पुद्दुचेरी : फलंदाज सूर्यांश शेडगेच्या आक्रमक ६६ धावा आणि वेगवान गोलंदाज गुरजपनीत सिंगच्या तीन बळींच्या जोरावर भारत अ संघाने तिसऱ्या आणि अखेरच्या एकदिवसीय सामन्यात ऑस्ट्रेलिया अ संघाचा ४९ धावांनी पराभव केला. मात्र, ऑस्ट्रेलिया अ संघाने तीन सामन्यांची मालिका २-१ अशी जिंकली.
प्रथम फलंदाजी करताना भारत अ संघाने ४७.३ षटकांत सर्वबाद २७५ धावा केल्या. शेडगेने ६० चेंडूंत ६६ धावांची खेळी केली. त्याला विप्रज निगमने ४० धावा करत चांगली साथ दिली. या दोघांनी सातव्या विकेटसाठी ८५ धावांची भागीदारी करून भारताला १५९ धावांवर सहा विकेट अशी अडचणीची स्थिती असताना सावरले. सलामीवीर प्रभसिमरन सिंगने ३९, तर प्रियांश आर्यने ४९ धावा केल्या. ऑस्ट्रेलियाकडून बेन ड्वारशुईस आणि विल सदरलँड यांनी प्रत्येकी तीन बळी घेतले.
२७६ धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना ऑस्ट्रेलिया अ संघाने जोश फिलिप (५६) आणि लियाम स्कॉट (२६) यांच्या जोरावर ८२ धावांची सलामी दिली. त्यानंतर लचलन शॉ (३१) आणि नॅथन मॅकस्विनी (३९) यांनी दुसऱ्या विकेटसाठी ५८ धावा जोडल्या. मात्र, मॅकस्विनीला गुरजपनीतने बाद केल्यानंतर ऑस्ट्रेलियाचा डाव गडगडला.