सॅन फ्रॅन्सिस्को : यजमान अमेरिकाने गुरुवारी फिफा विश्वचषकाच्या उपउपांत्यपूर्व फेरीत प्रवेश करताना बोस्निया आणि हर्झेगोव्हिना संघाचा २-० असा पराभव केला. फोलारिन बालोगन आणि मलिक टिलमन यांनी अमेरिकासाठी दोन गोल नोंदवले. आता अमेरिकेची मंगळवारी होणाऱ्या उपउपांत्यपूर्व लढतीत बेल्जियमशी गाठ पडेल. तर बोस्नियाने मात्र या पराभवामुळे बस्तान गुंडाळले. बालोगनला या सामन्यात लाल कार्ड दाखवण्यात आल्याने तो बेल्जियमविरुद्ध खेळू शकणार नाही.
सँटा क्लारा स्टेडियमवर ६८ हजारांहून अधिक प्रेक्षकांच्या साक्षीने झालेल्या या राऊंड ऑफ ३२ फेरीतील विजयासह अमेरिकेने सलग दुसऱ्या विश्वचषकात किमान उपउपांत्यपूर्व फेरी गाठली. २०१८मध्ये ते विश्वचषकास पात्र ठरू शकले नव्हते. तर २०२२मध्ये त्यांना नेदरलँड्सने उपउपांत्यपूर्व लढतीत नमवले होते. दुसरीकडे बोस्नियाचा संघ २०१४ नंतर प्रथमच विश्वचषकासाठी पात्र ठरला होता. त्यांनी कतारला नमवून ब-गटातून तिसऱ्या स्थानासह बाद फेरी गाठली होती. मात्र त्यांची वाटचाल राऊंड ऑफ ३२ फेरीमध्येच संपुष्टात आली.
या सामन्यादरम्यान बालोगनने ३१व्या मिनिटाला केलेला गोल ऑफसाइडमुळे नाकारण्यात आला होता. मात्र ४५व्या मिनिटाला टिलमनच्या पासवर बोस्नियाच्या स्टीपन राडेलिचने चेंडू रोखण्याचा प्रयत्न केला, जो तारिक मुहरेमोविचच्या पायाला लागून बालोगनकडे आला. बालोगनने डाव्या पायाने उत्कृष्ट फटका मारत गोलरक्षक निकोला वासिल याला चकवून गोल केला. हा त्याचा या स्पर्धेतील तिसरा आणि आंतरराष्ट्रीय कारकिर्दीतील १२वा गोल ठरला. या गोलनंतर त्याने एनबीए स्टार लेब्रॉन जेम्सच्या द सायलेन्सर शैलीत आनंदोत्सव साजरा केला, ज्याची सोशल मीडियावरही चर्चा झाली. त्यानंतर ८२व्या मिनिटाला टिलमनने दुसरा गोल नोंदवून अमेरिकाचा विजय पक्का केला.
एकूणच यंदा तिन्ही यजमान देशांनी उपउपांत्यपूर्व फेरी गाठल्याने त्यांच्यापैकी कोण अधिक काळ टिकून राहणार, याकडे लक्ष असेल.
एकाच लढतीत गोल आणि लाल कार्ड
सामन्याच्या दुसऱ्या सत्रात तारिक मुहरेमोविचच्या उजव्या घोट्यावर पाय दिल्याबद्दल ब्राझीलचे पंच राफेल क्लॉज यांनी व्हिडीओ रिव्ह्यूनंतर बालोगनला लाल कार्ड दाखवले. या निर्णयावर अमेरिकेचे मुख्य प्रशिक्षक मॉरिसियो पोचेटिनो यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली. बालोगनचा असा कोणताही हेतू नव्हता आणि हे कधीही लाल कार्ड असू शकत नाही, फुटबॉलमध्ये चेंडूसाठी लढताना असे घडते, असे पोचेटिनो म्हणाले.
लाल कार्डमुळे बालोगनवर एका सामन्याची बंदी आली असून तो बेल्जियमविरुद्ध होणाऱ्या उपउपांत्यपूर्व फेरीच्या सामन्यात खेळू शकणार नाही. फिफाकडून एकापेक्षा जास्त सामन्यांची शिक्षा झाली नसल्यास या लाल कार्डविरोधात अपील करण्याची कोणतीही तरतूद नाही. त्यामुळे आता बेल्जियमविरुद्धच्या सामन्यात अमेरिकेला रिकार्डो पेपी किंवा हाजी राईट यांच्यावर अवलंबून राहावे लागेल.
विश्वचषकाच्या बाद फेरीत गोल केल्यानंतर लाल कार्ड मिळवणारा बालोगन हा इतिहासातील तिसरा खेळाडू ठरला आहे. यापूर्वी २००२ मध्ये ब्राझीलच्या रोनाल्डिन्होने इंग्लंडविरुद्ध आणि २००६च्या अंतिम सामन्यात फ्रान्सच्या झिनेदिन झिदानने इटलीविरुद्ध अशी कामगिरी केली होती. अमेरिकेच्या विश्वचषकाच्या इतिहासातील हे पाचवे लाल कार्ड आहे.
गोलफलक
अमेरिका (२) - बोस्निया (०)
बालोगन (४५ मि.)
टिलमन (८२ मि.)