रियाध : तारांकित फुटबॉलपटू ख्रिस्तियानो रोनाल्डोने आपल्या व्यावसायिक कारकीर्दीतील शेवटच्या हंगामाचे संकेत दिले आहेत. सौदी प्रो लीगमधील हा हंगाम आपल्या कारकीर्दीतील शेवटचा असू शकतो, असे विधान अल-नासर क्लबच्या या ४१ वर्षीय स्टार स्ट्रायकरने केले आहे.
डिसेंबर २०२२ मध्ये अल-नासर क्लबसोबत झालेला त्याचा करार जून महिन्यात संपत असून, तो पुढे वाढवण्याची शक्यता कमी असल्याचे त्याने एका मासिकाला दिलेल्या मुलाखतीत स्पष्ट केले. ‘हे बहुधा माझे फुटबॉलमधील शेवटचे वर्ष असेल आणि मला एक अविस्मरणीय वारसा सोडून जायचे आहे,’ असे रोनाल्डोने नमूद केले. आपल्या २५ वर्षांच्या प्रदीर्घ कारकीर्दीत ९७६ गोल नोंदवणाऱ्या पोर्तुगालच्या या आक्रमणपटूने नुकताच आपली दीर्घकालीन भागीदार जॉर्जिना रॉड्रिग्ज हिच्याशी विवाह केला. भविष्यातील नियोजनाबद्दल बोलताना रोनाल्डोने सांगितले की, “फुटबॉल सोडल्यानंतर आयुष्यात मोठी पोकळी निर्माण होऊ शकते, त्यामुळे इतर गोष्टींमध्ये वेळ घालवणे गरजेचे आहे. अधिक प्रवास करणे, पॅडेल खेळणे आणि २५ वर्षांच्या कठोर परिश्रमानंतर मिळवलेल्या यशाचा आनंद घेणे ही आपली प्राथमिकता असेल.”
आपल्या २५व्या हंगामात खेळणाऱ्या रोनाल्डोने आतापर्यंत पाच वेळा ‘बॅलन डी ओर’ पुरस्कार आणि पाच वेळा ‘युएफा चॅम्पियन्स लीग’चे विजेतेपद पटकावले आहे. मात्र त्याला अद्याप विश्वचषक जिंकता आलेला नाही.
(संबधित इंग्रजी बातमी वाचण्यासाठी येथे क्लिक करा.)