नागोया : पुरुषांच्या भालाफेकीत यशवीर सिंगने ८५.७२ मीटर फेकीसह वैयक्तिक सर्वोत्तम कामगिरी करत रौप्य पटकावले, तर रोहित यादवने ८४.३५ मीटर फेकीसह कांस्यपदकाची कमाई केली. श्रीलंकेच्या रुमेश पाथिरागेने ८८.५५ मीटर फेकीसह सुवर्ण पदक जिंकले.
दुखापतीमुळे तारांकित भालाफेकपटू नीरज चोप्रा स्पर्धेतून बाहेर पडल्याने त्याच्या जागी राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेतील कांस्यपदक विजेत्या यशवीर सिंगला संघात स्थान देण्यात आले होते. यशवीरने त्या संधीचे रौप्यपदकात रुपांतर केले. मुख्य म्हणजे सलग दुसऱ्या आशियाई स्पर्धेत भारताने भालाफेकीत दोन पदके जिंकली. २०२३मध्ये नीरजने सुवर्ण, तर किशोर जेनाने रौप्यपदक पटकावले होते. यंदा मात्र भारताने रौप्य-कांस्यपदक प्राप्त केले.
हरयाणाच्या २४ वर्षीय यशवीरने आपल्या सहाव्या आणि अंतिम प्रयत्नात ८५.७२ मीटरची वैयक्तिक सर्वोत्तम कामगिरी नोंदवली आणि सहकारी भारतीय खेळाडू रोहित यादवला मागे टाकत रौप्य पदक पटकावले. उत्तर प्रदेशच्या २५ वर्षीय रोहितने ८४.३५ मीटर अंतरावर भाला फेकून कांस्यपदक आपल्या नावे केले. यशवीरने यावर्षी ग्लासगो राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत कांस्य पदक जिंकले होते, मात्र रोहित यादवला तिथे पदक जिंकता आले नव्हते.
पाकिस्तानचा विद्यमान ऑलिम्पिक विजेता अर्शद नदीम याने ८०.२९ मीटरची हंगामातील सर्वोत्तम कामगिरी करत चौथे स्थान मिळवले.
एकूण पदके ४५
भारताने सोमवारी दिवसभरात आठ पदकांची कमाई केली. यामध्ये ४ रौप्य व ४ कांस्यपदकांचा समावेश होता. सध्या ४ सुवर्ण, २० रौप्य, २१ कांस्य अशा एकूण ४५ पदकांसह भारत पदकतालिकेत १२व्या क्रमांकावर आहे.
गुलवीरची रौप्यदौड; चार दिवसांत दुसरे पदक
पुरुषांच्या १५०० मीटर शर्यतीत गुलवीर सिंहने ३ मिनिटे ३६.७२ सेकंद या वैयक्तिक सर्वोत्तम वेळेसह रौप्यपदक जिंकले. जपानच्या काझुतो इइझावाने सुवर्णपदक मिळवले. यापूर्वी गुलवीरने १०,००० मीटर शर्यतीतही रौप्य जिंकले होते. “माझ्या कारकीर्दीतील हे अत्यंत महत्त्वाचे पदक आहे. मला अनेक स्पर्धांमध्ये धावण्याची काहीच अडचण नाही आणि मला त्यांत पदके जिंकायची आहेत. मी प्रामुख्याने ५००० मीटर आणि १०,००० मीटरसारख्या लांब पल्ल्याच्या शर्यतींमध्ये धावणारा खेळाडू असल्याने, या शर्यतीच्या शेवटी मला माझा वेग टिकवून ठेवता आला नाही,” असे गुलवीर म्हणाला.
माघारीनंतरही मुरलीची मुसंडी
दुखापतीमुळे चौथ्या प्रयत्नानंतर माघार घ्यावी लागूनही मुरली श्रीशंकरने ८.०७ मीटर उडी मारून लांब उडीत रौप्यपदक निश्चित केले. चीनच्या शि युहाओने ८.१७ मीटर उडीसह सुवर्णपदक पटकावले. २७ वर्षीय श्रीशंकरने यापूर्वीच्या आवृत्तीत आणि ग्लासगो येथील राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत रौप्यपदक जिंकले होते. आपल्या दुसऱ्या प्रयत्नात ८.०७ मीटरची सर्वोत्तम कामगिरी करत पदकाच्या शर्यतीत स्थान मिळवले. चौथ्या प्रयत्नात घोट्याला दुखापत झाल्यामुळे त्याला शेवटचे दोन प्रयत्न करता आले नाहीत. तो चीनच्या युहाओ शीच्या मागे राहिला. उझबेकिस्तानच्या अन्वर अन्वरोव्हने ८.०६ मीटरच्या कामगिरीसह कांस्यपदक पटकावले.