महिला हॉकी संघ पाचव्या क्रमांकावर; विश्वचषकात जर्मनीवर ३-१ अशी मात X - TheHockeyIndia
क्रीडा

महिला हॉकी संघ पाचव्या क्रमांकावर; विश्वचषकात जर्मनीवर ३-१ अशी मात

भारतीय महिला हॉकी संघाने एफआयएच विश्वचषक हॉकी स्पर्धेतील क्रमवारीच्या सामन्यात उच्च मानांकित जर्मनीचा ३-१ असा पराभव करत पाचवे स्थान पटकावले. जागतिक चषकाच्या ५२ वर्षांच्या इतिहासातील भारतीय महिला संघाची ही सर्वोत्तम कामगिरी ठरली आहे.

Swapnil S

ॲम्स्टेलवीन : भारतीय महिला हॉकी संघाने एफआयएच विश्वचषक हॉकी स्पर्धेतील क्रमवारीच्या सामन्यात उच्च मानांकित जर्मनीचा ३-१ असा पराभव करत पाचवे स्थान पटकावले. जागतिक चषकाच्या ५२ वर्षांच्या इतिहासातील भारतीय महिला संघाची ही सर्वोत्तम कामगिरी ठरली आहे. भारताकडून नवनीत कौरने (४४ वे आणि ४७ वे मिनिट) दोन गोल करत विजयात मुख्य भूमिका बजावली, तर इषिकाने (४३ वे मिनिट) एक गोल केला. जर्मनीकडून लिन क्रिंग्सने ५९ व्या मिनिटाला एकमेव गोल केला.

यापूर्वी १९७४ मध्ये पहिल्यांदा झालेल्या विश्वचषक स्पर्धेत अजिंगर कौर यांच्या नेतृत्वाखाली भारतीय संघाने चौथे स्थान मिळवले होते, त्यानंतरची ही सर्वोत्तम कामगिरी आहे. विशेष म्हणजे सध्याच्या भारतीय संघात ११ खेळाडू पहिल्यांदाच जागतिक चषक खेळत होत्या. नवव्या क्रमांकावर असलेल्या भारतीय संघाला संपूर्ण स्पर्धेत केवळ एकच पराभव स्वीकारावा लागला. ऑलिम्पिक विजेत्या नेदरलँड्सने भारताचा ०-२ असा पराभव केला होता. पुढील महिन्यात होणाऱ्या आशियाई क्रीडा स्पर्धेपूर्वी या विजयामुळे भारतीय संघाचा आत्मविश्वास नक्कीच वाढेल.

पहिल्या सत्रापासून दोन्ही संघांनी एकमेकांवर दबाव आणण्याचा प्रयत्न केला. जर्मनीला सहा पेनल्टी कॉर्नर मिळाले, परंतु भारतीय गोलरक्षक आणि बचाव फळीने त्यांचा प्रत्येक प्रयत्न अपयशी ठरवला. सामन्याच्या पहिल्या ४३ मिनिटांपर्यंत दोन्ही संघांना गोल करण्यात अपयश आले होते. परंतु, शेवटच्या १७ मिनिटांत भारतीय संघाने उत्कृष्ट पासिंग, फिनिशिंग आणि मजबूत बचावाच्या जोरावर सलग तीन गोल डागले.

सामन्याच्या ४३व्या मिनिटाला नेहाकडून मिळालेल्या चेंडूवर इषिकाने गोल करत भारताचे खाते उघडले. त्यानंतर पुढच्याच मिनिटाला मिळालेल्या पेनल्टी कॉर्नरवर नवनीत कौरने शानदार शॉट मारत भारताला २-० अशी आघाडी मिळवून दिली. ४७व्या मिनिटाला नवनीतने जर्मन बचावपटूंना चकवत वैयक्तिक दुसरा आणि संघाचा तिसरा गोल नोंदवला. ५९व्या मिनिटाला जर्मनीला एक गोल करता आला, परंतु तोपर्यंत भारताचा विजय निश्चित झाला होता. शुक्रवारी भारतीय पुरुष संघाची सातव्या क्रमांकासाठी बेल्जियमशी लढत होणार आहे.

आजचा सामना

भारत वि. बेल्जियम

वेळ : रात्री ९.४५ वाजता

(संबधित इंग्रजी बातमी वाचण्यासाठी येथे क्लिक करा.)

नेपाळमध्ये ३०० भारतीय बेपत्ता; महापुरातील मृतांची संख्या ३५९; राज्यातील ११४ पर्यटक अडकले, ५३ पर्यटक सुरक्षित

Mumbai Metro 7A : आराखड्यातील चुकीमुळे २६० कोटींचा फटका; सल्लागाराच्या निष्काळजीपणावरून MMRDA वर टीका

मुंबईकरांनो, 'स्वाईन फ्लू' बळावतोय; रुग्णसंख्येत होतेय झपाट्याने वाढ, तीन महिन्यांत ३०९ रुग्णांची नोंद

Mumbai : रेल्वे स्थानक परिसर विकासाचे लक्ष्य; आयुक्त अश्विनी भिडेंचे निर्देश; मुलुंड, भांडूप, कांजूरला दिली भेट

गोवंडीतील पालिका शाळेत बकरी अड्डा; नगरसेवक निखिल व्यास यांचा आरोप