सीएटल : मायदेशात विश्वचषक जिंकण्याचे अमेरिकेचे स्वप्न बेल्जियमने धुळीस मिळवले. मंगळवारी झालेल्या उपउपांत्यपूर्व (राउंड ऑफ १६) सामन्यात बेल्जियमने अमेरिकेच्या बचाव फळीतील त्रुटींचा पुरेपूर फायदा उठवत ४-१ असा दणदणीत विजय मिळवला आणि उपांत्यपूर्व फेरीत धडक मारली. बेल्जियमच्या या विजयात चार्ल्स केटेलेरे याने दोन गोल केले आणि एका गोलसाठी महत्त्वपूर्ण मदत (असिस्ट) केली. अमेरिकेचा हा पराभव अत्यंत वेदनादायी ठरला असून, बाद फेरीतून बाहेर पडल्यामुळे खेळाडूंनी मैदानावरच निराशा व्यक्त केली.
एकीकडे अमेरिका आणि इराण यांच्यातील युद्धजन्य स्थिती कायम असतानाच फिफा विश्वचषकाचा महासंग्राम जागतिक महासत्तेसह मेक्सिको व कॅनडाच्या रणभूमीवर सुरू आहे. १२ जून ते २० जुलै या कालावधीत (भारतीय वेळ आणि तारखांनुसार) अमेरिका, मेक्सिको आणि कॅनडा येथे संयुक्तपणे फिफा विश्वचषकाच्या २३व्या पर्वाचा थरार रंगत आहे. यंदा प्रथमच तीन देश संयुक्तपणे विश्वचषकाचे यजमानपद भूषवत असून पहिल्यांदाच ४८ संघही सहभागी झाले होते. आता विश्वचषकाचा थरार उपउपांत्यपूर्व फेरीच्या टप्प्यावर असून प्रत्येकी लढतीनंतर रोमांच वाढत आहे. फ्रान्स, मोरोक्को, नॉर्वे, इंग्लंड, स्पेन व बेल्जियम या सहा संघांनी आतापर्यंत उपांत्यपूर्व फेरी गाठली असून उर्वरित दोन लढतींमधून (अर्जेंटिना वि. इजिप्त, कोलंबिया वि. स्वित्झर्लंड) कोण आगेकूच करणार, हे पाहणे रंजक ठरेल.
सीएटल स्टेडियमवर झालेल्या या सामन्यात अमेरिकेला तारांकित आक्रमणपटू फोलोरिन बालोगन याच्या पुनरागमनाचा फायदा झाला. फिफाने बालोगनची एक सामन्याची लाल कार्डची बंदी उठवली होती. मात्र, पहिल्या सत्रात अमेरिकेच्या बचावपटूंनी केलेल्या चुकांमुळे बेल्जियमने दोन गोल केले. दुसऱ्या सत्राच्या सुरुवातीला अमेरिकेचा गोलरक्षक मॅट फ्रीज याच्या गंभीर चुकीमुळे बेल्जियमला तिसरा गोल मिळाला. त्यानंतर बदली खेळाडू म्हणून आलेल्या रोमेलू लुकाकू याने सामन्याच्या अतिरिक्त वेळेत (९३व्या मिनिटाला) बेल्जियमसाठी चौथा गोल नोंदवला. १९९० च्या विश्वचषकानंतर अमेरिकेने पहिल्यांदाच एका सामन्यात इतके गोल स्वीकारले आहेत. अमेरिकेचे प्रशिक्षक मॉरिसियो पोचेटिनो यांनी या पराभवाबद्दल तीव्र निराशा व्यक्त करताना हा दिवस अतिशय वाईट असल्याचे नमूद केले.
सामन्याच्या ८व्या मिनिटाला केटेलरेने गोल करत बेल्जियमला १-० अशी आघाडी मिळवून दिली होती. त्यानंतर ३१ व्या मिनिटाला अमेरिकेच्या मलिक टिलमनने फ्री-किकवर शानदार गोल करत सामना १-१ अशा बरोबरीत आणला. टिलमन हा १९८२ नंतर विश्वचषकात दोन फ्री-किक गोल करणारा पहिला खेळाडू ठरला आहे. मात्र, अमेरिकेचा हा आनंद फक्त ६१ सेकंद टिकला. ३३व्या मिनिटाला डिकेटेलारेने हेडरद्वारे दुसरा गोल करत बेल्जियमला २-१ अशी आघाडी मिळवून दिली.
५७व्या मिनिटाला गोलरक्षक फ्रीजच्या चुकीचा फायदा घेत हान्स वॅनाकेन याने बेल्जियमसाठी तिसरा गोल केला. अमेरिकेचा स्टार खेळाडू ख्रिश्चन प्युलिसिक ५२ व्या मिनिटाला दुखापतग्रस्त झाल्यामुळे त्याला मैदानाबाहेर जावे लागले, ज्यामुळे अमेरिकेचे आक्रमण थंडावले. ख्रिश्चन प्युलिसिक, टायलर ॲडम्स आणि वेस्टन मॅकेनी यांच्या नेतृत्वाखालील अमेरिकेच्या या पिढीला मायदेशातील ६६,९२५ प्रेक्षकांसमोर पराभवाचा सामना करावा लागला. त्यामुळे त्यांचे आव्हान संपुष्टात आले.
गोलफलक
बेल्जियम (४) - अमेरिका (१)
केटेलेरे (९, ३३) - टिलमन (३१)
वॅनाकेन (५७)
लुकाकू (९०+३)
यजमान देश बाहेर
बेल्जियमने गेल्या १२ वर्षांत दुसऱ्यांदा अमेरिकेला बाद फेरीत पराभूत केले असून, आपला सलग १८ सामन्यांचा अपराजित राहण्याचा विक्रम कायम ठेवला आहे. तसेच बेल्जियमने २०१८नंतर म्हणजेच ८ वर्षांनी उपांत्यपूर्व फेरी गाठली आहे. उपांत्यपूर्व फेरीत बेल्जियमचा सामना शुक्रवारी कॅलिफोर्नियातील इंगलवूड येथे २०१०चा विजेता स्पेनशी होईल. या पराभवासोबतच उत्तर आणि मध्य अमेरिका क्षेत्रातील (कॉन्कॅकॅफ) सर्व ६ देशांचे आव्हान संपले असून, तिन्ही सहयजमान बाद फेरीतच स्पर्धेतून बाहेर पडले आहेत.