या डबल ट्रॅप प्रकारात सर्वोच्च यश मिळवले होते. त्यामुळे नीरूचे हे यश तितके खास आहे.

(इंग्रजी बातमी वाचण्यासाठी येथे क्लिक करा.)

Mumbai : ५ ऑक्टोबरपासून बेस्ट मार्गांत बदल; आठ मार्गांचे वातानुकूलित सेवेत रूपांतर

Mumbai : ...तर पैसे परत घेण्याचा अधिकार; उच्च न्यायालयाचा ग्राहकाला दिलासा, बिल्डरांना झटका

Mumbai : अनुकंपा नियुक्ती हा नोकरी अधिकार नाही; उच्च न्यायालयाचा निर्वाळा

विद्यार्थ्यांच्या मनात आत्महत्येचे विचार; देशभरातील सर्वेक्षणातून धक्कादायक माहिती समोर

Jalgaon : शेतातील पांढरे सोने काळवंडणार; कापूस उत्पादन ५० ते ६० टक्के घटण्याचा कृषी विभागाचा अंदाज