अंतिम फेरीचा पहिला मान कुणाला? अपराजित दक्षिण आफ्रिकेचा आज झुंजार न्यूझीलंडविरुद्ध कोलकाता येथे उपांत्य सामना 
क्रीडा

अंतिम फेरीचा पहिला मान कुणाला? अपराजित दक्षिण आफ्रिकेचा आज झुंजार न्यूझीलंडविरुद्ध कोलकाता येथे उपांत्य सामना

SA vs NZ, ICC T20 WC26 : टी-२० विश्वचषक क्रिकेट स्पर्धेचा थरार आता उपांत्य फेरीच्या टप्प्यावर आहे. बुधवारी कोलकाताच्या ईडन गार्डन्स स्टेडियमवर होणाऱ्या पहिल्या उपांत्य सामन्यात आतापर्यंत स्पर्धेत अपराजित असलेल्या दक्षिण आफ्रिकेची झुंजार वृत्तीच्या न्यूझीलंडशी गाठ पडणार आहे.

Swapnil S

कोलकाता : टी-२० विश्वचषक क्रिकेट स्पर्धेचा थरार आता उपांत्य फेरीच्या टप्प्यावर आहे. बुधवारी कोलकाताच्या ईडन गार्डन्स स्टेडियमवर होणाऱ्या पहिल्या उपांत्य सामन्यात आतापर्यंत स्पर्धेत अपराजित असलेल्या दक्षिण आफ्रिकेची झुंजार वृत्तीच्या न्यूझीलंडशी गाठ पडणार आहे. त्यामुळे उभय संघांपैकी कोण अंतिम फेरीचा पहिला मान मिळवणार आणि कोणाचे स्वप्न उद्ध्वस्त होणार, हे पाहणे रंजक ठरेल. दोन्ही संघांतील कर्णधारांची कामगिरी या लढतीत निर्णायक ठरणार आहे.

भारत आणि श्रीलंका येथे संयुक्तपणे टी-२० विश्वचषक क्रिकेट स्पर्धेच्या १०व्या पर्वाचे आयोजन करण्यात येत आहे. ७ फेब्रुवारी ते ८ मार्च या कालावधीत रंगणाऱ्या या स्पर्धेत यंदाही गेल्या वेळेप्रमाणे २० संघ सहभागी झाले होते. भारत २०१६ नंतर प्रथमच टी-२० विश्वचषकाचे यजमानपद भूषवत आहे. रोहितच्या नेतृत्वात २०२४मध्ये भारताने टी-२० विश्वचषक उंचावला होता. या स्पर्धेत साखळी फेरीसाठी प्रत्येकी पाच संघांचा एक असे चार गट बनवण्यात आले होते. मग सुपर-आठ फेरीत दोन गट तयार करण्यात आले. यांपैकी पहिल्या गटात भारत, झिम्बाब्वे, वेस्ट इंडिज व दक्षिण आफ्रिका यांचा समावेश होता. तर दुसऱ्या गटात पाकिस्तान, इंग्लंड, न्यूझीलंड, श्रीलंका हे संघ सहभागी होते. आता पहिल्या गटातून दक्षिण आफ्रिका व भारत यांनी उपांत्य फेरीत प्रवेश केला आहे, तर दुसऱ्या गटातून इंग्लंड व न्यूझीलंड यांनी आगेकूच केली. त्यामुळे ८ मार्च रोजी अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर होणाऱ्या अंतिम सामन्यात या चौघांमधून कोण दाखल होणार, याकडे सर्वांचे लक्ष आहे.

एडीन मार्करमच्या नेतृत्वात खेळणाऱ्या आफ्रिकेने या विश्वचषकात आतापर्यंत सर्वोत्तम कामगिरी करताना सलग सात विजय नोंदवले आहेत. २०२४ मध्येसुद्धा आफ्रिकेने अपराजित राहत विश्वचषकाच्या अंतिम फेरीपर्यंत प्रथमच मजल मारली होती. मात्र त्यावेळी त्यांना भारताकडून पराभव पत्करावा लागल्याने उपविजेतेपदावर समाधान मानावे लागले. यंदा मात्र हा संघ अधिक तयारीसह स्पर्धेत खेळत आहे. साखळी फेरीत आफ्रिकेने कॅनडा, अफगाणिस्तान, न्यूझीलंड व यूएई यांना पराभूत केले. फक्त अफगाणिस्तानविरुद्ध विजय मिळवताना त्यांना दुसऱ्या सुपर-ओव्हरपर्यंत संघर्ष करावा लागला. मात्र सुपर-आठ फेरीत आफ्रिकेने भारत, वेस्ट इंडिज, झिम्बाब्वे या संघांना सहज धूळ चारताना पहिल्या गटातून अग्रस्थानासह आगेकूच केली. त्यामुळेच आफ्रिकेचे या लढतीसाठी पारडे जड मानले जात आहे. ते सलग दुसऱ्यांदा अंतिम फेरी गाठण्यास सज्ज असतील.

दुसरीकडे मिचेल सँटनरच्या नेतृत्वात खेळणाऱ्या न्यूझीलंडची कामगिरी काहीशी संमिश्र स्वरूपाची राहिली आहे. साखळी फेरीत त्यांनी आफ्रिकेकडून पराभव पत्करला. मात्र अन्य तीन संघांना नमवून दुसऱ्या स्थानासह सुपर-आठ फेरी गाठली. मग त्या फेरीत पाकिस्तानविरुद्धची लढत पावसामुळे रद्द झाल्यावर त्यांनी श्रीलंकेला नमवले. मात्र इंग्लंडविरुद्ध फलंदाज तसेच गोलंदाज अपयशी ठरल्याने न्यूझीलंडला १६० धावांचा बचाव करता आला नाही. तरीही सरस धावगती व नशिबाच्या बळावर किवी संघाने उपांत्य फेरी गाठली आहे. २०२१मध्ये न्यूझीलंडने सर्वप्रथम अंतिम फेरी गाठली होती. त्यावेळी त्यांना पराभव पत्करावा लागला. आता दुसऱ्यांदा अंतिम फेरीत मजल मारण्यास ते उत्सुक असतील. मात्र आफ्रिकेचे कडवे आव्हान त्यांच्यासमोर असेल.

हे माहीत आहे का?

  • न्यूझीलंड व आफ्रिका यापूर्वीच्या नऊ टी-२० विश्वचषकांत एकूण पाच वेळा आमनेसामने आले आहेत. या पाचही वेळेस आफ्रिकेनेच बाजी मारली आहे.

  • दुसरीकडे नॉकआऊट म्हणजेच जिंकू किंवा मरू अशा स्थितीतील सामन्यांत मात्र न्यूझीलंडने आफ्रिकेला सर्वप्रकारच्या आयसीसी स्पर्धेत तीन वेळा नमवले आहे. त्यामुळेच दोन्ही संघांतील जुगलबंदीकडे सर्वांचे लक्ष लागून आहे.

खेळपट्टी आणि वातावरणाचा अंदाज

कोलकाताच्या ईडन गार्डन्स स्टेडियमवर होणाऱ्या या लढतीत नाणेफेक निर्णायक ठरेल. येथे धावांचा पाठलाग करणे तुलनेने सोपे जात असून दवदेखील निर्णायक भूमिका बजावत आहे. भारताने नुकताच येथे वेस्ट इंडिजविरुद्ध १९६ धावांचा पाठलाग केला होता. पावसाचे या लढतीवर मुळीच सावट नाही. तसेच राखीव दिवसही ठेवण्यात आला आहे. मात्र तरीही पाऊस अथवा अन्य एखाद्या कारणाने लढत रद्द झाली, तर आफ्रिका अंतिम फेरीत दाखल होईल. कारण त्यांनी सुपर-आठ फेरीत आपल्या गटात अग्रस्थान मिळवले होते, तर न्यूझीलंडने दुसऱ्या स्थानासह आगेकूच केली.

मार्करम, सँटनरची कामगिरी ठरणार निर्णायक

आफ्रिकेचा कर्णधार एडीन मार्करमने या स्पर्धेत ३ अर्धशतकांसह २६८ धावा केल्या आहेत. त्यामुळे त्याची कामगिरी संघासाठी मोलाची असेल. त्याशिवाय डेव्हिड मिलर, डेवाल्ड ब्रेविस, कगिसो रबाडा या खेळाडूंवर आफ्रिकेची भिस्त आहे. दुसरीकडे डावखुरा अष्टपैलू व कर्णधार मिचेल सँटनरने न्यूझीलंडसाठी सातत्याने योगदान दिले आहे. डॅरेल मिचेल, ग्लेन फिलिप्स यांच्याकडूनही किवी संघाला अपेक्षा असतील. पत्नी अपत्याला जन्म देणार असल्याने मॅट हेन्री न्यूझीलंडला परतला होता. त्यामुळे तो या सामन्यासाठी उपलब्ध असण्याची शक्यता कमी आहे.

प्रतिस्पर्धी संघ

दक्षिण आफ्रिका : एडीन मार्करम (कर्णधार), डेव्हिड मिलर, क्विंटन डीकॉक, केशव महाराज, आनरिख नॉर्किए, लुंगी एन्गिडी, कगिसो रबाडा, जॉर्ज लिंडे, ट्रिस्टन स्टब्स, कॉर्बिन बोश, रायन रिकल्टन, डेवाल्ड ब्रेविस, मार्को यान्सेन, क्वेना मफाका.

न्यूझीलंड : मिचेल सँटनर (कर्णधार), रचिन रवींद्र, कायले जेमिसन, फिन ॲलन, मॅट हेन्री, ग्लेन फिलिप्स, जेकब डफी, टिम सेईफर्ट, जेम्स नीशाम, इश सोधी, लॉकी फर्ग्युसन, डॅरेल मिचेल, मार्क चॅपमन, डेवान कॉन्वे, कोल मॅकोन्ची.

IIT बॉम्बेतील साहिल वाकोडे आत्महत्येप्रकरणी प्राध्यापक निलंबित; 'त्या' निवेदनावरून संस्थेची माफी

Mumbai : ‘बटरफ्लाय’ रोखणार पाणी गळती; जलवाहिन्यांवर बटरफ्लाय झडपा बसवणार, गणेश खणकर यांच्या मागणीची दखल

Mumbai : चौपाटी, विसर्जनस्थळी चोख व्यवस्थापन; देशभरातील तज्ज्ञांकडून पालिका, पोलिसांचे कौतुक

गणेश विसर्जनासाठी BMC सज्ज; ३८३ कृत्रिम तलावांची व्यवस्था, ६७ नैसर्गिक विसर्जनस्थळांवरही सुविधा, २५ हजार अधिकारी-कर्मचारी तैनात

बार्सिलोनामध्ये ‘गणपती बाप्पा मोरया’; महाराष्ट्र मंडळ स्पेनतर्फे गणेशोत्सव, स्पॅनिश कलाकारांचाही सहभाग