सुवर्णपदकाच्या मार्गात पाकिस्तानचा अडथळा! श्रेयसच्या नेतृत्वात भारतीय टी-२० संघाची आज अंतिम परीक्षा BCCI
क्रीडा

सुवर्णपदकाच्या मार्गात पाकिस्तानचा अडथळा! श्रेयसच्या नेतृत्वात भारतीय टी-२० संघाची आज अंतिम परीक्षा

India vs Pakistan Asian Games cricket final 2026 : आशियाई क्रीडा स्पर्धेत सलग दुसऱ्यांदा सुवर्णपदक पटकावण्यापासून भारतीय पुरुष क्रिकेट संघ अवघा एक पाऊल दूर आहे. भारताच्या मार्गात शनिवारी रंगणाऱ्या महाअंतिम लढतीत पारंपरिक प्रतिस्पर्धी पाकिस्तानचा अडथळा असेल.

Swapnil S

निशिन : आशियाई क्रीडा स्पर्धेत सलग दुसऱ्यांदा सुवर्णपदक पटकावण्यापासून भारतीय पुरुष क्रिकेट संघ अवघा एक पाऊल दूर आहे. भारताच्या मार्गात शनिवारी रंगणाऱ्या महाअंतिम लढतीत पारंपरिक प्रतिस्पर्धी पाकिस्तानचा अडथळा असेल. त्यामुळे श्रेयस अय्यरच्या नेतृत्वात खेळणारा भारताचा टी-२० संघ शनिवारी पाकिस्तानला धूळ चारून सोनेरी यश संपादन करणार का, हे पाहणे रंजक ठरेल.

दोन्ही संघ क्रिकेटच्या मैदानावरील आपले वर्चस्व सिद्ध करण्यासाठी सज्ज झाले असून, खेळादरम्यान दोन्ही संघांच्या खेळाडूंमध्ये हस्तांदोलन होण्याची शक्यता नाही. गतवर्षी आशिया चषक स्पर्धेपासून सुरू झालेला हा ट्रेंड आता व्हॉलीबॉल, टेबल टेनिस आणि हॉकी यांसारख्या खेळांमध्येही पाहायला मिळत आहे. या स्पर्धेत क्रिकेटचा दर्जा फारसा उच्च नसला तरी, क्रीडा क्षेत्राचा वापर ‘सॉफ्ट पॉवर’ म्हणून करणाऱ्या देशासाठी पाकिस्तानला पराभूत करून सुवर्णपदक जिंकण्याचे महत्त्व अनन्यसाधारण आहे.

सततच्या पावसामुळे दोन्ही संघांनी उपांत्य फेरीत सहज विजय मिळवत अंतिम फेरीत प्रवेश केला आहे. गतविजेत्या भारताने उपांत्य सामन्यात श्रीलंकेचा १२४ धावांनी धुव्वा उडवला, तर पाकिस्तानने बांगलादेशला नमवले. हंगामी मुख्य प्रशिक्षक व्ही. व्ही. एस. लक्ष्मण आणि नवा टी-२० कर्णधार श्रेयस अय्यर यांच्यासाठी दुसऱ्या फळीतील पाकिस्तानविरुद्धचा हा अंतिम सामना एका कठीण आव्हानासारखा आहे.

जपानविरुद्धच्या स्पर्धेत भारताने आपला मुख्य संघ उतरवला असून, त्यात वेगवान गोलंदाजीचा प्रमुख असलेला जसप्रीत बुमराचाही समावेश आहे. असे असतानाही, पाकिस्तानविरुद्धच्या या सामन्यात सुवर्णपदक मिळाले तरी कौतुक होणार नाही, मात्र पराभव झाल्यास तो मोठा मानहानीचा धक्का ठरेल, याची कल्पना लक्ष्मण आणि अय्यर यांना आहे. पाकिस्तान संघात पीएसएलमधील प्रतिभावान खेळाडू असले तरी जुन्या काळातील खेळाडूंसारखी स्टार पॉवर या संघात नाही.

पाकिस्तानची मदार प्रामुख्याने अबरार अहमद आणि सुफियान मोकीम या दोन मनगटी फिरकीपटूंवर असेल. फिरकी गोलंदाजी करणाऱ्या षटकांमध्येच सामन्याचा निकाल लागण्याची शक्यता आहे. भारतीय संघात फलंदाजीसाठी अभिषेक शर्मा, वैभव सूर्यवंशी, संजू सॅमसन, श्रेयस अय्यर, इशान किशन, तिलक वर्मा आणि शिवम दुबे यांचा समावेश आहे. पाकिस्तानची फलंदाजी प्रामुख्याने कर्णधार साहिबजादा फरहान आणि इतर युवा खेळाडूंभोवती फिरणार आहे.

भारतीय पुरुष क्रिकेट संघाला सलग दुसऱ्यांदा सुवर्ण जिंकण्याची संधी आहे. २०२२मध्येदेखील भारताने सुवर्ण जिंकले होते. तसेच यंदा महिला संघानेही आधीच सुवर्ण पटकावले आहे. त्यामुळे पुरुषांकडेही आता लक्ष असेल.

खेळपट्टीचे आ‌व्हान ; फिरकीपटू निर्णायक

कोरोजी पार्क स्टेडियमवरील खेळपट्टीची स्थिती आणि हवामानामुळे विश्वस्तरीय संघ आणि इतर संघ यांच्यातील अंतर कमी झाले आहे. शनिवारी पावसाची शक्यता नसली तरी खेळपट्टीवरील ओलावा आणि कडक ऊन यामुळे अनपेक्षित उसळी आणि चांगला टर्न मिळत असून अक्षर पटेल, वॉशिंग्टन सुंदर आणि रवी बिश्नोई यांच्यासह बुमराची भूमिका अत्यंत महत्त्वाची ठरणार आहे. फिरकीला अपेक्षेपेक्षा जास्त मदत मिळाल्यास अभिषेक शर्माची भूमिकाही महत्त्वाची असेल.

प्रतिस्पर्धी संघ

भारत : श्रेयस अय्यर (कर्णधार), वैभव सूर्यवंशी, अभिषेक शर्मा, संजू सॅमसन, श्रेयस अय्यर, इशान किशन, तिलक वर्मा, शिवम दुबे, जसप्रीत बुमरा, वॉशिंग्टन सुंदर, अक्षर पटेल, रवी बिश्नोई, विपराज निगम, यश ठाकूर, अर्शदीप सिंग.

पाकिस्तान : साहिबजादा फरहान (कर्णधार), सय्यम अयूब, माझ सदाकत, उस्मान खान, हसन नवाज, अब्दुल समद, अराफत मिन्हास, मोहम्मद वसीम, अहमद दानियाल, सुफियान मोकीम, अबरार अहमद, अकिफ जावेद, अली रझा, साद मसूद, हैदर अली.

वेळ : सकाळी १०.३० वाजता ; थेट प्रक्षेपण : सोनी टेन ३, १ वाहिनी आणि सोनी लाईव्ह ॲप

(संबधित इंग्रजी बातमी वाचण्यासाठी येथे क्लिक करा.)

'ज्ञानेश कुमार मस्ट गो'चा नारा! शिवाजी पार्कवर अवतरली तरुणाई; राजीनामा न दिल्यास 'पुन्हा जंतरमंतर'चा अभिजीत दीपकेंचा इशारा

'विनर्स अकॅडमी'ला ठोकले सील; दिवेआगर दुर्घटनेनंतर प्रशासनाची मोठी कारवाई

दादासाहेब फाळके चित्रनगरीसाठी मानखुर्दची १४ एकर जमीन; महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांची माहिती

MPSC चे हरपाळकर यांची उचलबांगडी; सामान्य प्रशासन विभागाचा आदेश जारी

शिक्षणाचे खासगीकरण कंपनीकरणाच्या दिशेने