सिंधू, लक्ष्य सेनसमोर सुरुवातीला सोपा पेपर; जागतिक अजिंक्यपद बॅडमिंटन स्पर्धेचा ड्रॉ जाहीर, आयुषची सलामीलाच कसोटी  X
क्रीडा

सिंधू, लक्ष्य सेनसमोर सुरुवातीला सोपा पेपर; जागतिक अजिंक्यपद बॅडमिंटन स्पर्धेचा ड्रॉ जाहीर, आयुषची सलामीलाच कसोटी

भारतात १७ वर्षांनंतर आयोजित करण्यात येणाऱ्या जागतिक बॅडमिंटन अजिंक्यपद स्पर्धेचा ड्रॉ जाहीर झाला असून भारतीय खेळाडूंना संमिश्र ड्रॉ मिळाला आहे. आशियाई उपविजेत्या आयुष शेट्टीला पहिल्याच फेरीत चीनच्या गतविजेत्या शि युकीचा सामना करावा लागणार आहे.

Swapnil S

नवी दिल्ली : भारतात १७ वर्षांनंतर आयोजित करण्यात येणाऱ्या जागतिक बॅडमिंटन अजिंक्यपद स्पर्धेचा ड्रॉ जाहीर झाला असून भारतीय खेळाडूंना संमिश्र ड्रॉ मिळाला आहे. आशियाई उपविजेत्या आयुष शेट्टीला पहिल्याच फेरीत चीनच्या गतविजेत्या शि युकीचा सामना करावा लागणार आहे. दुसरीकडे, माजी जागतिक विजेती पी. व्ही. सिंधू आणि पुरुषांमधील प्रमुख खेळाडू लक्ष्य सेन यांना पहिल्या फेरीत तुलनेने सोपे आव्हान मिळाले आहे. ही स्पर्धा १७ ते २३ ऑगस्ट दरम्यान नवी दिल्ली येथील इंदिरा गांधी इनडोअर स्टेडियमवर रंगणार आहे.

सहाव्या पदकाच्या शोधात असलेल्या सिंधूची सुरुवात आयर्लंडच्या १४१ व्या मानांकित सोफिया नोबेलविरुद्ध होईल. सिंधूला उपांत्यपूर्व फेरीपूर्वी अव्वल मानांकित ॲन से यंग आणि अकाने यामागुची यांचा सामना करावा लागणार नाही. उपउपांत्यपूर्व फेरीत सिंधूचा सामना चीनच्या वांग झी यीशी, तर उपांत्यपूर्व फेरीत इंडोनेशियाच्या पुत्री वर्दानीशी होण्याची शक्यता आहे. पुरुष एकेरीत २०२१ मधील कांस्यपदक विजेता लक्ष्य सेन पहिल्या फेरीत ऑस्ट्रियाच्या कॉलिन व्हॅलेनटाइन फिलीमनविरुद्ध खेळेल. पुढे प्रगती केल्यास उपउपांत्यपूर्व फेरीत त्याच्यासमोर थायलंडच्या दुसऱ्या मानांकित कुनलावूत वितिदसर्णचे आव्हान असू शकते.

पुरुष दुहेरीत पाचव्या मानांकित सात्विकसाईराज रंकीरेड्डी आणि चिराग शेट्टी या जोडीला पहिल्या फेरीत बाय मिळाला आहे. दुसऱ्या फेरीत त्यांचा सामना स्कॉटलंडच्या अलेक्झांडर डन व ॲडम प्रिंगल किंवा थायलंडच्या चालोएमपॉन चारोएनकितामॉर्न व वॉरपॉल थोंगसा-नागा या जोडीशी होईल. मुख्य राष्ट्रीय प्रशिक्षक पुलेला गोपीचंद यांनी ड्रॉबाबत समाधान व्यक्त केले आहे.

आयुष शेट्टीचा सामना कठीण असला तरी पहिल्याच फेरीत शि युकीविरुद्ध खेळणे आयुषसाठी फायदेशीर ठरू शकते आणि विजय मिळाल्यास ड्रॉ खुला होईल, असे गोपीचंद यांनी स्पष्ट केले. तसेच लक्ष्य सेन हा पूर्वीपेक्षा अधिक परिपक्व खेळाडू झाला असून तो जगातील कोणत्याही खेळाडूला हरवू शकतो, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

इतर भारतीय खेळाडूंमध्ये महिला एकेरीत उन्नती हुड्डा पहिल्या फेरीत म्यानमारच्या थेट हतार थुझारविरुद्ध खेळेल. मिश्र दुहेरीत १५ व्या मानांकित ध्रुव कपिला आणि तनिषा क्रास्टो या जोडीला बाय मिळाला आहे, तर रोहन कपूर व जी. रुथविका शिवानीची गाठ कॅनडाच्या जोडीशी पडेल. महिला दुहेरीत ट्रीसा जॉली व गायत्री गोपीचंद आणि सिमरन सिंगी व कविप्रिया सेल्वम या जोड्या स्पेनच्या खेळाडूंचा सामना करतील. पुरुष दुहेरीत एम. आर. अर्जुन व हरिहरन जोडीची गाठ आयर्लंडच्या जोडीशी पडणार आहे.

तन्वीची आगेकूच; श्रीकांत पराभूत

तैपई ओपन विजेत्या भारताच्या तन्वी शर्माने महिला एकेरीत शानदार विजय मिळवत कोरिया मास्टर्स सुपर ३०० बॅडमिंटन स्पर्धेच्या दुसऱ्या फेरीत प्रवेश केला आहे. मात्र, माजी जागतिक उपविजेता किदाम्बी श्रीकांतला पुरुष एकेरीच्या पहिल्याच फेरीत पराभवाचा धक्का बसल्याने बुधवारी भारतासाठी मिश्र यश मिळवणारा दिवस ठरला. महिला एकेरीत तिसऱ्या मानांकित तन्वीने चीनच्या युआन आन ची हिचा २१-१६, २१-१५ असा सरळ गेममध्ये पराभव केला. पुरुष एकेरीत तिसऱ्या मानांकित किदाम्बी श्रीकांतला इस्रायलच्या दानिल दुबोवेन्कोकडून २०-२२, २१-१४, १२-२१ असा पराभव पत्करावा लागला.

(संबधित इंग्रजी बातमी वाचण्यासाठी येथे क्लिक करा.)

Mumbai-Goa Highway : गणपतीत यंदाही वाहतूक कोंडीचे 'विघ्न'! माणगाव बाह्यवळण मार्गाला डिसेंबरचा मुहूर्त

एलपीजी सिलिंडर होणार महाग?

ज्यांची पत्रकार परिषद, त्यांनीच संवाद साधायला हवा! सुनील तटकरेंनी टोचले धनंजय मुंडेंचे कान

गडकरींशी संबंधित डीपफेक व्हिडिओ हटवा; उच्च न्यायालयाचे सोशल मिडीया कंपन्यांना आदेश

कर्जमुक्तीसाठी राज्यातील १.४० लाख शेतकरी अपात्र; १६ लाख ९६ हजार शेतकऱ्यांच्या बँक कर्ज खात्यात दोन दिवसांत रक्कम जमा