क्रीडा

विजयी आघाडीसाठी भारताचे युवा सज्ज! झिम्बाब्वेशी आज चौथा सामना; संघनिवडीचा पेच कायम

शुभमन गिलच्या नेतृत्वाखाली खेळणारा भारतीय युवा संघ आज, शनिवारी झिम्बाब्वेविरुद्धची टी-२० मालिका खिशात घालण्याच्या इराद्याने मैदानात उतरेल.

Swapnil S

हरारे : शुभमन गिलच्या नेतृत्वाखाली खेळणारा भारतीय युवा संघ आज, शनिवारी झिम्बाब्वेविरुद्धची टी-२० मालिका खिशात घालण्याच्या इराद्याने मैदानात उतरेल. हरारे स्पोर्ट्स क्लब येथे भारत-झिम्बाब्वे यांच्यात चौथा टी-२० सामना रंगणार आहे. भारतीय संघ या मालिकेत २-१ असा आघाडीवर असला तरी अंतिम ११ खेळाडूंसाठी रंगतदार शर्यत असल्याने संघनिवडीचा पेच कायम आहे.

झिम्बाब्वेने पहिल्या सामन्यात भारतावर धक्कादायक विजय मिळवला. मात्र दुसऱ्या लढतीत भारताने त्यांना १०० धावांनी धूळ चारली. मग तिसऱ्या सामन्यात भारताने २३ धावांनी सरशी साधली. अभिषेक शर्माने दुसऱ्या सामन्यात शतक झळकावले होते. मात्र यशस्वी जैस्वाल संघात परतल्याने त्याला नाइलाजास्तव तिसऱ्या स्थानी फलंदाजी करावी लागली. तसेच संजू सॅमसन, शिवम दुबेही संघात परतल्याने रियान पराग, ध्रुव जुरेल यांना संघाबाहेर जावे लागले. त्यामुळे भारताकडे आठव्या क्रमांकापर्यंत फलंदाजी असली तरी अभिषेक व शिवम यांना मिळून पाचव्या गोलंदाजाची भूमिका पार पाडावी लागत आहे. याचा फटका भारताला बसू शकतो.

दुसरीकडे सिकंदर रझाच्या नेतृत्वाखाली खेळताना झिम्बाब्वेने भारताला चांगली झुंज दिली आहे. गेल्या सामन्यात डायन मेयर्सने अर्धशतक झळकावले, तर गोलंदाजीत ब्लेसिंग मुझरबानी सातत्याने छाप पाडत आहे. सिकंदरही अष्टपैलू योगदान देत आहे. त्यामुळे झिम्बाब्वेने प्रथम फलंदाजी करून १८०हून अधिक धावा केल्यास, ते भारतावर नक्कीच दडपण आणू शकतात.

फलंदाजीचा क्रम बदलणार?

गेल्या सामन्यात यशस्वी व गिल यांनी अर्धशतकी सलामी नोंदवली. मात्र अभिषेक तिसऱ्या स्थानी अपयशी ठरला. ऋतुराज गायकवाडने दोन्ही विजयांत मोलाची भूमिका बजावली आहे. त्यामुळे भारतीय संघ फलंदाजी क्रमात काही बदल करणार का, हे पाहावे लागेल. रिंकू सिंग, शिवम दुबे, वॉशिंग्टन सुंदर असे डावखुरे फलंदाजांचे पर्यायही भारताकडे उपलब्ध आहेत. गोलंदाजीत आवेश खान व मुकेश कुमार या वेगवान गोलंदाजांवर भारतीय संघ अवलंबून आहे. फिरकीपटू रवी बिश्नोई आणि सुंदर यांनीही मधल्या षटकांत फलंदाजांवर अंकुश ठेवला आहे. त्यामुळे सांघिक कामगिरी केल्यास भारतीय संघ पुन्हा एकदा बाजी मारू शकतो.

प्रतिस्पर्धी संघ

भारत : शुभमन गिल (कर्णधार), ऋतुराज गायकवाड, अभिषेक शर्मा, रिंकू सिंग, ध्रुव जुरेल, रियान पराग, वॉशिंग्टन सुंदर, रवी बिश्नोई, आवेश खान, खलिल अहमद, मुकेश कुमार, तुषार देशपांडे, साई सुदर्शन, जितेश शर्मा, हर्षित राणा, यशस्वी जैस्वाल, शिवम दुबे, संजू सॅमसन.

झिम्बाब्वे : सिकंदर रझा (कर्णधार), अक्रम फरझ, बेनेट ब्रायन, कॅम्पबेल जोनाथन, चतारा तेंदई, जोंगवे लूक, काया इनोसंट, मॅडीन क्लाइव्ह, मधवीरे वेस्ले, मरुमनी तदिवांशे, मसाकाद्झा, मावुटा ब्रँडन, मुझरबानी ब्लेसिंग, मेयर्स डिओन, अंतूम नक्वी, नगरावा रिचर्ड, शुंबा मिल्टन.

शिवसेना नाव, धनुष्यबाण चिन्ह कोणाचे ? १४ जुलैला सुनावणी

बाजीराव पेशव्यांच्या पुतळ्याच्या अनावरण कार्यक्रमावर मस्तानी यांच्या वंशजाचा बहिष्कार

कोकणातील कातळशिल्पांचे जतन करा; मुंबई उच्च न्यायालयाचे राज्य सरकारला आदेश

गोरेगाव - मुलुंड जोड रस्ता: जुळ्या बोगद्यांच्या बांधणीचा मार्ग मोकळा

दिशा सालियनचा मृत्यू अपघातीच, मुंबई पोलीस ठाम ; भूमिका स्पष्ट करण्याचे राज्य सरकारला निर्देश