शूटआऊटमध्ये भारत पराभूत; जागतिक चषक हॉकी स्पर्धेत पुरुषांची आठव्या स्थानी घसरण (Photo-X)
क्रीडा

शूटआऊटमध्ये भारत पराभूत; जागतिक चषक हॉकी स्पर्धेत पुरुषांची आठव्या स्थानी घसरण

'एफआयएच' हॉकी विश्वचषक २०२६ स्पर्धेतील सामन्यात यजमान बेल्जियमकडून पेनल्टी शूटआऊटमध्ये ४-३ असा पराभव पत्करावा लागल्याने भारतीय हॉकी संघाला आठव्या स्थानावर समाधान मानावे लागले आहे.

Swapnil S

वाव्रे : 'एफआयएच' हॉकी विश्वचषक २०२६ स्पर्धेतील सामन्यात यजमान बेल्जियमकडून पेनल्टी शूटआऊटमध्ये ४-३ असा पराभव पत्करावा लागल्याने भारतीय हॉकी संघाला आठव्या स्थानावर समाधान मानावे लागले आहे.

वाव्रे येथील बेलफिअस हॉकी एरिना स्टेडियमवर शुक्रवारी रात्री पार पडलेल्या या सामन्यात निर्धारित वेळेत दोन्ही संघ ३-३ असे बरोबरीत राहिल्यानंतर सामन्याचा निकाल शूटआऊटद्वारे लावला गेला. सामन्याच्या सहाव्या मिनिटाला मनप्रीत सिंगच्या पासवर अभिषेक नैन याने गोल करत भारताला १-० अशी आघाडी मिळवून दिली होती. मात्र, बेल्जियमने २२ व्या मिनिटाला रोमन डुवेकोट आणि २३ व्या मिनिटाला ह्युगो लाबोचेरेच्या गोलच्या जोरावर २-१ अशी आघाडी घेतली. उत्तरार्धात ३१ व्या मिनिटाला भारताचा कर्णधार हरमनप्रीत सिंगने पेनल्टी कॉर्नरवर गोल करत सामना २-२ असा बरोबरीत आणला. ४७ व्या मिनिटाला आर्थर दे स्लूव्हरने गोल करत बेल्जियमला पुन्हा ३-१ अशी आघाडी मिळवून दिली.

सामन्यातील अंतिम मिनिटांत भारताने गोलकीपर कार्केराला मागे घेत अतिरिक्त मैदानी खेळाडू उतरवला. हा डाव यशस्वी ठरला आणि ६० व्या मिनिटाला, सामना संपण्यास अवघे २६ सेकंद बाकी असताना हरमनप्रीतने पेनल्टी कॉर्नरचे गोलमध्ये रूपांतर करत ३-३ अशी बरोबरी साधली.

हरमनप्रीतचे आठ गोल

भारतीय कर्णधार हरमनप्रीत सिंगने स्पर्धेत एकूण आठ गोल नोंदवून अर्जेंटिनाच्या टोमास डोमेनसह अव्वल स्थान पटकावले. या सामन्यात बचावपटू अमित रोहिदासने २५०वा, तर मध्यफळीतील खेळाडू राजिंदर सिंगने ५० वा आंतरराष्ट्रीय सामना खेळण्याचा टप्पा पार केला. सामन्यादरम्यान भारताचा खेळाडू मनप्रीत सिंगच्या तोंडाला चेंडू लागल्याने तो रक्ताळलेल्या स्थितीत मैदानाबाहेर पडला.

ज्युनियर हॉकीत भारताचा कोरियाशी सामना

नवी दिल्ली: चीनमधील मोकी येथे ४ ते १३ सप्टेंबरदरम्यान होणाऱ्या महिला ज्युनिअर आशिया चषक हॉकी स्पर्धेत भारतीय संघ दक्षिण कोरियाविरुद्ध मोहिमेची सुरुवात करेल. खैदेम शिलेइमा चानूच्या नेतृत्वाखालील १८ सदस्यीय संघाचे प्रशिक्षण टिम व्हाईट करत आहेत. या स्पर्धेत भारतीय संघाचा यजमान चीन, जपान, दक्षिण कोरिया आणि मलेशियासह 'एलिट पूल 'मध्ये समावेश करण्यात आला आहे. साखळी फेरीतील सामन्यांनंतर १३ सप्टेंबर रोजी स्पर्धेचा अंतिम सामना पार पडेल.

(इंग्रजी बातमी वाचण्यासाठी येथे क्लिक करा.)

टॅक्सी, रिक्षाचालकांची याचिका निकाली; मराठी शिकण्यासाठी सरकारने वर्षभराची मुदत दिल्याचे न्यायालयाचे मत

Mumbai : स्थानकांवर थुंकल्यास हजार रुपये दंड; न भरल्यास प्रवाशाला न्यायालयात उभे करणार

मुद्रांक कायद्यातील मुदतीबाबत तिढा; प्रकरण मुख्य न्यायमूर्तीच्या खंडपीठाकडे वर्ग

'समृद्धी' महामार्गावर दरोडा! गाडी थांबवून वकिलाला लुटले; कुटुंबाला मारहाण करत १८ लाखांचे सोन्याचे दागिने, रोकड पळवली

यंदाची यूएस ओपन जिंकणार कोण? हंगामातील अखेरची ग्रँडस्लॅम टेनिस स्पर्धा आजपासून