जर्मनीची मानहानी; नेदरलँड्सची अधुरी कहाणी! 'पेनल्टी'च्या दुहेरी थरारात पॅराग्वे, मोरोक्कोचा संस्मरणीय विजय X
क्रीडा

FIFA World Cup 2026 : जर्मनीची मानहानी; नेदरलँड्सची अधुरी कहाणी! 'पेनल्टी'च्या दुहेरी थरारात पॅराग्वे, मोरोक्कोचा संस्मरणीय विजय

फिफा विश्वचषक फुटबॉल स्पर्धेत मंगळवारी चाहत्यांना पेनल्टी शूटआऊटचा दुहेरी थरार अनुभवायला मिळाला.

Swapnil S

फिफा विश्वचषक फुटबॉल स्पर्धेत मंगळवारी चाहत्यांना पेनल्टी शूटआऊटचा दुहेरी थरार अनुभवायला मिळाला. दिवसभरात झालेल्या राऊंड ऑफ ३२ म्हणजेच बाद फेरीतील तिन्ही लढतींमध्ये सर्व संघांनी सर्वस्व पणाला लावले. एकीकडे बलाढ्य जर्मनीला पॅराग्वेकडून शूटआऊटमध्ये मानहानीकारक पराभवाला सामोरे जावे लागले. यंदाच्या विश्वचषकातील हा सर्वात मोठा उलटफेर ठरला. त्यामुळे सलग तिसऱ्या विश्वचषकात जर्मनीला उपउपांत्यपूर्व फेरी गाठण्यात अपयश आले. दुसरीकडे झुंजार वृत्तीच्या मोरोक्कोने नेदरलँड्सचा प्रतिकार मोडीत काढला. त्यामुळे नेदरलँड्सची कहाणी सलग तिसऱ्या विश्वचषकात पेनल्टी शूटआऊटद्वारे संपुष्टात आली. त्याशिवाय ब्राझीलने जपानवर अखेरच्या क्षणी २-१ अशी सरशी साधून आगेकूच केली.

फॉक्सबरो : फिफा विश्वचषकात सोमवारी मध्यरात्री जर्मनी आणि पॅराग्वे हे संघ राऊंड ऑफ ३२ लढतीसाठी मैदानात उतरले. तेव्हा भारतासह जगभरातील तमाम चाहत्यांनी जर्मनी ही लढत सहज जिंकेल, अशी अपेक्षा बाळगली होती. भारतीय वेळेनुसार रात्री २ वाजता हा सामना सुरू झाल्याने अनेकांनी झोपण्यास प्राधान्य देत ही लढत न पाहण्याचेही ठरवले. मात्र प्रत्यक्षात झाले उलटेच.

पेनल्टी शूटआऊट आणि त्यानंतर चक्क सडन डेथपर्यंत रंगलेल्या या लढतीत पॅराग्वेने चार वेळच्या विश्वचषक विजेत्या जर्मनीला १-१ (४-३) असा पराभवाचा धक्का देत १६ वर्षांनी उपउपांत्यपूर्व फेरीत धडक मारली. शूटआऊटमधील पहिल्या पाच स्ट्रोकमध्ये दोन्ही संघांत ३-३ अशी बरोबरी राहिल्यानंतर जोस कॅनलने सडन डेथमध्ये पहिल्याच प्रयत्नात गोल नोंदवून पॅराग्वेच्या ऐतिहासिक विजयावर शिक्कामोर्तब केले. मात्र पॅराग्वेच्या विजयाचा खरा शिल्पकार ठरला तो गोलरक्षक ओरलँडो गिल, ज्याने शूटआऊटमध्ये दोन महत्त्वाचे बचाव केले. आता उपउपांत्यपूर्व फेरीत पॅराग्वेसमोर फ्रान्स किंवा स्वीडनचे आव्हान असेल. तर २०१४च्या जर्मनीला सलग तिसऱ्या विश्वचषकात उपउपांत्यपूर्व फेरी गाठण्यात अपयश आले.

१२ जून ते २० जुलै या कालावधीत (भारतीय वेळ आणि तारखांनुसार) अमेरिका, मेक्सिको आणि कॅनडा येथे संयुक्तपणे फिफा विश्वचषकाच्या २३व्या पर्वाचा थरार रंगत आहे. यंदा प्रथमच तीन देश संयुक्तपणे विश्वचषकाचे यजमानपद भूषवत असून पहिल्यांदाच ४८ संघही सहभागी झाले होते. या संघांना १२ गटांत विभागण्यात आले होते. त्यांपैकी आता ३२ संघांनी बाद फेरी (राऊंड ऑफ ३२) गाठली असून प्रत्येक लढतीनंतर पराभूत संघाचे आव्हान संपुष्टात येईल, तर विजयी संघ जेतेपदाच्या दिशेने वाटचाल करेल. त्यामुळेच विश्वचषकाचा थरार येत्या काही दिवसांत आणखी वाढणार आहे.

दरम्यान, बोस्टन स्टेडियमवर झालेल्या या सामन्यापूर्वी जर्मनी जागतिक क्रमवारीत १२व्या, तर पॅराग्वे ३४व्या क्रमांकावर होती. मात्र पहिल्या सत्रात ४२व्या मिनिटाला ज्युलिओ एन्सिझोने दमदार गोल करून पॅराग्वेला १-० अशी आघाडी मिळवून देत या लढतीत ते कच खाण्यासाठी आले नाहीत, हे दाखवून दिले. मध्यंतरापर्यंत ही आघाडी कायम राहिल्यानंतर दुसऱ्या सत्रात ५४व्या मिनिटाला तारांकित आक्रमणपटू काय हॅवर्टझने जर्मनीला बरोबरी साधून दिली. त्यानंतर निर्धारीत ९० मिनिटांपर्यंत बरोबरी कायम राहिली. अतिरिक्त वेळेतही (एक्स्ट्रा टाइम) दोन्ही संघांना गोल करण्यात अपयश आले. १०२व्या मिनिटाला जर्मनीच्या जोनाथन टाह याने गोल केला होता, मात्र व्हिडिओ रिव्ह्यूमध्ये वाल्डेमारने गोलरक्षकाला ढकलल्याचे स्पष्ट झाल्याने हा गोल नाकारण्यात आला. अखेरीस शूटआऊटचा अवलंब करण्यात आला.

जर्मनीने यापूर्वी प्रमुख स्पर्धांमधील सातपैकी सहा पेनल्टी शूटआऊट जिंकले होते. यावेळी २००२च्या विश्वचषकातील पराभवाचा वचपा पॅराग्वेने घेतला. त्यावेळी जर्मनीने पॅराग्वेला उपउपांत्यपूर्व लढतीत १-० असे नमवले होते.

शूटआऊटमध्ये घडले काय?

जर्मनीकडून हॅवटर्झने पहिलीच संधी वाया घालवली. ओरलँडोने हवेत झेप घेत त्याची किक अडवली, तर मॉरिशियोने पॅराग्वेला आघाडी मिळवून दिली. त्यानंतर जर्मनीकडून किमीच व मुसियाला यांनी गोल केले, तर गोमेझ व गलार्झाने शूट साधून पॅराग्वेची ३-२ अशी आघाडी कायम राखली. चौथ्या प्रयत्नात जर्मनीच्या निकची किक ओरलँडोने अडवली. मात्र पॅराग्वेचा अँटोनियोही गोल करण्यापासून चुकला. अमिरीने जर्मनीला पाचव्या प्रयत्नात बरोबरी साधून दिली. पॅराग्वेचा फॅबियन पाचव्या प्रयत्नात अपयशी ठरला. त्यामुळे सामना सडन डेथमध्ये गेला. तेथे मात्र जोनाथनने गोलपोस्टच्या वरून चेंडू भिरकावला, तर जोसने गोल नोंदवून पॅराग्वेचा विजय पक्का केला.

ग्वाडालप : इस्टाडियो माँटेरी स्टेडियमवर मंगळवारी सकाळी नेदरलँड्स आणि मोरोक्को आमनेसामने आले, तेव्हा दोन्ही संघांत प्रत्येक मिनिटाला संघर्ष पाहायला मिळणार, हे अपेक्षित होते. प्रत्यक्षात झालेही तसेच. अखेरीस पेनल्टी शूटआऊटपर्यंत रंगलेल्या या थरारात मोरोक्कोने १-१ (३-२) अशी बाजी मारली आणि सलग दुसऱ्यांदा उपउपांत्यपूर्व फेरीतील प्रवेश सुनिश्चित केला. तर नेदरलँड्सला सलग तिसऱ्यांदा शूटआऊटद्वारे स्पर्धेतून गाशा गुंडाळावा लागला.

ईस्माईल सैबारी याने पेनल्टी शूटआऊटमध्ये पाचव्या प्रयत्नात निर्णायक गोल केला. तसेच गोलरक्षक यासिन बोनूने समरवीलचा गोल अडवला होता. हाच क्षण निर्णायक ठरला. शूटआऊटमध्ये मोरोक्को १-० ने मागे असताना व्हर्ब्रूगेन याने सुफियाने राहिमीचा गोल अडवला असे वाटत होते, परंतु तो चेंडू पूर्णपणे रोखू शकला नाही आणि चेंडू त्याच्या पायाला लागून रेषेच्या पलीकडे गेला. मोरोक्कोसमोर आता उपउपांत्यपूर्व लढतीत कॅनडाचे आव्हान असेल. कॅनडाने दक्षिण आफ्रिकेला नमवून आगेकूच केली होती.

दरम्यान, मंगळवारच्या सामन्यात मोरोक्कोने बहुतांश वेळ वर्चस्व राखले, तर नेदरलँड्सने केवळ प्रतिआक्रमणावर भर दिला. नेदरलँड्ससाठी कोडी गॅक्पो याने ७२व्या मिनिटाला समरवीलच्या पासवर गोल केला आणि तो भावूक झाला. गॅक्पो आणि त्याची जोडीदार नोआ व्हॅन डेर बिज यांनी अलीकडेच त्यांचे न जन्मलेले मूल गमावले आहे.

मोरोक्कोच्या इस्सा डिओप याने भरपाई वेळेत म्हणजेच ९०+१ मिनिटाला गोल करून सामना १-१ असा बरोबरीत आणला. ताल्बी याने डाव्या बाजूने दिलेल्या क्रॉस पासवर डिओप याने उत्कृष्ट हेडरद्वारे हा गोल केला. अतिरिक्त ३० मिनिटांच्या खेळात दोन्ही संघांना गोल करण्याची चांगली संधी मिळाली नाही.

नेदरलँड्स पेनल्टी शूटआऊटमध्ये विश्वचषकातून बाद होण्याची ही सलग तिसरी वेळ आहे. यापूर्वी २०१४ व २०२२मध्ये अर्जेंटिनाविरुद्ध त्यांना शूटआऊटमध्ये पराभव पत्करावा लागला होता, तर २०१८ते विश्वचषकासाठी पात्र ठरले नव्हते. नेदरलँड्सने यापूर्वीच्या ११ विश्वचषकांमध्ये किमान उपउपांत्यपूर्व फेरी गाठली होती, ज्यामध्ये चार वर्षांपूर्वी कतारमधील उपांत्यपूर्व फेरीचा समावेश आहे. त्याच २०२२च्या विश्वचषकात मोरोक्कोने उपांत्य फेरीपर्यंत मजल मारली होती.

मोरोक्कोने यापूर्वी २०२२ च्या विश्वचषकात साखळी फेरीत कॅनडाचा २-१ असा पराभव केला होता. आता पुन्हा त्यांची कॅनडाशी गाठ पडेल.

शूटआऊटमध्ये घडले काय?

नेदरलँड्सकडून कूपमीनर्सने चांगली सुरुवात करताना पहिल्या शूटवर गोल नोंदवला, तर मोरोक्कोच्या नीलने निराशा केली. मग नेदरलँड्सच्या जस्टिनला गोल करण्यात अपयश आले, तर सुफियान रहिमीने मोरोक्कोला दुसऱ्या प्रयत्नात बरोबरी साधून दिली. तिसऱ्या प्रयत्नात दोन्ही संघांकडून अनुक्रमे वेघोर्स्ट व तैबी यांनी गोल नोंदवले, तर चौथ्या प्रयत्नात नेदरलँड्सचा टिंबर व मोरोक्कोचा हकिमी यांना गोल नोंदवता आला नाही. परिणामी ४ किकनंतर दोघांमध्येही २-२ अशी बरोबरी होती. मात्र नेदरलँड्सच्या समरवीलचा पाचवा प्रयत्न गोलरक्षक यासिन बोनूने थोपवला. मग मोरोक्कोकडून सैबारीने गोलजाळ्याचा वेध साधून मोरोक्कोला पुढील फेरीत नेले.

अनधिकृत जलजोडण्यांवर कारवाई; मुंबईत विशेष मोहीम राबविण्यात येणार, अधिकाऱ्यांवरही होणार कारवाई

Thane : अल्पवयीन मुलीवरील अत्याचारप्रकरणी आरोपीला २० वर्षांची सक्तमजुरी

Pune : यंदा माऊलींचा रथ 'हायटेक'; वजन केले एक टनाने कमी

...तर मतदानावरील विश्वास उडेल; आमदार रोहित पवार यांची भीती

मुंबईत तीन वर्षांत झाडे व फांद्या कोसळून १२ जणांचा मृत्यू, १२५ जण जखमी; चेंबूर येथील दुर्घटनेनंतर सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर