क्रीडा

Hockey World Cup 2026 : चक दे इंडिया! स्वातंत्र्य दिनाच्या मुहूर्तावर हॉकी विश्वचषक स्पर्धेला प्रारंभ

देशाच्या ८०व्या स्वातंत्र्य दिनाच्या शुभमुहूर्तावर भारतीय हॉकी संघांची विश्वचषक मोहीम सुरू होणार आहे. शनिवार, १५ ऑगस्टपासून बेल्जियम आणि नेदरलँड्स येथे संयुक्तपणे पुरुष आणि महिलांच्या विश्वचषक हॉकी स्पर्धेचा थरार रंगणार आहे.

Swapnil S

देशाच्या ८०व्या स्वातंत्र्य दिनाच्या शुभमुहूर्तावर भारतीय हॉकी संघांची विश्वचषक मोहीम सुरू होणार आहे. शनिवार, १५ ऑगस्टपासून बेल्जियम आणि नेदरलँड्स येथे संयुक्तपणे पुरुष आणि महिलांच्या विश्वचषक हॉकी स्पर्धेचा थरार रंगणार आहे. हरमनप्रीत सिंगच्या नेतृत्वात खेळणारा भारतीय पुरुष संघ ५१ वर्षांचा दुष्काळ संपुष्टात आणून दुसऱ्यांदा विश्वचषक उंचावण्यास आतुर आहे, तर सलिमा टेटेच्या नेतृत्वात खेळणारा भारतीय महिला संघ पहिल्यावहिल्या ऐतिहासिक विश्वविजयाच्या इराद्याने मैदानात उतरेल. त्यामुळे पुढील दोन आठवडे हे दोन्ही संघ 'चक दे इंडिया'चा डंका वाजवण्यासाठी उत्सुक असून देशातील दर्दी हॉकीप्रेमी त्यांना पाठिंबा दर्शवण्यास सज्ज आहेत.

दुष्काळ संपवण्याचे पुरुषांसमोर आव्हान

अॅम्स्टलवीन : भारतीय पुरुष हॉकी संघ विश्वचषक स्पर्धेत शनिवारी वेल्सविरुद्धच्या लढतीने विश्वचषक अभियानाची सुरुवात करणार आहे. तब्बल ५१ वर्षांचा जेतेपदाचा दुष्काळ संपवण्याच्या इराद्याने कर्णधार हरमनप्रीत सिंगच्या नेतृत्वाखालील भारतीय संघ मैदानात उतरणार आहे.

भारताने एकमेव विश्वचषक १९७५ मध्ये अजितपाल सिंग यांच्या नेतृत्वाखाली क्वालालंपूर येथे पाकिस्तानचा पराभव करून जिंकला होता. त्यापूर्वी भारताने १९७१ मध्ये कांस्य आणि १९७३मध्ये रौप्यपदक पटकावले होते. मुख्य म्हणजे भारताचे कर्णधारपद भूषवणाऱ्या हरमनप्रीतला अजित यांच्याच कामगिरीची पुनरावृत्ती करण्याची संधी आहे. अजित यांनी दुसऱ्या प्रयत्नात म्हणजेच १९७५मध्ये विश्वचषक उंचावला. त्यानंतर सलग दोन विश्वचषकांत (२०२३, २०२६) भारताचे नेतृत्व करणारा हरमनप्रीत हा दुसराच कर्णधार ठरला. आता हरमनप्रीतलाही ऐतिहासिक जेतेपद खुणावत आहे.

साखळी सामने

  • शनिवार, १५ ऑगस्ट वि. वेल्स (दुपारी ४.३० वाजता)

  • सोमवार, १७ ऑगस्ट वि. इंग्लंड (सायं. ६.३० वाजता)

  • बुधवार, १९ ऑगस्ट वि. पाकिस्तान (सायं. ६.३० वा.)

भारतीय पुरुष संघ

हरमनप्रीत सिंग (कर्णधार), मोहित एस., सूरज करकेरा, जर्मनप्रीत सिंग, अमित रोहिदास, जुगराज सिंग, संजय, सुमीत, यशदीप सिवाच, रजिंदर सिंग, आदित्य लालगे, हार्दिक सिंग, मनप्रीत सिंग, निलकांता शर्मा, विवेक प्रसाद, अभिषेक, शिलानंद लाक्रा, मंदीप सिंग, सुखजीत, दिलप्रीत सिंग.

प्रशिक्षक : क्रेग फुल्टन

भारतीय पंचांविना पहिलाच विश्वचषक

१९९८च्या हॉकी विश्वचषकानंतर प्रथमच एकही भारतीय पंच किंवा तांत्रिक अधिकारी स्पर्धेत दिसणार नाही. त्यामुळे २८ वर्षांनी प्रथमच असे घडणार आहे. या स्पर्धेतील अधिकाऱ्यांच्या पॅनेलमध्ये युरोपीय देशांचेच वर्चस्व आहे. आधुनिक काळात भारताने केवळ चार पुरुष विश्वचषक पंच दिले आहेत, ज्यामध्ये अमरजित सिंह बावा (१९९०), तरलोक सिंह भुल्लर (१९९४), सतविंदर शर्मा (२००६, २०१०) आणि आर. व्ही. रघू प्रसाद (२०१०, २०१४, २०१८, २०२३) यांचा समावेश आहे. पंचांच्या व्यवसायात अजूनही आर्थिक सुरक्षितता आणि चांगल्या पगाराचा अभाव आहे. खेळाडूंना पुरस्कार आणि सरकारी नोकऱ्या मिळतात, मात्र पंचांना वेतन किंवा योग्य प्रोत्साहन मिळत नाही, ज्यामुळे तरुण या क्षेत्राकडे वळत नाहीत, असे माजी पंचांचे तसेच तज्ज्ञांचे मत आहे. भारताकडे देशांतर्गत ५० हून अधिक पंचांचा संच असतानाही एफआयएच पॅनेलवर केवळ सहा पुरुष आणि चार महिला पंच आहेत, तर तांत्रिक अधिकाऱ्यांमध्ये केवळ चार पुरुष आणि दोन महिलांचा समावेश आहे.

महिलांचे ऐतिहासिक कामगिरीचे उद्दिष्ट

अॅम्स्टेलवीन : सलिमा टेटेच्या नेतृत्वात खेळणारा भारतीय महिला संघ रविवारी चीनविरुद्ध त्यांची सलामीची लढत खेळणार आहे. ड-गटात भारताचा समावेश करण्यात आला असून त्यांना अनुक्रमे चीन, दक्षिण आफ्रिका व इंग्लंडशी साखळी फेरीत दोन हात करायचे आहेत.

भारतीय महिला संघाने १९७४च्या विश्वचषकात उपांत्य फेरीपर्यंत मजल मारून चौथा क्रमांक पटकावला होता. हीच भारताची विश्वचषकातील आजवरची सर्वोत्तम कामगिरी आहे. २०२० च्या टोकियो ऑलिम्पिकमध्ये भारताला कांस्यपदकाच्या लढतीत पराभव पत्करावा लागला होता. त्यानंतर भारताची कामगिरी काहीशी खालावली. आता शोर्ड मरिन यांच्या प्रशिक्षणात पुन्हा एकदा भरारी घेण्यासाठी हा संघ उत्सुक आहे. भारताला ऐतिहासिक पहिले विश्वविजेतेपद मिळवायचे असल्यास पुढे नेदरलँड्स, अर्जेंटिना यांसारख्या बलाढ्य संघांना सामोरे जावे लागू शकते.

साखळी सामने

  • रविवार, १६ ऑगस्ट वि. चीन (दुपारी ४.३० वाजता)

  • मंगळवार, १८ ऑगस्ट वि. द. आफ्रिका (सायं. ६.३० वा.)

  • गुरुवार, २० ऑगस्ट वि. इंग्लंड (सायं. ६.३० वाजता)

भारतीय महिला संघ

सलिमा टेटे (कर्णधार), सविता पुनिया, बिच्चू देवी, इशिका चौधरी, सुशीला चानू, ज्योती, लालथंतलुंगी, शिल्पी डबास, निक्की प्रधान, साक्षी राणा, सुनेलिता टोप्पो, नेहा, दीपिका सोरंग, लालरेमसियामी, नवनीत कौर, ऋतुजा पिसाळ, इशिका, बलजीत कौर, ब्युटी डुंगडुंग, दीपिका.

प्रशिक्षक : शोर्ड मरिन

थेट प्रक्षेपण : स्टार स्पोर्ट्स सिलेक्ट २ आणि जिओहॉटस्टार अॅप

(संबंधित इंग्रजी बातमी वाचण्यासाठी येथे क्लिक करा.)

Independence Day 2026 : 'वंदे मातरम्'च्या जयघोषाने दुमदुमला लाल किल्ला; ८०व्या स्वातंत्र्यदिनाचा ऐतिहासिक क्षण, Videos

Independence Day 2026 : 'सप्तधारा', विकसित भारत अन् आत्मनिर्भरता; पंतप्रधान मोदींच्या भाषणातील महत्त्वाचे मुद्दे, वाचा सविस्तर

मुंबई अग्निशमन दलाच्या १३ जवानांना राष्ट्रपतींचे शौर्यपदक

नैसर्गिक जलस्रोतात विसर्जनास बंदी; उच्च न्यायालयाचा निर्णय

कुत्र्यांची 'नसबंदी' वेगाने करा! उच्च न्यायालयाचे आदेश