उपांत्य फेरी गाठण्याची संधी; भारतीय महिलांची आज हाँगकाँगशी गाठ, फलंदाजांकडून सुधारणा अपेक्षित X| BCCI
क्रीडा

उपांत्य फेरी गाठण्याची संधी; भारतीय महिलांची आज हाँगकाँगशी गाठ, फलंदाजांकडून सुधारणा अपेक्षित

हरमनप्रीत कौरच्या नेतृत्वात खेळणाऱ्या भारतीय महिला संघाला गुरुवारी आशिया चषक टी-२० स्पर्धेची उपांत्य फेरी गाठण्याची संधी आहे. दुबई येथे अ-गटातील दुसऱ्या साखळी सामन्यात भारताची गुरुवारी हाँगकाँगशी गाठ पडणार आहे. या लढतीत प्रामुख्याने भारतीय फलंदाजांकडून कामगिरीत सुधारणा अपेक्षित आहे.

Swapnil S

दुबई : हरमनप्रीत कौरच्या नेतृत्वात खेळणाऱ्या भारतीय महिला संघाला गुरुवारी आशिया चषक टी-२० स्पर्धेची उपांत्य फेरी गाठण्याची संधी आहे. दुबई येथे अ-गटातील दुसऱ्या साखळी सामन्यात भारताची गुरुवारी हाँगकाँगशी गाठ पडणार आहे. या लढतीत प्रामुख्याने भारतीय फलंदाजांकडून कामगिरीत सुधारणा अपेक्षित आहे.

या स्पर्धेत भारत, पाकिस्तान, विद्यमान विजेता श्रीलंका, बांगलादेश, यजमान संयुक्त अरब अमिराती, थायलंड, हाँगकाँग आणि इंडोनेशिया हे आठ संघ सहभागी होत आहेत. या संघांची दोन गटांत विभागणी करण्यात आली असून दोन्ही गटांतून आघाडीचे दोन संघ उपांत्य फेरीसाठी पात्र ठरतील. एकदिवसीय विश्वचषकाचा विजेता असलेला भारतीय संघ या स्पर्धेत प्रबळ दावेदार म्हणून उतरत आहे. सात वेळा विजेतेपद पटकावणाऱ्या भारतीय संघाने थायलंडविरुद्धच्या पहिल्या सामन्यात ९४ धावांनी सोपा विजय मिळवला होता, मात्र पहिल्या डावाच्या उत्तरार्धात झालेल्या फलंदाजीच्या पडझडीमुळे संघाला काही काळ अडचणींचा सामना करावा लागला होता.

पहिल्या सामन्यात १० षटकांत २ बाद १०१ धावा अशा मजबूत स्थितीत असताना भारतीय संघ २०० हून अधिक धावा करेल असे वाटत होते. मात्र, अवघ्या २९ धावांत ७ फलंदाज बाद झाल्याने भारताला १५९ धावांवर समाधान मानावे लागले. या पडझडीचा सामन्याच्या निकालावर परिणाम झाला नसला, तरी पाकिस्तानविरुद्धच्या महत्त्वाच्या सामन्याआधी आणि त्यानंतर जपानमध्ये होणाऱ्या आशियाई खेळांपूर्वी या चुका सुधारणे भारतासाठी गरजेचे आहे.

भारतासाठी शफाली वर्माने ६४ धावांची वेगवान खेळी केली होती, तर दीप्ती शर्माने एकही धाव न देता ३ बळी घेत महिला टी-२० मध्ये सर्वाधिक बळी घेणारी गोलंदाज होण्याचा मान मिळवला. जखमी जेमिमा रॉड्रिग्सच्या जागी संधी मिळालेली प्रतिका रावल आणि स्मृती मानधना यांना चांगल्या सुरवातीचे मोठ्या धावसंख्येत रूपांतर करावे लागेल. कर्णधार हरमनप्रीतलाही आपल्या फॉर्मबाबत उठणाऱ्या प्रश्नांना उत्तर देण्यासाठी धावांमध्ये पुनरागमन करावे लागणार आहे. हरमनप्रीत व स्मृती या अनुभवी खेळाडूंच्या कामगिरीवर सर्वांचे लक्ष असेल. तसेच दीप्ती व रिचा यांनादेखील फलंदाजीत जबाबदारी पेलावी लागणार आहे.

दुसऱ्या बाजूला, पहिल्या सामन्यात थायलंडकडून ६ धावांनी पराभूत झालेल्या हाँगकाँगच्या संघाने कडवी झुंज दिली होती. १२१ धावांचा पाठलाग करताना त्यांचा संघ ७ बाद ११४ धावांपर्यंतच पोहोचू शकला. मात्र, हाँगकाँगच्या मरिना लॅम्पलॉ हिने ११ धावांत ४ बळी घेत उत्कृष्ट गोलंदाजी केली होती. तसेच केरी चॅनने २० चेंडूंत २८ धावा करत मधल्या फळीत चमक दाखवली होती. भारताच्या आक्रमक फलंदाजांना रोखण्यासाठी हाँगकाँगला या खेळाडूंकडून मोठ्या कामगिरीची अपेक्षा असेल.

एकूणच आता महिला क्रिकेट भरारी घेत आहे. मात्र भारताला टी-२० प्रकारात कामगिरी उंचावण्याची गरज आहे. इंग्लंड येथे झालेल्या टी-२० विश्वचषकात भारताला उपांत्य फेरीसुद्धा गाठता आली नाही. २०२०च्या विश्वचषकात भारत अंतिम फेरीपर्यंत पोहोचला होता. हीच भारतीय महिलांची टी-२० विश्वचषकातील आजवरची सर्वोत्तम कामगिरी आहे. आता आशिया चषकात भारत पुन्हा वर्चस्व प्रस्थापित करण्यास उत्सुक असेल.

भारताचा संघ

हरमनप्रीत कौर (कर्णधार), स्मृती मानधना, भारती फुलमाळी, क्रांती गौड, रिचा घोष, गुणालन कमलिनी, प्रतिका रावल, प्रेमा रावत, अरुंधती रेड्डी, रेणुका सिंग, शफाली वर्मा, दीप्ती शर्मा, नंदिनी शर्मा, श्री चरणी, राधा यादव.

वेळ : रात्री ८ वाजता

थेट प्रक्षेपण : सोनी टेन १ वाहिनी आणि सोनी लिव्ह ॲप

(संबधित इंग्रजी बातमी वाचण्यासाठी येथे क्लिक करा.)

सेनेची लोकशाही रचना उद्धव यांनी बदलली; शिंदे गटाच्या वकिलांचा आरोप, सर्वोच्च न्यायालयात सुनावणी सुरू

Maratha Reservation : मनोज जरांगेंची प्रकृती खालावली; मराठा समाज आक्रमक, अनेक जिल्ह्यांत आंदोलन

एसटी आता 'विना वाहक'; महामंडळाची आर्थिकस्थिती सुधारण्यासाठी मनुष्यबळ खर्चात कपात

गणेश गल्लीत अवतरणार 'संतभूमी'! संतांच्या जीवनातील प्रेरणादायी प्रसंगांचे जिवंत दर्शन देखाव्यांतून घडविणार

अंधेरी, जोगेश्वरी, विलेपार्लेमधील अतिक्रमणे हटवली; 'पादचारी प्रथम' अभियानांतर्गत रेल्वे स्थानक परिसरातील अतिक्रमणांवर हातोडा