मियामी गार्डन्स : स्टार खेळाडू जुड बेलिंघमने केलेल्या दोन गोलच्या जोरावर इंग्लंडने नॉर्वेचा २-१ असा पराभव करून २०१८ नंतर पहिल्यांदाच फुटबॉल विश्वचषक स्पर्धेच्या उपांत्य फेरीत प्रवेश केला.
रिअल माद्रिदच्या या स्टार खेळाडूने पहिल्या हाफमध्ये बरोबरी साधणारा गोल केला आणि त्यानंतर अतिरिक्त वेळेच्या तिसऱ्या मिनिटाला विजयी गोल डागून इंग्लंडला शानदार विजय मिळवून दिला. या स्पर्धेत बेलिंघमने हॅरी केनच्या सहा गोलची बरोबरी केली असून ते फ्रान्सच्या किलियन एमबापे आणि अर्जेंटिनाच्या लिओनेल मेस्सीपेक्षा दोन गोल मागे आहेत. इंग्लंडचा संघ आता उपांत्य फेरीत अर्जेंटिनाविरुद्ध खेळेल. सामन्याच्या सुरुवातीला मियामीमधील तापमान ३३ अंश सेल्सिअसपर्यंत पोहोचल्याने खेळाडूंना प्रचंड उष्णता आणि दमट वातावरणाचा सामना करावा लागला.
सामन्यात नॉर्वेच्या अँड्रियास श्वेलडेरपने ३६व्या मिनिटाला गोल करून इंग्लंडला धक्का दिला होता. या सामन्यात नॉर्वेचा स्टार स्ट्रायकर अर्लिंग हॅलंड याला इंग्लंडच्या बचाव फळीने एकही गोल करू दिला नाही. मँचेस्टर सिटीचा स्टार असलेल्या हॅलंडला थकवा आणि पायाला लागलेल्या दुखापतीमुळे अतिरिक्त वेळेच्या उत्तरार्धात राखीव खेळाडू जोर्गेन स्ट्रँड लार्सन याच्या जागी मैदानाबाहेर बोलावण्यात आले. नॉर्वेचे मुख्य प्रशिक्षक स्टाले सोलबॅकन यांनी सांगितले की, हॅलंडला बाहेर काढण्याचा निर्णय कठीण नव्हता कारण तो पूर्णपणे थकला होता. यापूर्वी सामन्याच्या ५६ व्या मिनिटाला टॉरब्योर्न हेगेमने गोल केला होता, मात्र व्हिडिओ रिव्ह्यू म्हणजेच 'व्हीएआर' नंतर हॅलंडने बॉक्समध्ये फौल केल्याचे स्पष्ट झाल्याने हा गोल नाकारण्यात आला.
इंग्लंडचे मुख्य प्रशिक्षक थॉमस टुचेल यांनी संघाच्या विजयावर आनंद व्यक्त केला असला तरी कामगिरीवर नाराजी जाहीर केली. आम्ही आज स्वतःसाठी गोष्टी खूप कठीण केल्या, निकालाने मी खूश आहे पण कामगिरी समाधानकारक नव्हती, असे टुचेल म्हणाले. यावर बेलिंगहॅमने प्रशिक्षकांच्या टीकेशी असहमती दर्शवत मैदानावरील खेळाडूंच्या कष्टाचे कौतुक केले.
बेलिंगहॅम म्हणाला की, खेळाचे अनेक पैलू असतात, पण माझ्यासाठी मानसिक बाजू सर्वात महत्त्वाची आहे. प्रतिकूल परिस्थिती कशी हाताळायची हे या संघाने पुन्हा एकदा दाखवून दिले आहे. सामन्यादरम्यान बेलिंगहॅमच्या गोलपूर्वी नॉर्वेची गोल किक हवेतील कॅमेरा केबलला लागल्याचा संशय होता, मात्र 'फिफा'ने बॉलच्या सेन्सरचा हवाला देत बॉल केबलला स्पर्श केला नसल्याचे स्पष्ट केले. दरम्यान, सामना सुरू होण्यापूर्वी दक्षिण आफ्रिकेचा २५ वर्षीय मिडफिल्डर जेडेन ॲडम्स याच्या निधनाबद्दल आदर व्यक्त करत काही काळ स्तब्धता पाळण्यात आली.
दरम्यान, फिफा विश्वचषकाचा थरार गेल्या महिनाभरापासून सुरू असून आता ही स्पर्धा उपांत्य फेरीच्या टप्प्यावर आहे. फ्रान्स, मोरोक्को, स्पेन, बेल्जियम, इंग्लंड, नॉर्वे, अर्जेंटिना व स्वित्झर्लंड या आठ संघांनी उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश केला होता. मात्र त्यांपैकी फ्रान्स, स्पेन, इंग्लंड व अर्जेंटिना यांनी आगेकूच केली, तर अन्य चार संघांची वाटचाल संपुष्टात आली.