बांगलादेशविरुद्धच्या मालिकेसाठी ऑस्ट्रेलियन संघ जाहीर; कमिन्स, लायन आणि हेझलवूडचे ऑस्ट्रेलियन कसोटी संघात पुनरागमन (Photo-X)
क्रीडा

बांगलादेशविरुद्धच्या मालिकेसाठी ऑस्ट्रेलियन संघ जाहीर; कमिन्स, लायन आणि हेझलवूडचे ऑस्ट्रेलियन कसोटी संघात पुनरागमन

बांगलादेशविरुद्ध १३ ऑगस्टपासून सुरू होणाऱ्या दोन सामन्यांच्या कसोटी मालिकेसाठी क्रिकेट ऑस्ट्रेलियाने १३ सदस्यांचा संघ जाहीर केला.

Swapnil S

मेलबर्न: बांगलादेशविरुद्ध १३ ऑगस्टपासून सुरू होणाऱ्या दोन सामन्यांच्या कसोटी मालिकेसाठी क्रिकेट ऑस्ट्रेलियाने १३ सदस्यांचा संघ जाहीर केला. या मालिकेसाठी कर्णधार पॅट कमिन्स, फिरकीपटू नॅथन लायन आणि वेगवान गोलंदाज जोश हेझलवूड या दिग्गज त्रिकुटाचे संघात पुनरागमन झाले आहे.

जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेत खेळलेल्या आठपैकी सात सामने जिंकून अव्वल स्थानावर असलेला ऑस्ट्रेलियन संघ या मालिकेसाठी पूर्ण ताकदीनिशी उतरणार आहे. बांगलादेशचा संघ २००३ नंतर पहिल्यांदाच कसोटी मालिकेसाठी ऑस्ट्रेलियाचा दौरा करत आहे.

कर्णधार पॅट कमिन्स अॅशेस मालिकेनंतर पाठीच्या दुखापतीमुळे कसोटी क्रिकेटपासून दूर होता. आयपीएल २०२६ मध्ये त्याने पुनरागमन केले असले, तरी या वर्षातील त्याची ही पहिलीच आंतरराष्ट्रीय कसोटी मालिका ठरणार आहे. ७२ कसोटी सामन्यांचा अनुभव असलेल्या कमिन्सच्या नावावर ३१५ बळी आणि १,५०० हून अधिक धावा नोंद आहेत. दुसरीकडे, डिसेंबरमध्ये स्नायूंच्या दुखापतीवर शस्त्रक्रिया झाल्यानंतर नॅथन लायन दीर्घकाळ मैदानाबाहेर होता. वेगवान गोलंदाज जोश हेझलवूड जुलै २०२५ नंतर पहिल्यांदाच कसोटी सामना खेळणार आहे. स्नायू आणि घोट्याच्या दुखापतीमुळे तो २०२५ - मध्ये पूर्णपणे कसोटी क्रिकेटपासून दूर राहिला होता. कमिन्स, हेझलवूड आणि मिचेल स्टार्क हे प्रमुख वेगवान गोलंदाज परतल्या-मुळे स्कॉट बोलँडला अंतिम ११ खेळाडूंमधून बाहेर बसावे लागण्याची शक्यता आहे.

पुढील १२ महिन्यांतील क्रिकेटचे व्यस्त वेळापत्रक पाहता, इतर खेळाडूंनाही संधी मिळेल, असे मत मुख्य निवड समिती सदस्य जॉर्ज बेली यांनी व्यक्त केले. "हा १३ खेळाडूंचा संघ असला तरी आगामी सामन्यांच्या पार्श्वभूमीवर गरज भासल्यास संघात बदल करण्यासाठी अतिरिक्त खेळाडू तयार ठेवण्यात आले आहेत. पुढील वर्षभरातील खेळ पाहता सर्व प्रकारच्या क्रिकेटमध्ये अनेक खेळाडूंना संधी मिळतील," असे बेली यांनी सांगितले.

ऑस्ट्रेलियाचा १३ सदस्यीय संघ

पॅट कमिन्स (कर्णधार), स्कॉट बोलैंड, अॅलेक्स कॅरे, कॅमेरून ग्रीन, जोश हेझलवूड, ट्रेव्हिस हेड, जोश इंग्लिस, मार्नस लाबूशेन, नॅथन लायन, स्टीव्ह स्मिथ, मिचेल स्टार्क, जेक वेदराल्ड, ब्यू वेबस्टर.

(संबंधित इंग्रजी बातमी वाचण्यासाठी येथे क्लिक करा.)

Mumbai : ठाकरे बंधूंची आज दादरमध्ये विजयी सभा; तरुणांनी भीती घालवली - उद्धव ठाकरे

Mumbai : मध्य रेल्वेला भंगार विक्रीतून १३६.१० कोटींचे उत्पन्न

मूळ मालकाला भरपाई दिल्याशिवाय प्रकल्पाग्रस्तांना जमिनीचे वाटप अयोग्य; मुंबई उच्च न्यायालयाचा निर्णय

मुंबईत तस्करीपेक्षा अमली पदार्थ सेवनाचे गुन्हे अधिक; ड्रग्जविरोधात पोलिसांचे युद्ध

Mumbai : जन्म दाखल्यासाठी सॉफ्टवेअर आणणार; मानखुर्द, कुर्ल्यातील दाखल्यांचा तत्काळ निपटारा करा, अतिरिक्त आयुक्तांचे निर्देश