X
क्रीडा

FIFA World Cup 2026 : फ्रान्सचे आक्रमण की स्पेनचे नियंत्रण? आज पहिला उपांत्य सामना; एम्बाप्पे-सिमॉन द्वंद्व ठरणार निर्णायक

फिफा विश्वचषक फुटबॉल स्पर्धेत मंगळवारी मध्यरात्री (भारतीय वेळेनुसार बुधवारी १२.३० वाजता) फ्रान्स आणि स्पेन या दोन युरोपियन खंडातील फुटबॉल महासत्तांमध्ये पहिला उपांत्य सामना रंगणार आहे. एकीकडे आक्रमणावर भर देणारा फ्रान्स आणि दुसरीकडे भक्कम बचाव करणारा स्पेन यांच्यातील या जुगलबंदीकडे सर्वांचे लक्ष लागून आहे.

Swapnil S

अर्लिंग्टन : फिफा विश्वचषक फुटबॉल स्पर्धेत मंगळवारी मध्यरात्री (भारतीय वेळेनुसार बुधवारी १२.३० वाजता) फ्रान्स आणि स्पेन या दोन युरोपियन खंडातील फुटबॉल महासत्तांमध्ये पहिला उपांत्य सामना रंगणार आहे. एकीकडे आक्रमणावर भर देणारा फ्रान्स आणि दुसरीकडे भक्कम बचाव करणारा स्पेन यांच्यातील या जुगलबंदीकडे सर्वांचे लक्ष लागून आहे. तसेच किलियान एम्बाप्पे विरुद्ध उनाई सिमॉन, लॅमिन यमाल यांच्यातील द्वंद्व निर्णायक ठरेल.

फिफा विश्वचषकाचा थरार गेल्या महिनाभरापासून सुरू असून आता ही स्पर्धा उपांत्य फेरीच्या टप्प्यावर आहे. फ्रान्स, मोरोक्को, स्पेन, बेल्जियम, इंग्लंड, नॉर्वे, अर्जेंटिना व स्वित्झर्लंड या आठ संघांनी उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश केला होता. मात्र त्यांपैकी फ्रान्स, स्पेन, इंग्लंड व अर्जेंटिना यांनी आगेकूच केली, तर अन्य चार संघांची वाटचाल संपुष्टात आली. पुढील रविवारी रंगणाऱ्या महाअंतिम मुकाबल्याची आता सर्वांना चाहुल लागली असून त्यापूर्वी उपांत्य सामन्यांमध्ये कोण बाजी मारणार, हे पहावे लागेल.

२७ वर्षीय एम्बाप्पेच्या नेतृत्वात खेळणाऱ्या फ्रान्सने यंदाच्या विश्वचषकात उपांत्यपूर्व लढतीपूर्वी ५ सामन्यांत १४ गोल नोंदवले होते. त्यांनी साखळीत इराक, सेनेगल, नॉर्वे यांना धूळ चारली, तर राऊंड ऑफ ३२ लढतीत स्वीडनला नमवले. मग उपांत्यपूर्व सामन्यात मोरोक्कोला २-० असे नमवून फ्रान्सने सलग तिसऱ्यांदा विश्वचषकाची उपांत्य फेरी गाठली. १९९८ व २०१८च्या विजेत्या फ्रान्सला २०२२मध्ये अंतिम फेरीत पराभव पत्करावा लागला होता. फ्रान्स हा सलग तीन विश्वचषकांत किमान उपांत्य फेरी गाठणारा तिसरा देश ठरला आहे. यापूर्वी ब्राझील व जर्मनी यांनी अशी कामगिरी केली आहे. तसेच फ्रान्सने एकंदर आठव्यांदा विश्वचषकाची उपांत्य फेरी गाठली आहे. यापूर्वी ३ वेळा त्यांना उपांत्य फेरीत पराभव पत्करावा लागला आहे.

एम्बाप्पेने स्पर्धेत ८ गोल केले असून ३ गोलसाठी सहाय्य (असिस्ट) केले आहे. त्यामुळे गोल्डन बूटच्या शर्यतीत एम्बाप्पे अग्रस्थानी असून त्याला विश्वचषकात सर्वाधिक गोल करणाऱ्यांच्या यादीत अर्जेंटिनाच्या लिओनेल मेस्सीची (२१) बरोबरी साधण्यासाठी अवघा एक गोल हवा आहे. फ्रान्ससाठी उस्माने डेम्बेले, ओलिस यांनीही छाप पाडली आहे. एकूणच फ्रान्सचा संघ मिडफील्ड व बचावातही कमाल करत असल्याने स्पेनची कसोटी लागेल.

दुसरीकडे रॉड्रीच्या नेतृत्वात खेळणाऱ्या स्पेनने यंदा साखळी फेरीत ह-गटातून अग्रस्थानासह आगेकूच करताना सौदी अरेबिया व उरुग्वे यांना धूळ चारली, तर केप व्हर्डेविरुद्ध बरोबरी पत्करली. त्यानंतर बाद फेरीत (राऊंड ऑफ ३२) स्पेनने ऑस्ट्रियाला ३-० असे नेस्तनाबूत केले, तर उपउपांत्यपूर्व लढतीत रोनाल्डोच्या पोर्तुगालचा स्वप्नभंग करताना १-० असा विजय मिळवला. या पाचही लढतीत स्पेनने एकही गोल स्वीकारलेला नव्हता. उपांत्यपूर्व फेरीत बेल्जियमविरुद्ध त्यांनी २-१ असा विजय मिळवला. त्यामुळे त्यांची गोल न स्वीकारण्याची मालिका खंडीत झाली. स्पेनने २०१०नंतर प्रथमच उपांत्य फेरी गाठलेली आहे. त्यावेळी त्यांनी विश्वचषक उंचावला होता. तसेच २०२४च्या युरो चषकात फ्रान्सने स्पेनला नमवले होते. त्यामुळे यंदाही ते कामगिरीची पुनरावृत्ती करण्यास आतुर असतील.

स्पेनचा गोलरक्षक सिमॉनसह अन्य बचावपटूंना भेदण्यात बेल्जियमवव्यतिरिक्त कोणालाही यश लाभलेले नाही. त्यामुळेच स्पेनच्या बचावफळीविरुद्ध फ्रान्सच्या आक्रमकांचा कस लागेल. त्याशिवाय मिकेल ओयारझबाल, १८ वर्षीय लॅमिन यमाल असे प्रतिभावान आक्रमक व डॅनी ओल्मो, पेड्री, रॉड्री असे मध्यरक्षक स्पेनच्या ताफ्यात आहेत. ओयारझबालने स्पेनकडून या विश्वचषकात सर्वाधिक ४ गोल केले आहेत. तसेच पोर्तुगाल व बेल्जियमविरुद्ध निर्णायक गोल करणारा मिकेल मेरिनो स्पेनसाठी तारणहार ठरत आहे.

फ्रान्स हा सलग तीन विश्वचषकांत किमान उपांत्य फेरी गाठणारा तिसरा देश ठरला आहे. यापूर्वी ब्राझील व जर्मनी यांनी अशी कामगिरी केली आहे.

फ्रान्सने एकंदर आठव्यांदा विश्वचषकाची उपांत्य फेरी गाठली आहे. यापूर्वी ३ वेळा त्यांना उपांत्य फेरीत पराभव पत्करावा लागला आहे.

स्पेनने एकंदर दुसऱ्यांदा विश्वचषकाची उपांत्य फेरी गाठली आहे. २०१०मध्ये त्यांनी जेतेपद मिळवले होते. १९५०मध्ये स्पेनने चौथे स्थान मिळवले होते. मात्र त्यावेळी उपांत्य फेरी न खेळवता थेट गटातील विजेत्याला अंतिम फेरीचा मान दिला जायचा.

आमनेसामने

उभय संघांत आतापर्यंत ३८ सामने झाले आहेत. त्यांपैकी स्पेनने १८, तर फ्रान्सने १३ लढती जिंकल्या आहेत. ७ सामने बरोबरीत सुटले आहेत.

स्पेन-फ्रान्स विश्वचषकात २० वर्षांनी आमनेसामने येतील. २००६मध्ये उभय संघांत झालेल्या लढतीत फ्रान्सने ३-१ अशी बाजी मारली होती.

फ्रान्स वि. स्पेन

  • स्थळ : डल्लास स्टेडियम, अर्लिंग्टन

  • वेळ : मध्यरात्री १२.३० वाजल्यापासून (बुधवार)

  • थेट प्रक्षेपण : यूनाइट८ स्पोर्ट्स, झी सिनेमा आणि झी५ ॲप

(संबधित इंग्रजी बातमी वाचण्यासाठी येथे क्लिक करा.)

वाढत्या अन्नधान्याच्या किमतीचा सामान्यांना फटका

मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना : ९२ लाख 'बहिणीं'ना वगळल्याने नवा वाद

जलतरणपटू गीताने केली 'इंग्लिश खाडी' पार

दोन्ही राष्ट्रवादीत अस्वस्थता; सुनेत्रा पवार गटाला कुरबुरींचे, तर शरद पवार गटाला फुटीचे ग्रहण?

भारत-इंग्लंड महिला कसोटी : भारतीय महिला संघाचे इंग्लंडमधील वर्चस्व अबाधित