नवी दिल्ली : जागतिक बॅडमिंटन स्पर्धेत बुधवारी भारताच्या तारांकित लक्ष्य सेनला पराभवाला सामोरे जावे लागले. तसेच उन्नती हूडाचेही आव्हान संपुष्टात आले. आयुष शेट्टी आणि पी. व्ही. सिंधू यांनी मात्र उपउपांत्यपूर्व फेरीत (राऊंड ऑफ १६) प्रवेश केला.
नवी दिल्ली येथील इंदिरा गांधी इनडोअर स्टेडियमवर सोमवारपासून जागतिक स्पर्धेच्या ३०व्या पर्वाला प्रारंभ झाला. भारताला २००९ नंतर प्रथमच या स्पर्धेचे यजमानपद मिळाले आहे. तसेच जानेवारी महिन्यात इंडिया ओपन स्पर्धेदरम्यान निर्माण झालेल्या अडचणींची पुनरावृत्ती टाळण्यासाठी भारतीय बॅडमिंटन संघटना (बीएआय) आणि भारतीय क्रीडा प्राधिकरण (साइ) यांनी स्टेडियमच्या रचनेत व सुविधांमध्ये महत्त्वपूर्ण बदल केले आहेत. त्यामुळे एकूणच या स्पर्धेद्वारे भारतीय खेळाडूंची तसेच आयोजकांचीही प्रतिष्ठा पणाला लागली आहे.
दरम्यान, पुरुष एकेरीत भारताचा २०२१मधील कांस्यपदक विजेता खेळाडू लक्ष्य सेनला दुसऱ्या फेरीत अमेरिकेच्या गॅरेट टॅनकडून १९-२१, २१-१९, १७-२१ असा धक्कादायक पराभव स्वीकारावा लागला. पराभवानंतर निराश झालेल्या लक्ष्यने सांगितले की, सामना अत्यंत कठीण होता आणि तिसऱ्या गेममध्ये तो शारीरिकदृष्ट्या थकला होता, तर टॅनने उत्कृष्ट खेळ दाखवला. पहिल्या फेरीच्या लढतीत लक्ष्यने बल्गेरियाच्या कॉलिन्स व्हॅलेंटाईन फिलीमन याचा ४५ मिनिटे चाललेल्या सामन्यात १६-२१, २१-८, २१-४ असा पराभव केला होता. त्याच्याकडून यंदा अपेक्षा होत्या. दुसरीकडे आयुष शेट्टीने श्रीलंकेच्या दुमिंदू अबेविक्रमाचा २१-८, २१-१० असा सहज पराभव करत इंडोनेशियाच्या फरहानविरुद्धची लढत निश्चित केली. आयुषवरच आता पुरुष एकेरीत भारताची भिस्त असेल.
महिलांमध्ये सहावे जागतिक पदक जिंकण्याच्या शर्यतीत असलेल्या नवव्या मानांकित सिंधूने कॅनडाच्या वेन यू झँगचा २१-१६, २१-१७ असा पराभव केला. पुढील फेरीत तिची गाठ चीनच्या तिसऱ्या मानांकित वँग झी ईशी पडणार आहे. दुसरीकडे पदार्पण करणाऱ्या उन्नती हूडाला कॅनडाच्या १२व्या मानांकित मिशेल लीकडून २१-११, ९-२१, २१-२३ असा पराभव पत्करावा लागला. उन्नती हिने म्यानमारच्या थेट हतार थुझारला पहिल्या फेरीत २२-२०, २१-१६ असे हरवले होते. आता फक्त सिंधूवर एकेरीत भारताचे भवितव्य अवलंबून आहे.
भारताच्या सात्विकसाईराज रंकीरेड्डी आणि चिराग शेट्टी या पुरुष दुहेरीतील पाचव्या मानांकित जोडीला स्कॉटलंडच्या अलेक्झांडर डन आणि प्रिंगल या जोडीने माघार घेतल्यामुळे वॉकओव्हर मिळाला आणि त्यांनी थेट उपउपांत्यपूर्व फेरीत धडक मारली. पुरुष दुहेरीत सात्विक-चिराग यांच्या जोडीने गेल्या जागतिक स्पर्धेत कांस्यपदक मिळवले होते, हे विशेष.
दुहेरीत तनिषा-ध्रुव यांची आगेकूच
मिश्र दुहेरीत तनिषा क्रास्टो आणि ध्रुव कपिला या भारतीय जोडीने मकाऊच्या लिआँग इओक चॉँग आणि न्ग वेंग ची यांचा २१-११, २१-११ असा पराभव करत उपउपांत्यपूर्व फेरी गाठली. पुरुष दुहेरीत हरीहरन अमसाकरुणन आणि एम. आर. अर्जुन या भारतीय जोडीला कोरियाच्या कांग मिन ह्युक आणि की डाँग जु यांच्याकडून १७-२१, १४-२१ असा पराभव स्वीकारावा लागला. त्यामुळे ते स्पर्धेबाहेर गले.