ख्राईस्टचर्च : आगामी कसोटी मालिकेसाठी भारताचा संभाव्य तिसऱ्या क्रमांकाचा फलंदाज कोण असणार, या चर्चेला पूर्णविराम देत देवदत्त पडिक्कलने न्यूझीलंड-अ संघाविरुद्धच्या पहिल्या अनधिकृत कसोटीच्या दुसऱ्या डावात २४८ चेंडूंत शानदार १९९ धावांची खेळी साकारली. पंचांच्या चुकीच्या निर्णयामुळे पडिक्कलचे द्विशतक हुकल्याची चर्चा आहे. मात्र पडिक्कलमुळे भारत-अ संघ सुस्थितीत आहे.
तिसऱ्या दिवसअखेर भारत-अ संघाने पहिल्या डावातील ११३ धावांवर सर्वबाद होऊन २०० पेक्षा अधिक धावांची आघाडी गमावल्यानंतर दुसऱ्या डावात ८ फलंदाजांच्या मोबदल्यात ४८८ धावा अशी मजल मारली. अखेरच्या दिवसापूर्वी भारताकडे २८८ धावांची भक्कम आघाडी आहे. मध्यमगती गोलंदाज झॅक गिब्सनच्या चेंडूवर पंचांनी लेग साईडच्या दिशेने पडिकल्लला झेलबाद दिल्याने त्याचे विक्रमी द्विशतक अवघ्या एका धावेने हुकले. पंचांनी बोट वर करताच पडिक्कल अवाक झाला आणि त्याने आपण चेंडूला चटका दिला नसल्याचे हाताच्या इशाऱ्याने स्पष्ट केले. मैदानात काही क्षण स्तब्ध उभे राहून तो नाखुशीने डगआउटच्या दिशेने परतला. सामन्यात डीआरएस किंवा स्निकोमॅटर उपलब्ध नसल्यामुळे पडिक्कलकडे मैदान सोडण्याशिवाय दुसरा पर्याय उरला नव्हता. बाद होण्यापूर्वी पडीक्कलने २४८ चेंडूंचा सामना करताना २३ चौकार आणि ३ षटकार ठोकले.
श्रीलंकेविरुद्ध सलग दोन कसोटी शतके झळकावल्यानंतर पडिक्कलने तिसऱ्या क्रमांकाचे स्थान जवळपास निश्चित केले होते, परंतु न्यूझीलंडविरुद्धच्या दोन सामन्यांच्या मालिकेपूर्वी संघ व्यवस्थापनाला तंदुरुस्त झालेला साई सुदर्शन याचीही चाचपणी करायची होती. सुदर्शननेही प्रभावी खेळ करत ९१ धावांची खेळी केली आणि तिसऱ्या विकेटसाठी २१० धावांची भागीदारी रचली. सुदर्शनने १८४ चेंडूंत १२ चौकार लगावले, परंतु दोन्ही डाव्या हाताच्या फलंदाजांमध्ये पडिक्कल आपल्या फटक्यांच्या निवडीवर अधिक नियंत्रणात दिसून आला.
सुदर्शन शतक हुकल्यानंतर पडिक्कलला यश राठोडची (७२ चेंडूंत ६६ धावा) साथ लाभली आणि दोघांनी १४२ धावांची आणखी एक महत्त्वपूर्ण भागीदारी केली. पडिक्कल आणि राठोड बाद झाले तेव्हा भारताची आघाडी १६५ धावांची झाली होती. त्यानंतर वॉशिंग्टन सुंदरने (५१ नाबाद) अंशुल कंबोजसोबत (२३) ४१ धावांची भागीदारी केली आणि नंतर औकिब नबीसोबत (३८) ६९ धावांची भर घातली.