FIFA World Cup 2026 : पिछाडीवरून भरारी, अर्जेंटिनाची बातच न्यारी! २-१ अशा विजयासह सलग दुसऱ्यांदा अंतिम फेरीत धडक; इंग्लंडचा पुन्हा स्वप्नभंग (Photo- X)
क्रीडा

FIFA World Cup 2026 : पिछाडीवरून भरारी, अर्जेंटिनाची बातच न्यारी! २-१ अशा विजयासह सलग दुसऱ्यांदा अंतिम फेरीत धडक; इंग्लंडचा पुन्हा स्वप्नभंग

लिओनेल मेस्सीच्या नेतृत्वात खेळणाऱ्या अर्जेंटिनाने ते गतविजेते का आहेत, हे बुधवारी मध्यरात्री पुन्हा एकदा दाखवून दिले.

Swapnil S

अटलांटा : लिओनेल मेस्सीच्या नेतृत्वात खेळणाऱ्या अर्जेंटिनाने ते गतविजेते का आहेत, हे बुधवारी मध्यरात्री पुन्हा एकदा दाखवून दिले. ८५व्या मिनिटापर्यंत ०-१ अशा पिछाडीवर असताना मेस्सीच्या दोन सुरेख असिस्टवर एन्झो फर्नांडेझ आणि लॉटारो मार्टिनेझ यांनी अफलातून गोल नोंदवले. त्यामुळे अर्जेंटिनाने फिफा विश्वचषक फुटबॉल स्पर्धेत पिछाडीवरून सरशी साधताना रोमहर्षक उपांत्य लढतीत इंग्लंडवर २-१ अशी मात केली. याबरोबरच अर्जेंटिनाने सलग दुसऱ्यांदा अंतिम फेरीत धडक मारली, तर ६० वर्षांनी अंतिम फेरी गाठण्याचे इंग्लंडचे स्वप्न धुळीस मिळाले.

अटलांटा स्टेडियमवर ६८ हजारांहून अधिक प्रेक्षकांच्या साक्षीने झालेल्या उभय संघांतील या लढतीत दोन्ही संघांमध्ये पहिल्या मिनिटापासूनच जोरदार संघर्ष पाहायला मिळाला. मात्र अर्जेंटिनाने अखेरीस अनुभव आणि प्रामुख्याने दुसऱ्या सत्रात केलेल्या आक्रमणाच्या बळावर हॅरी केनच्या नेतृत्वात खेळणाऱ्या इंग्लंडवर वर्चस्व गाजवले. १९७८, १९८६ व २०२२च्या विजेत्या अर्जेंटिनाला आता चौथ्या जेतेपदाची संधी असून त्यांनी एकंदर सातव्यांदा अंतिम फेरीत प्रवेश केला आहे. रविवारी मध्यरात्री न्यू जर्सी येथील मेटलाइफ स्टेडियमवर रंगणाऱ्या महाअंतिम मुकाबल्यात अर्जेंटिनाची स्पेनशी गाठ पडेल. या निमित्ताने चाहत्यांना ३९ वर्षीय मेस्सी आणि १९ वर्षीय लॅमिन यमाल यांच्यातील जुगलबंदी पाहायला मिळेल. बार्सिलोना फुटबॉल क्लबच्या चाहत्यांसाठी हा क्षण खास असेल.

गेल्या महिनाभरापासून सुरू झालेला फिफा विश्वचषकाचा थरार आता अंतिम टप्प्यात आहे. ४८ संघांपासून सुरू झालेला हा प्रवास उपांत्य फेरीतील चार संघांपर्यंत येऊन ठेपला, तेव्हा सर्वच संघ तुल्यबळ असल्याने कोण बाजी मारेल, हे ठामपणे सांगणे कठीण होते. पहिल्या उपांत्य लढतीत स्पेनने फ्रान्सची मक्तेदारी मोडीत काढून १६ वर्षांनी अंतिम फेरी गाठली, तर आता अर्जेंटिनाने आणखी एका ऐतिहासिक जेतेपदाच्या दिशेने पाऊल टाकताना सर्वांना मंत्रमुग्ध केले आहे. ब्राझील, जर्मनी, नेदरलँड्स, पोर्तुगाल, मोरोक्को यांसारख्या अनेक संघांच्या पदरी यावेळीही निराशा पडली. अर्जेंटिना व स्पेनने मात्र सातत्यपूर्ण कामगिरीच्या बळावर इथवर मजल मारली, हे विशेष.

दरम्यान, अर्जेंटिनाने साखळीत सलग तीन विजय मिळवताना अनुक्रमे अल्जेरिया, ऑस्ट्रिया व जॉर्डन यांना धूळ चारली. त्यानंतर राऊंड ऑफ ३२ लढतीत केप व्हर्डे व उपउपांत्यपूर्व लढतीत इजिप्तविरुद्ध अर्जेंटिनाने अनुक्रमे ३-२ असा विजय मिळवला. उपांत्यपूर्व सामन्यात अतिरिक्त वेळेत त्यांनी स्वित्झर्लंडवर ३-१ अशी मात केली होती. दुसरीकडे १९६६च्या विजेत्या इंग्लंडने साखळी फेरीत क्रोएशिया व पनामाला धूळ चारली, तर घानाविरुद्ध बरोबरी पत्करली. मग बाद फेरीत काँगोविरुद्ध २-१, तर मेक्सिकोविरुद्ध त्यांनी ३-२ अशी सरशी साधली. उपांत्यपूर्व फेरीत हालँडच्या नॉर्वेला २-१ असे नमवून एकंदर इंग्लंडने चौथ्यांदा उपांत्य फेरीत प्रवेश केला. मात्र २०१८ व १९९०प्रमाणेच इंग्लंडला पुन्हा एकदा उपांत्य फेरीत पराभवाला सामोरे जावे लागले.

उभय संघांतील पहिल्या सत्रात दोन्ही संघांतील खेळाडूंमध्ये शाब्दिक तसेच शारीरिक द्वंद्वही पाहायला मिळाले. ४५ मिनिटांपर्यंत गोलशून्य बरोबरी कायम होती. काही खेळाडूंना पिवळे कार्डही दाखवण्यात आले. मेस्सीदेखील संघर्ष करताना दिसला. दुसऱ्या सत्रात इंग्लंडसाठी अँथोनी गॉर्डनने ५५व्या मिनिटाला पहिला गोल करून आघाडी मिळवून दिली होती. या गोलनंतर इंग्लंडचा संघ विजयाच्या आशा बाळगून होता. सामना जसजसा पुढे सरकत होता, तसा अर्जेंटिनाने आक्रमणाचा वेग वाढवला. अर्जेंटिनाच्या एकामागून एक येणाऱ्या आक्रमणांसमोर इंग्लंडचा बचाव फसला. इंग्लंडचा गोलकीपर जॉर्डन पिकफोर्ड याने काही महत्त्वाचे बचाव केले, तर मॅक ॲलिस्टर याचा हेडर पोस्टला लागून परतला.

अखेरीस ८५व्या मिनिटाला फर्नांडेझची एक संधी हुकल्यावर काही सेकंदातच त्याने मेस्सीच्या पासवर पुन्हा एकदा अफलातून किक लगावत पिकफोर्डला चकवले व अर्जेंटिनाला बरोबरी साधून दिली. यानंतर भरपाई वेळेत (९०+२ मि.) मेस्सीने दिलेल्या क्रॉसवर बदली खेळाडू मार्टिनेझने शानदार हेडर लगावून अर्जेंटिनाच्या २-१ अशा विजयावर शिक्कामोर्तब केले. मार्टिनेझ याने सांगितले की, “मी गोल करणार आणि सामना जिंकणार असे स्वप्न पाहिले होते. मी मॅकला हे आधीच सांगितले होते. आमचा संघ कोणत्या जिद्दीचा आहे, हे आम्ही पुन्हा दाखवून दिले.” अर्जेंटिनाचे प्रशिक्षक लिओनेल स्कलोनी यांनी संघाच्या एकजुटीचे कौतुक केले. “हा आमच्यातील बंधुभाव आणि शेवटपर्यंत लढण्याच्या वृत्तीचा विजय आहे. आम्ही मैदानावर सर्वस्व पणाला लावले होते.

दुसरीकडे, इंग्लंडचा संघ आघाडीवर असताना सामना गमावण्याच्या जुन्या चुकीचा पुन्हा बळी ठरला. इंग्लंडचे प्रशिक्षक थॉमस टुचेल यांच्या बदलांच्या रणनीतीवर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले, कारण ते अधिक गोल करण्याऐवजी आघाडी टिकवण्याचा प्रयत्न करत असल्याचे दिसले. टुचेल यांनी कबूल केले की, “अर्जेंटिना अधिक जोखीम घेऊन खेळला आणि त्यांच्याकडे गमावण्यासारखे काही नव्हते, तर आम्ही खूप काही गमावण्याच्या भीतीने खेळत होतो.” कर्णधार केन म्हणाला की, “आम्ही येथे पोहोचण्यासाठी खूप मेहनत घेतली होती. पण अशा प्रकारे पराभूत होणे अत्यंत निराशाजनक आहे.”

केनसह इंग्लंडचा प्रवास संपला असला, तरी ३९ वर्षांचा मेस्सी आपल्या शेवटच्या विश्वचषकात इतिहास रचण्यापासून अवघा एक पाऊल दूर आहे. त्यामुळे सर्वांना आता महाअंतिम सामन्याचे वेध लागले आहेत.

  • अर्जेंटिनाने विश्वचषकातील सलग १३ सामन्यांत किमान २ किंवा त्याहून अधिक गोल करण्याचा पराक्रम केला आहे. त्यांनी उरुग्वेचा ७४ वर्षांपूर्वीचा ११ सामन्यांचा विक्रम मागेच मोडला. अर्जेंटिनाने २०२२च्या विश्वचषकात मेक्सिकोविरुद्धच्या लढतीपासून या विक्रमाची सुरुवात केली आहे.

  • अर्जेंटिना आजवर एकदाही विश्वचषकाच्या उपांत्य फेरीत पराभूत झालेली नाही. १९३०, १९८६, १९९०, २०१४, २०२२, २०२६ अशा सहाही वेळी त्यांनी उपांत्य लढतीत बाजी मारली आहे.

  • मेस्सीने विश्वचषकात पाचव्यांदा सामनावीर पुरस्कार पटकावला. याबरोबरच त्याने यंदाच्या विश्वचषकात सर्वाधिक सामनावीर पुरस्कार जिंकणाऱ्यांच्या यादीत अग्रस्थान पटकावत इंग्लंडच्या बेलिंघमवर (४ वेळा) सरशी साधली.

  • अर्जेंटिनाने या स्पर्धेत आतापर्यंत ७ सामन्यांत एकूण १९ गोल केले आहेत. फिफा विश्वचषकाच्या इतिहासात प्रथमच अर्जेंटिनाने एखाद्या स्पर्धेत इतके गोल केले. यापूर्वी १९३०च्या विश्वचषकात त्यांनी ५ सामन्यांत १८ गोल नोंदवले होते.

गोलफलक

अर्जेंटिना (२) - इंग्लंड (१)

एन्झो फर्नांडेझ (८५वे मिनिट) - अँथोनी गॉर्डन (५५वे मिनिट)

मार्टिनेझ (९०+२)

अंतिम सामना नव्हे, फिनालिसिमा

दक्षिण अमेरिकन आणि युरोपियन फुटबॉल महासंघाद्वारे दर ४ वर्षांनी फिनालिसिमाचे आयोजन केले जाते. यामध्ये कोपा अमेरिका स्पर्धेतील विजेता विरुद्ध युरो चषकातील विजेता आमनेसामने येतात. २०२४मध्ये अर्जेंटिनाने कोपा अमेरिका स्पर्धा जिंकली, तर त्याच वर्षी स्पेनने युरो चषकाचे जेतेपद काबिज केले. मात्र आयोजनाच्या ठिकाणावरून झालेल्या काही वादामुळे यांच्यातील फिनालिसिमा लढत होऊ शकली नाही. आता अखेरीस विश्वचषकाच्या अंतिम सामन्याच्या निमित्ताने उभय संघ आमनेसामने येतील. त्यामुळे फुटबॉलप्रेमी या लढतीकडे फिनालिसिमा म्हणूनही पाहत आहेत. २०२२मध्ये झालेल्या अखेरच्या फिनालीसिमामध्ये अर्जेंटिनाने त्यावेळच्या युरो चषक विजेत्या इटली संघाला ३-० अशी धूळ चारली होती.

३५ टक्के भारतीयांचा अर्जेंटिनाला पाठिंबा

एका सर्वेक्षणानुसार भारतातील ३५ टक्के चाहते यंदाच्या विश्वचषकात अर्जेंटिनाला पाठिंबा दर्शवत असल्याचे स्पष्ट झाले. ब्राझील, इंग्लंड या यादीत अनुक्रमे दुसऱ्या व तिसऱ्या क्रमांकावर होते. तसेच भारतात मोठ्या प्रमाणावर अर्जेंटिना विरुद्ध इंग्लंड यांच्यातील उपांत्य सामना पाहिला गेला. यंदाच्या विश्वचषकात इंग्लंड विरुद्ध मेक्सिको लढतीला स्टेडियममध्ये आतापर्यंत सर्वाधिक उपस्थिती लाभली होती. फिफाच्या आकडेवारीनुसार ८० हजारांहून अधिक प्रेक्षक त्या लढतीसाठी उपस्थित होते. मात्र भारतात टीव्ही, मोबाईल अथवा अन्य उपकरणांद्वारे अर्जेंटिनाचे सामने सर्वाधिक पाहिले जात आहेत.

‘ते पुन्हा रिकाम्या हाताने परतत आहेत’

‘इट्स कमिंग होम’ अर्थात यंदा विश्वचषक आपल्या घरी येत आहे, या आशेने इंग्लंडचा संघ विश्वचषकात उस्फुर्तपणे सहभागी होतो. मात्र त्यांच्या पदरी पुन्हा एकदा निराशा पडली आहे. १९६६च्या विश्वचषक विजेत्या इंग्लंडला यंदा ६० वर्षांनी अंतिम फेरी गाठण्याची संधी होती. मात्र अर्जेंटिनासमोर ते पुन्हा फिके पडले. १९८६च्या विश्वचषकात त्यांना मॅराडोनाच्या हँड ऑफ गॉड गोलद्वारे पराभव पत्करावा लागला होता. यंदा मेस्सीच्या मॅजिकसमोर इंग्लंड फिकी पडली. त्यामुळे समाज माध्यमांवर इंग्लंड रिकाम्या हाताने घरी परतत आहे, असे मीम्स वायरल झाले आहेत.

‘गोल्डन बूट’मध्ये मेस्सीची आघाडी

एकीकडे विश्वचषकाचा थरार वाढत असतानाच गोल्डन बूटमधील चुरसही रंगतदार ठरत आहे. मेस्सीने इंग्लंडविरुद्ध केलेल्या दोन असिस्टच्या (पास) बळावर गोल्डन बूटच्या शर्यतीत आघाडी घेतली आहे. मेस्सी आणि फ्रान्सचा एम्बाप्पे या दोघांच्याही खात्यात यंदाच्या विश्वचषकात ७ सामन्यांत ८ गोल आहेत. मात्र मेस्सीच्या नावे आता ४ असिस्ट आहेत, तर एम्बाप्पेकडे ३ असिस्ट आहेत. फ्रान्स आणि इंग्लंड यांच्यात शनिवारी तिसऱ्या क्रमांकाचा सामना होईल. त्यामध्ये एम्बाप्पेला पुन्हा आघाडी घेण्याची संधी आहे. मात्र रविवारी महाअंतिम मुकाबल्यात मेस्सी एम्बाप्पेवर सरशी साधू शकतो.

महाअंतिम सामना - अर्जेंटिना वि. स्पेन

  • वेळ : २० जुलै, सोमवार (मध्यरात्री १२.३० वाजता)

  • थेट प्रक्षेपण : यूनाइट८ स्पोर्ट्स आणि झी५ ॲप

(संबंधित इंग्रजी बातमी वाचण्यासाठी येथे क्लिक करा.)

सोनम वांगचुक यांच्या प्रकृतीवर लक्ष ठेवा; दिल्ली उच्च न्यायालयाचे निर्देश

वाहनांसाठीचे नियम कडक; एप्रिल २०२७ पासून कॅफे-३ इंधन कार्यक्षमता लागू करण्याचा सरकारचा प्रस्ताव

Pune : सिया गोयलच्या वडिलांचे दुकान सील

ई२० पेट्रोलमुळे झाले नुकसान; मारुतीला भरपाई देण्याचे आदेश, पहिला आदेश ठरला ऐतिहासिक

२० वर्षांचा मेस्सी आणि ‘ते’ बाळ