क्रीडा

CSK vs GT : गुजरातला पुनरागमनाची आशा; चेन्नईत रंगणार IPL मधील चुरशीची लढत

चेन्नई सुपर किंग्ज (सीएसके) आणि गुजरात टायटन्स या दोन संघांमध्ये रविवारी चेन्नई येथे आयपीएलमधील महत्त्वाचा सामना रंगणार आहे. चेन्नई सुपर किंग्ज विजयाची मालिका कायम राखून गुणतालिकेत वरचे स्थान मिळवण्यासाठी मैदानात उतरेल, तर सलग दोन पराभव पत्करावे लागलेला गुजरातचा संघ पुन्हा एकदा विजयी मार्गावर येण्यासाठी प्रयत्नशील असेल.

Swapnil S

चेन्नई: चेन्नई सुपर किंग्ज (सीएसके) आणि गुजरात टायटन्स या दोन संघांमध्ये रविवारी चेन्नई येथे आयपीएलमधील महत्त्वाचा सामना रंगणार आहे. चेन्नई सुपर किंग्ज विजयाची मालिका कायम राखून गुणतालिकेत वरचे स्थान मिळवण्यासाठी मैदानात उतरेल, तर सलग दोन पराभव पत्करावे लागलेला गुजरातचा संघ पुन्हा एकदा विजयी मार्गावर येण्यासाठी प्रयत्नशील असेल.

सुरुवातीच्या काही पराभवांनंतर चेन्नईने दमदार पुनरागमन केले असून, गेल्या चारपैकी तीन सामन्यांत त्यांनी विजय नोंदवला आहे. मुंबई इंडियन्सविरुद्ध संजू सॅमसनने ठोकलेल्या हंगामातील दुसऱ्या शतकाच्या जोरावर चेन्नईने १०३ धावांनी मोठा विजय मिळवला होता.

ऋतुराज गायकवाडच्या नेतृत्वाखालील चेन्नईचा संघ ६ गुणांसह गुणतालिकेत पाचव्या स्थानावर असून बाद फेरीसाठी त्यांचे प्रयत्न सुरू आहेत. संजू सॅमसनचा अप्रतिम फॉर्म आणि अकील होसेनने केलेल्या टिच्चून गोलंदाजीमुळे चेन्नईचा आत्मविश्वास वाढला आहे. विशेष म्हणजे, महेंद्रसिंग धोनी (स्नायूची दुखापत) आणि २११ धावांचे योगदान देणारा आयुष म्हात्रे (मांडीचे स्नायू दुखावल्यामुळे) संघात नसतानाही त्यांनी ही कामगिरी केली आहे. असे असले तरी चेन्नईसाठी मधल्या फळीची कामगिरी चिंतेचा विषय ठरत आहे.

गुजरात टायटन्ससाठी हा हंगाम संमिश्र यशाचा राहिला आहे. पहिल्या दोन सामन्यांत पराभव पत्करावा लागल्याने गुजरातचा संघ सध्या अडचणीत आहे. 'सीएसके' प्रमाणेच गुजरातच्या खात्यातही ६ गुण आहेत, मात्र -०.७९० असा खराब नेट रनरेट असल्यामुळे ते सातव्या स्थानावर आहेत. गुजरातच्या फलंदाजांनी मधल्या षटकांमध्ये आक्रमक खेळ न केल्याचा फटका त्यांना बसला आहे. रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूविरुद्धच्या सामन्यात आम्ही अपेक्षेप्रमाणे धावा करू शकलो नाही आणि शेवटची तीन षटके आमच्यासाठी निर्णायक ठरली, असे कर्णधार शुभमन गिल याने मान्य केले.

गुजरातच्या ताफ्यात प्रसिध कृष्णा, कॅगिसो रबाडा आणि मोहम्मद सिराज अशी वेगवान गोलंदाजांची फौज आहे, तर फिरकीची धुरा राशिद खान सांभाळत आहे. फलंदाजीत साई सुदर्शनने बंगळुरूविरुद्ध झळकावलेले शतक आणि कर्णधार शुभमन गिलने २९३ धावांसह केलेले नेतृत्व ही गुजरातसाठी जमेची बाजू आहे. जोस बटलरनेही २३१ धावा करत त्याला चांगली साथ दिली आहे.

ऋतुराजचा खराब फॉर्म

ऋतुराज गायकवाड सध्या खराब फॉर्मातून जात असून सर्फराज खान, शिवम दुबे आणि डेवाल्ड ब्रेविस यांना चांगल्या सुरुवातीचे मोठ्या धावसंख्येत रूपांतर करता आलेले नाही. गोलंदाजीत अंशुल कंबोजने सर्वाधिक १४ बळी घेत छाप पाडली असून त्याला जेमी ओव्हरटन, नूर अहमद आणि अकील होसेन यांची चांगली साथ लाभत आहे.

सामन्याची वेळ : दुपारी ३.३० वाजल्यापासून

कोकण हापूसची आवक वाढली; दरात घसरण झाल्याने ग्राहकांना दिलासा

जप्त केलेल्या नोटा उंदरांनी कशा कुरतडल्या? सर्वोच्च न्यायालयाने व्यक्त केले आश्चर्य

के. कविता यांचा नवा राजकीय पक्ष; 'तेलंगणा राष्ट्र समिती' नावाने वडिलांनाच दिले आव्हान

सिंधुदुर्गातील 'MH-०७' क्रमांकाच्या वाहनांना टोल नाही; पालकमंत्री नितेश राणे यांचा जिल्हावासीयांना दिलासा

ठाण्याची झणझणीत मामलेदारची मिसळ इतिहासजमा; तहसील कार्यालय परिसराच्या पुनर्विकासाच्या पार्श्वभूमीवर इमारत जमीनदोस्त