नवी दिल्ली : भारतीय महिला कुस्तीपटू विनेश फोगटला दिल्ली उच्च न्यायालयाने आगामी आशियाई क्रीडा स्पर्धेच्या निवड चाचणीत सहभागी होण्यासाठी मंजुरी दिली आहे. मातृत्व रजेमुळे विश्रांती घेतलेल्या विनेशसारख्या नामांकित खेळाडूचा विचार करण्याचे कोणतेही अधिकार कुस्ती महासंघाच्या धोरणात नसून हे धोरण भेदभाव करणारे आणि खेळाडूंना वगळणारे आहे, असे मत न्यायालयाने व्यक्त केले.
मुख्य न्यायाधीश डी. के. उपाध्याय आणि न्यायाधीश तेजस कारिया यांच्या खंडपीठाने २२ मे रोजी दिलेल्या आदेशात ३० आणि ३१ मे रोजी होणाऱ्या या निवड चाचण्यांचे व्हिडिओ रेकॉर्डिंग करण्याचे आदेश भारतीय कुस्ती महासंघाला (डब्ल्यूएफआय) दिले आहेत. या चाचणीच्या वेळी भारतीय क्रीडा प्राधिकरण (साई) आणि भारतीय ऑलिम्पिक संघटना (आयओए) यांचे स्वतंत्र निरीक्षक उपस्थित राहतील, असेही न्यायालयाने स्पष्ट केले आहे.
मातृत्व हे महिला खेळाडूंच्या कारकिर्दीत व्यावसायिक अडथळा किंवा प्रतिकूल वागणूक देण्याचे कारण ठरू शकत नाही, असे खंडपीठाने स्पष्ट केले. निवड चाचणीचा हा नवीन निकष पूर्वीच्या पद्धतीपेक्षा वेगळा असून पूर्वी अशा स्पर्धांसाठी नामांकित खेळाडूंचा विचार करण्याचे अधिकार महासंघाकडे असायचे. गर्भधारणा आणि प्रसूतीनंतरच्या काळात महिला खेळाडूंना प्रचंड शारीरिक आव्हानांना सामोरे जावे लागते, ज्याची क्रीडा संस्थांमध्ये पुरेशी दखल घेतली जात नाही. मातृत्व हा जीवनाचा अत्यंत महत्त्वाचा भाग असून क्रीडा संस्थांनी याकडे संवेदनशीलतेने पाहिले पाहिजे, असेही न्यायालयाने म्हटले आहे.
विनेशला या चाचणीतून वगळणे हे थेट तिच्या प्रसूतीनंतरच्या विश्रांतीशी संबंधित असल्याने ते राज्यघटनेच्या कलम १४ आणि २१ मधील भेदभावाविरुद्धच्या तत्त्वांचे उल्लंघन करणारे आहे, असे निरीक्षण न्यायालयाने नोंदवले. कुस्ती महासंघाने ९ मे रोजी विनेश फोगटला बजावलेली कारणे दाखवा नोटीस ही पूर्वग्रहदूषित असून जुनीच प्रकरणे पुन्हा उकरून काढणारी आहे, असे न्यायालयाने नमूद केले.
या नोटीसमध्ये महासंघाने विनेशच्या २०२४ च्या पॅरिस ऑलिम्पिकमधील अपात्रतेचा उल्लेख ‘राष्ट्रीय मानहानी’ असा केल्याबद्दल न्यायालयाने तीव्र आक्षेप घेतला आहे. महासंघाचे हे विधान अत्यंत खेदजनक, चुकीचे आणि टाळता येण्याजोगे होते, असे सांगत न्यायालयाने ही टिप्पणी पूर्वग्रहदूषित आणि विनेशविरुद्ध सूडबुद्धीची भावना दाखवणारी असल्याचे म्हटले आहे.
विनेशने २०२३ मध्ये कुस्ती महासंघाचे तत्कालीन अध्यक्ष बृजभूषण शरण सिंह यांच्या विरोधात झालेल्या कुस्तीपटूंच्या आंदोलनातही भाग घेतला होता.