फोक्सबरो : विश्वातील आघाडीचा फुटबॉलपटू किलियान एम्बाप्पेने पेनल्टीवर गोल करण्यात आलेले अपयश बाजूला सारून दुसऱ्या सत्रात झळकावलेल्या अफलातून गोलच्या बळावर फ्रान्सने विजयी डान्स केला. फिफा विश्वचषक फुटबॉल स्पर्धेत शुक्रवारी झालेल्या उपांत्यपूर्व लढतीत गतउपविजेत्या फ्रान्सने मोरोक्कोवर २-० असे वर्चस्व गाजवून सलग तिसऱ्यांदा उपांत्य फेरीत धडक मारली. उस्माने डेम्बेलेने अन्य गोल नोंदवून फ्रान्सच्या विजयात मोलाचे योगदान दिले.
बोस्टन स्टेडियमवर ६३ हजारांहून अधिक प्रेक्षकांच्या उपस्थितीत झालेल्या या लढतीतील विजयासह फ्रान्सने आता तिसऱ्या जेतेपदाच्या दिशेने पाऊल टाकले आहे. १९९८ व २०१८च्या विजेत्या फ्रान्सला २०२२मध्ये अंतिम फेरीत पराभव पत्करावा लागला होता. त्यावेळी त्यांनी मोरोक्कोला उपांत्य फेरीत नमवले होते, तर यंदा उपांत्यपूर्व लढतीत मोरोक्कोवर मात करून फ्रान्सने आगेकूच केली. आता बुधवार, १५ जुलै रोजी होणाऱ्या उपांत्य लढतीत फ्रान्ससमोर स्पेन किंवा बेल्जियमचे आव्हान असेल.
फिफा विश्वचषकाच्या २३व्या पर्वाचा थरार गेल्या महिनाभरापासून सुरू असून आता ही स्पर्धा उपांत्यपूर्व फेरीच्या टप्प्यावर आहे. फ्रान्स, मोरोक्को, स्पेन, बेल्जियम, इंग्लंड, नॉर्वे, अर्जेंटिना व स्वित्झर्लंड या आठ संघांनी उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश केला असून आता प्रत्येकी लढतीनंतर रोमांच वाढणार आहे. नुकताच झालेल्या उपउपांत्यपूर्व फेरीतून ब्राझील, पोर्तुगाल, पॅराग्वे, कोलंबिया, इजिप्त यांच्यासह अमेरिका, कॅनडा, मेक्सिको या यजमान देशांनाही गाशा गुंडाळावा लागला. आता फ्रान्सच्या विजयासह मोरोक्कोचे आव्हान संपुष्टात आले आहे. पुढील काही दिवसांत उपांत्य फेरीतील अन्य तीन संघ स्पष्ट होतील.
दरम्यान, फ्रान्सने यंदाच्या विश्वचषकात उपांत्यपूर्व लढतीपूर्वी ५ सामन्यांत १४ गोल नोंदवले होते. त्यांनी साखळीत इराक, सेनेगल, नॉर्वे यांना धूळ चारली, तर राऊंड ऑफ ३२ लढतीत स्वीडनला नमवले. शुक्रवारी मोरोक्कोविरुद्ध देखील फ्रान्सने चेंडूवर ताबा राखला. २८व्या मिनिटाला एम्बाप्पेला पेनल्टी बॉक्समध्ये पाडल्याने फ्रान्सला पेनल्टी बहाल करण्यात आली. मात्र वीएआरद्वारे तपासणी करण्यात ३ मिनिटे वाया गेली. अखेरीस मोरोक्कोचा गोलरक्षक बोनोने एम्बाप्पेची पेनल्टी अडवून खळबळ बाजवली. मध्यंतरापर्यंत दोन्ही संघांत गोलशून्य बरोबरी होती.
दुसऱ्या सत्रात मात्र फ्रान्सने आक्रमणाची धार वाढवली. अखेरीस ६०व्या मिनिटाला डिझायरच्या पासवर डेम्बेलेने अफलातून किक लगावून पहिला गोल नोंदवला. एम्बाप्पेचा हा यंदाच्या विश्वचषकातील आठवा, तर विश्वचषक कारकीर्दीतील एकंदर २०वा गोल ठरला. यानंतर ६६व्या मिनिटाला डेम्बेलेने स्पर्धेतील त्याचा पाचवा गोल नोंदवत फ्रान्सचा विजय पक्का केला. विजयानंतर फ्रान्सच्या खेळाडूंनी मैदानातच नृत्य केले.
सामन्याच्या ७६व्या मिनिटाला मोरोक्कोच्या डिफेंडरने केलेल्या एका जोरदार टॅकलमुळे एम्बाप्पे मैदानावर पडला आणि त्याला एका मिनिटानंतर बदली खेळाडू म्हणून मैदानाबाहेर घेण्यात आले. बेंचवर बसलेल्या एम्बाप्पेच्या घोट्याला आईस पॅक लावण्यात आला होता. मात्र, सामन्यानंतर त्याने दोन्ही बूट घालून सहकाऱ्यांसोबत मैदानात उड्या मारत जल्लोष केला. घोट्याला मार लागला असला तरी आपण ठीक असल्याचे एम्बाप्पेने सांगितले.
फ्रान्सचे मुख्य प्रशिक्षक दिदिएर डेसचॅम्प्स यांनी खेळाडूंचे कौतुक करत कामगिरीतील सातत्य राखल्याने हा विजय मिळवल्याचे मत व्यक्त केले. एकूणच फ्रान्सचा संघ यंदा जेतेपदासाठी फेव्हरिट असून त्यांना कोण रोखणार, हे पाहणे रंजक ठरेल.
फ्रान्स हा सलग तीन विश्वचषकांत किमान उपांत्य फेरी गाठणारा तिसरा देश ठरला आहे. यापूर्वी ब्राझील व जर्मनी यांनी अशी कामगिरी केली आहे.
फ्रान्सने एकंदर आठव्यांदा विश्वचषकाची उपांत्य फेरी गाठली आहे. यापूर्वी ३ वेळा त्यांना उपांत्य फेरीत पराभव पत्करावा लागला आहे.
गोलफलक
फ्रान्स (२) - मोरोक्को (०)
एम्बाप्पे (६० मि.)
डेम्बेले (६६ मि.)
गोल्डन बूटसाठी चुरस
एम्बाप्पेने या सामन्यात यंदाच्या विश्वचषकातील आठवा गोल नोंदवला. याबरोबरच त्याने पुन्हा एकदा गोल्डन बूटच्या शर्यतीत अग्रस्थान पटकावले.
अर्जेंटिनाच्या लिओनेल मेस्सीचेदेखील ८ गोल आहेत. मात्र एम्बाप्पेने ३ गोलसाठी सहाय्य (असिस्ट) केले आहेत, तर मेस्सीने एकाच गोलसाठी असिस्ट केला आहे. त्यामुळे मेस्सीपेक्षा एक लढत अधिक खेळूनही एम्बाप्पे सध्या वरचढ आहे. नाॅर्वेचा हालँड ७ गोलसह तिसऱ्या, इंग्लंडचा हॅरी केन ६ गोलसह चौथ्या स्थानी आहे.
आजवरच्या सर्व विश्वचषकांत सर्वाधिक गोल करणाऱ्यांच्या यादीत एम्बाप्पे २० गोलसह दुसऱ्या स्थानी आहे. मेस्सी या यादीत २१ गोलसह अग्रस्थानी आहे.