भारताच्या पुरुष-महिला बुद्धिबळ संघाचा सलग दुसरा विजय; ४६व्या जागतिक ऑलिम्पियाड बुद्धिबळ स्पर्धेत दुसऱ्या फेरीत फिनलँड, इंडोनेशियावर मात 
क्रीडा

भारताच्या पुरुष-महिला बुद्धिबळ संघाचा सलग दुसरा विजय; ४६व्या जागतिक ऑलिम्पियाड बुद्धिबळ स्पर्धेत दुसऱ्या फेरीत फिनलँड, इंडोनेशियावर मात

४६व्या बुद्धिबळ ऑलिम्पियाड स्पर्धेत गतविजेत्या भारतीय पुरुष आणि महिला संघांनी दुसऱ्या फेरीत आपापले सामने जिंकून गुणतालिकेत अव्वल स्थान कायम ठेवले आहे. सोमवारी रात्री झालेल्या या लढतींमध्ये पुरुष संघाने इंडोनेशियाचा २.५-१.५ असा पराभव केला, तर महिला संघाने फिनलँडवर ३-१ ने मात केली. दोन्ही संघांचे आता प्रत्येकी चार गुण झाले आहेत.

Swapnil S

समरकंद : ४६व्या बुद्धिबळ ऑलिम्पियाड स्पर्धेत गतविजेत्या भारतीय पुरुष आणि महिला संघांनी दुसऱ्या फेरीत आपापले सामने जिंकून गुणतालिकेत अव्वल स्थान कायम ठेवले आहे. सोमवारी रात्री झालेल्या या लढतींमध्ये पुरुष संघाने इंडोनेशियाचा २.५-१.५ असा पराभव केला, तर महिला संघाने फिनलँडवर ३-१ ने मात केली. दोन्ही संघांचे आता प्रत्येकी चार गुण झाले आहेत.

उझबेकिस्तान येथे १६ ते २७ सप्टेंबरदरम्यान यंदाची ऑलिम्पियाड बुद्धिबळ स्पर्धा रंगणार आहे. भारताने २०२४च्या ऑलिम्पियाडमध्ये दोन्ही गटांत सुवर्णपदक प्राप्त केले होते. त्यामुळे यंदाही भारताचे पारडे जेतेपदासाठी जड मानले जात आहे. यंदा भारतीय पुरुष संघात जगज्जेता डी. गुकेश, ग्रँडमास्टर आर. प्रज्ञानंद, अर्जुन इरिगेसी, निहाल सरिन आणि विदित गुजराती यांचा समावेश असून श्रीनाथ नारायणन संघाचे कर्णधार आहेत. महिला संघात कोनेरू हम्पी, आर. वैशाली, दिव्या देशमुख, वंतिका अगरवाल आणि सविता श्री बी. यांचा समावेश असून स्वयंम मिश्रा कर्णधार आहेत.

दरम्यान, पुरुष विभागात सलग दुसऱ्या दिवशी निहाल सरिन भारताच्या विजयाचा शिल्पकार ठरला. पांढऱ्या सोंगट्यांनी खेळताना निहालने सिसिलियन डिफेन्स रचनेत इंडोनेशियाच्या हाफिज आरिफ अब्दुलचा पराभव केला. सामन्यात एका टप्प्यावर निहालचा राजा अडचणीत आला होता, मात्र हाफिजने ती संधी गमावली आणि स्वतःचा राजा अडचणीत आणला. यानंतर निहालने आक्रमक खेळ करत विजय मिळवला.

दुसरीकडे, जगज्जेत्या डी. गुकेशला पुन्हा एकदा संघर्षाचा सामना करावा लागला. काळ्या सोंगट्यांनी खेळणाऱ्या इंडोनेशियाच्या सतारिया दुता चहायाने त्याला ५० व्या चालीत बरोबरीत रोखले. पहिल्या पटलावर खेळणाऱ्या आर. प्रज्ञानंदने सुसान्तो मेगारान्तोविरुद्ध पूर्ण गुणासाठी जोरदार प्रयत्न केले. ७९ चालींपर्यंत चाललेल्या या प्रदीर्घ सामन्यात प्रज्ञानंदकडे एक जादा प्यादा होते, परंतु अखेर हा सामना बरोबरीत सुटला. विदित गुजराती आणि नायका बुद्धिधर्म यांच्यातील सामनाही बरोबरीत सुटल्याने भारताने २.५-१.५ अशी सरशी साधली.

महिला विभागात भारताने फिनलँडविरुद्ध अधिक आक्रमक कामगिरी केली. विश्वचषक विजेत्या दिव्या देशमुखने दुसऱ्या पटलावर ऑलिंपियाडमधील आपल्या पदार्पणाच्या सामन्यात जोहाना पासिकांगासचा पराभव केला. तिसऱ्या पटलावर वंतिका अग्रवालने सारा-ऑलिव्हिया सिप्पोलाला हरवून सलग दुसरा विजय नोंदवला, तर बी. सविता श्रीने हेलजा लेहतिनेनवर विजय मिळवला. पहिल्या पटलावर आर. वैशालीने अनास्तासिया केइनानेनविरुद्ध सामना बरोबरीत सोडवला आणि भारताच्या ३-१ अशा विजयावर शिक्कामोर्तब केले.

एकूणच जागतिक विजेता डी. गुकेश, प्रज्ञानंद, कँडिडेट्स विजेती आर. वैशाली, विश्वचषक विजेती दिव्या यांच्याकडे प्रामुख्याने या स्पर्धेत नजरा असतील. प्रशिक्षक अभिजीत कुंटे यांचे मार्गदर्शनही मोलाचे ठरेल.

(संबधित इंग्रजी बातमी वाचण्यासाठी येथे क्लिक करा.)

देशात सर्वात कोरडा मान्सून; एल-निनोचा फटका; सरासरीपेक्षा १५ टक्के कमी पाऊस

विशाखा राऊत यांना न्यायालयाचा तात्पुरता दिलासा; जागा रिक्त ठेवण्याचे निर्देश

Pune : पुरंदर विमानतळाचा मार्ग झाला मोकळा; विरोधातील याचिका फेटाळली

कोयना धरण परिसरात भूकंपाचे पाच सौम्य धक्के; कोयनानगरचे भूकंपमापन केंद्र बंद

कर्जतमध्ये ढगफुटीसदृश पाऊस; विजेच्या ठिणगीने मच्छरदाणी पेटली