हरारे : युवा एकदिवसीय विश्वचषक स्पर्धेत (१९ वर्षांखालील) भारतीय संघ शुक्रवारी सहाव्यांदा जेतेपद मिळवण्याच्या निर्धाराने मैदानात उतरेल. हरारे स्पोर्ट्स क्लबवर रंगणाऱ्या अंतिम सामन्यात भारतापुढे इंग्लंडचे आव्हान असेल. भारताने सलग सहाव्यांदा अंतिम फेरीत धडक मारली असून आता २०२२नंतर पुन्हा विश्वचषक उंचावण्यासाठी आयुष म्हात्रेच्या नेतृत्वाखालील भारतीय युवा संघ उत्सुक आहे.
झिम्बाब्वे आणि नामिबिया येथे १५ जानेवारीपासून युवा विश्वचषक एकदिवसीय क्रिकेट स्पर्धेला प्रारंभ झाला. एकूण १६ संघांचा स्पर्धेत समावेश होता. मुंबईचा १८ वर्षीय आयुष या स्पर्धेत भारताचे नेतृत्व करत आहे. भारताने साखळी फेरीत सलग तिन्ही लढती जिंकताना अमेरिका, बांगलादेश व न्यूझीलंड यांना धूळ चारली. मग सुपर-सिक्स फेरीत भारताने झिम्बाब्वे व पाकिस्तानवर वर्चस्व गाजवले. दुसरीकडे इंग्लंडने उपांत्य सामन्यात ऑस्ट्रेलियाला पराभूत केले. भारत-इंग्लंड दोन्हीही संघ एकही लढत न गमावता अंतिम फेरीत दाखल झाले आहेत. त्यामुळेच दोघांमध्ये कडवी झुंज पाहायला मिळू शकते.
उपांत्य फेरीत भारताने अफगाणिस्तानने दिलेले ३११ धावांचे लक्ष्य ४१.१ षटकांत सहज गाठले. सलामीवीर आरोन जॉर्जने (१०४ चेंडूंत ११५ धावा) साकारलेल्या शतकाला वैभव सूर्यवंशी (३३ चेंडूंत ६८) आणि कर्णधार आयुष म्हात्रे (५९ चेंडूंत ६२) यांच्या अर्धशतकांची उत्तम साथ लाभली. त्यामुळे भारतीय संघाने उपांत्य सामन्यात अफगाणिस्तानचा ७ गडी व ५३ चेंडू राखून फडशा पाडला. स्पर्धेच्या इतिहासात सर्वात विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करण्याचा पराक्रमही भारताने केला.
यापूर्वी २००६मध्ये न्यूझीलंडने आयर्लंडविरुद्ध ३०५ धावांचे शिखर सर केले होते. एकंदर भारताने १०व्यांदा अंतिम फेरीत प्रवेश केला आहे. १९८८पासून सुरू झालेल्या विश्वचषकाचे हे १६वे पर्व सुरू आहे. भारतानेच सर्वाधिक ५ वेळा (२०००, २००८, २०१२, २०१८, २०२२) या स्पर्धेचे जेतेपद मिळवले आहे. तर चार वेळा त्यांना (२००६, २०१६, २०२०, २०२४) उपविजेतेपदावर समाधान मानावे लागले.
२०२२मध्ये भारताने अखेरचा युवा विश्वचषक उंचावला, तेव्हा इंग्लंडलाच अंतिम फेरीत नमवले होते. तर २०२४च्या युवा विश्वचषकातील अंतिम फेरीत भारताला ऑस्ट्रेलियाकडून पराभव पत्करावा लागला. त्यामुळे भारत यंदा पुन्हा जेतेपद मिळवणार की इंग्लंड २०२२चा वचपा काढणार, हे पाहणे रंजक ठरेल. ऋषिकेश कानिटकर या संघाचे प्रशिक्षक असून व्हीव्हीएस लक्ष्मणही मार्गदर्शन करत आहे.
इंग्लंडच्या संघाची भिस्त कर्णधार जेम्स ऱ्यूवर आहे. त्यानेच उपांत्य फेरीत ऑस्ट्रेलियाविरुद्ध शानदार शतकही झळकावले. गोलंदाजीत सबास्टियन मॉर्गन, फरहान अहमद यांच्याकडून इंग्लंडला अपेक्षा आहे. इंग्लंडने तिसऱ्यांदा अंतिम फेरी गाठली असून १९९८नंतर विश्वचषक उंचावण्यास ते आतुर असतील.
वेळ : दुपारी १ वाजता
थेट प्रक्षेपण : स्टार स्पोर्ट्स २, सिलेक्ट आणि जिओहॉटस्टार ॲप