AFP Photo
क्रीडा

अव्वल दर्जाच्या खेळाडूंसह वावरण्यास आतुर : मॉर्केल; अनुभवी शिलेदारांना पाठिंबा देणार, भारताच्या नव्या गोलंदाजी प्रशिक्षकाचे मत

भारत-बांगलादेश कसोटी मालिका: नुभवी खेळाडूंना पाठिंबा देणे आणि सर्व खेळाडूंकडून त्यांची सर्वोत्तम कामगिरी करून घेणे, ही आमची जबाबदारी आहे. तसेच संघातील अव्वल दर्जाच्या खेळाडूंसह वावरण्यास मी आतुर आहे, असे भारतीय पुरुष क्रिकेट संघाचा नवनियुक्त गोलंदाजी प्रशिक्षक मॉर्ने मॉर्केल म्हणाला.

Swapnil S

चेन्नई : भारतीय संघाची प्रक्रिया ठरली आहे. प्रत्येक खेळाडूला आपली भूमिका ठाऊक आहे. त्यामुळे आम्ही यात कोणताही बदल करणार नाही. अनुभवी खेळाडूंना पाठिंबा देणे आणि सर्व खेळाडूंकडून त्यांची सर्वोत्तम कामगिरी करून घेणे, ही आमची जबाबदारी आहे. तसेच संघातील अव्वल दर्जाच्या खेळाडूंसह वावरण्यास मी आतुर आहे, असे भारतीय पुरुष क्रिकेट संघाचा नवनियुक्त गोलंदाजी प्रशिक्षक मॉर्ने मॉर्केल म्हणाला.

गेल्या महिन्यात गोलंदाजी प्रशिक्षकपदी निवड झाल्यानंतर मॉर्केल बांगलादेशविरुद्ध आगामी दोन सामन्यांच्या कसोटी मालिकेसाठी भारतीय संघाच्या सराव शिबिरात दाखल झाला आहे. दक्षिण आफ्रिकेचा ३९ वर्षीय माजी वेगवान गोलंदाज पहिल्या दिवशी केवळ खेळाडूंना आणखी जवळून जाणून घेण्याचा प्रयत्न करत होता. भारत-बांगलादेश यांच्यातील कसोटी मालिकेला १९ सप्टेंबरपासून चेन्नईत प्रारंभ होईल.

“भारतीय संघाची प्रक्रिया ठरलेली आहे. तिचे संरक्षण करणे आणि त्यात सुधारणेचा प्रयत्न करणे हे संघ व्यवस्थापन म्हणून आमचे ध्येय आहे. आम्ही खूप भाग्यवान आहोत, कारण आम्हाला खूप अनुभव असलेल्या खेळाडूंबरोबर काम करण्याची संधी मिळणार आहे. त्यांना पाठिंबा देणे आणि योग्य वेळी सल्ले देऊन थोडेफार मार्गदर्शन करणे, ही आमची जबाबदारी आहे,” असे मॉर्केल म्हणाला. मुख्य प्रशिक्षक गौतम गंभीरनेच गोलंदाजी प्रशिक्षकपदासाठी मॉर्केलच्या नावाची शिफारस केली होती.

“सध्याच्या भारतीय संघातील काही खेळाडूंविरुद्ध मी बरेच सामने खेळलो आहे. तसेच आयपीएलमुळे अन्य काही खेळाडूंशीही माझी ओळख झाली आहे. आता सराव शिबिरात त्यांना आणखी जवळून जाणून घेणे हाच माझा प्रयत्न आहे. विराट कोहली, जसप्रीत बुमरा, रोहित शर्मा यांसारख्या अव्वल दर्जाच्या खेळाडूंसह वावरण्यास मी आतुर आहे,” असे मॉर्केलने सांगितले. तसेच भारतीय संघाच्या गोलंदाजी प्रशिक्षकपदी नियुक्ती होणे हा आपल्या कारकीर्दीतील खास क्षणांपैकी एक आहे, असेही मॉर्केलने नमूद केले.

टी-२० मालिकेसाठी गिलला विश्रांती?

भारत-बांगलादेश यांच्यात ७ ऑक्टोबरपासून रंगणाऱ्या तीन सामन्यांच्या टी-२० मालिकेसाठी शुभमन गिलला विश्रांती देण्यात येणार असल्याचे समजते. गिलच्याच नेतृत्वाखाली भारताने झिम्बाब्वेविरुद्ध ४-१ अशा फरकाने टी-२० मालिका जिंकली होती. मात्र खेळाडूंवरील कामाच्या ताणाचे व्यवस्थापन म्हणजेच वर्कलोड मॅनेजमेंटच्या अंतर्गत गिलला विश्रांती दिली जाऊ शकते. गिल भारताच्या कसोटी व एकदिवसीय संघाचा सातत्याने भाग आहे. पुढील ३-४ महिन्यांत भारतीय संघ १० कसोटी सामने खेळणार असल्याने गिलला टी-२० मालिकेसाठी आराम दिला जाऊ शकतो. बांगलादेशविरुद्धच्या टी-२० मालिकेनंतर १६ ऑक्टोबरपासून भारत-न्यूझीलंड यांच्यात तीन सामन्यांची कसोटी मालिका सुरू होईल.

बांगलादेशचा संघ चेन्नईत दाखल

भारताविरुद्धच्या कसोटी मालिकेसाठी बांगलादेशचे खेळाडू रविवारी चेन्नई येथे दाखल झाले. नजमूल होसेन शांतेच्या नेतृत्वाखाली खेळताना बांगलादेशने नुकताच पाकिस्तानला त्यांच्याच भूमीत कसोटी मालिकेत २-० असे नेस्तनाबूत केले. त्यामुळे भारतीय संघ बांगलादेशला कमी लेखू शकत नाही. जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेच्या गुणतालिकेत भारत अग्रस्थानी असून बांगलादेश चौथ्या क्रमांकावर आहे. उभय संघांतील दुसरी कसोटी २७ सप्टेंबरपासून कानपूर येथे होईल.

राज्यात ६० टक्के मतदान; सर्वाधिक ६९.२२ टक्के मतदान गडचिरोलीत

सिंहासनासाठी काँटे की टक्कर! ‘एक्झिट पोल’च्या आकड्यांमध्ये संमिश्र कौल

सुसंस्कृत महाराष्ट्रातही मतदानादरम्यान हिंसक घटना

चार राज्यांतील पोटनिवडणुकीत ५० टक्क्यांपेक्षा अधिक मतदान

मुंबईत मतदारांमध्ये निरूत्साह! केवळ ५१.४१ टक्के मतदान; अनेक मतदारांची मतदानाकडे पाठ