अॅम्स्टेलवीन : भारतीय पुरुष हॉकी संघाने हॉकी विश्वचषक स्पर्धेत दणदणीत सुरुवात केली. शनिवारी झालेल्या ड गटातील पहिल्या सामन्यात भारताने वेल्सचा ३-१ असा पराभव केला. भारताच्या या विजयात कर्णधार हरमनप्रीत सिंगने पेनल्टी कॉर्नरवरून दोन गोल करत मुख्य भूमिका बजावली.
सुमारे १० हजार प्रेक्षकक्षमता असलेल्या व्हेगनर स्टेडियमवर खेळल्या गेलेल्या या सामन्यात भारतीय संघाने बहुतांश वेळ वर्चस्व गाजवले. चौथ्या सत्राच्या अखेरीस वेल्सने एक गोल नोंदवण्यापूर्वी भारत ३-० असा आघाडीवर होता. सामनावीर ठरलेल्या हरमनप्रीत सिंगने ११ व्या आणि ४३ व्या मिनिटाला पेनल्टी कॉर्नरचे गोलमध्ये रूपांतर केले, तर संजयने आठव्या मिनिटाला थेट ड्रॅग-फ्लिकद्वारे गोल लगावला.
वेल्ससाठी सॅम वेल्शने ५६ व्या मिनिटाला एकमेव गोल केला. १९७५ मधील सुवर्णपदकानंतर पहिल्या विश्वचषक पदकाच्या शोधात असलेल्या भारताची सुरुवात काहीशी संथ झाली. सामन्याच्या सुरुवातीच्या मिनिटांत वेल्सने चेंडूवर नियंत्रण मिळवले होते. दुसऱ्या मिनिटाला फ्रेड न्यूबोल्डच्या पासवर जॅक प्रिटचार्डच्या प्रयत्नाला भारतीय गोलरक्षक सूरज करकेराने अपयशी ठरवले. त्यानंतर पाचव्या मिनिटालाही करकेराने न्यूबोल्डचा प्रयत्न यशस्वीपणे रोखला.
वेल्सच्या गोलरक्षकाला चकवत आठव्या मिनिटाला संजयने भारताचे खाते उघडले. त्यानंतर ११ व्या मिनिटाला हरमनप्रीतने जोरदार ड्रॅग-फ्लिक करत भारताची आघाडी २-० अशी दुप्पट केली. सामन्याच्या १९व्या मिनिटाला वेल्सला आघाडी कमी करण्याची संधी मिळाली होती, परंतु प्रिटचार्डचा फटका गोलपोस्टला लागला. मध्यंतरापर्यंत भारताने २-० अशी आघाडी कायम ठेवली. तिसऱ्या सत्रात भारताने दबाव कायम ठेवत ४३ व्या मिनिटाला हरमनप्रीतच्या गोलच्या जोरावर ३-० अशी मजबूत स्थिती प्राप्त केली होती.