भारतीय पुरुष क्रिकेट संघाच्या कपड्यांचा घोळ; BCCI ची जर्सी घालून मैदानात उतरणार (Photo- X)
क्रीडा

भारतीय पुरुष क्रिकेट संघाच्या कपड्यांचा घोळ; BCCI ची जर्सी घालून मैदानात उतरणार

आशियाई क्रीडा स्पर्धेसाठी रविवारी भल्या पहाटे नागोयाकडे (जपान) रवाना होण्यापूर्वी भारतीय पुरुषांच्या क्रिकेट संघातील खेळाडूंना योग्य मापाचे कपडे (किट) मिळण्यात अडचणी येत आहेत.

Swapnil S

नवी दिल्ली : आशियाई क्रीडा स्पर्धेसाठी रविवारी भल्या पहाटे नागोयाकडे (जपान) रवाना होण्यापूर्वी भारतीय पुरुषांच्या क्रिकेट संघातील खेळाडूंना योग्य मापाचे कपडे (किट) मिळण्यात अडचणी येत आहेत. खेळाडूंच्या कपड्यांच्या मापावरून भारतीय क्रिकेट नियामक मंडळ (बीसीसीआय) आणि भारतीय ऑलिम्पिक संघटना (आयओए) यांचा कपडे पुरवठादार 'जेएसडब्ल्यू इन्स्पायर' यांच्यात सातत्याने चर्चा सुरू असल्याची माहिती समोर आली आहे. श्रेयस अय्यरच्या नेतृत्वाखालील भारतीय संघ रविवारी पहाटे राष्ट्रीय राजधानीतून जपानसाठी उड्डाण करणार आहे. मात्र बीसीसीआयची जर्सी घालूनच भारतीय संघ मैदानात उतरणार आहे.

२८ सप्टेंबरपासून सुरू होणाऱ्या मुख्य आशियाई क्रीडा स्पर्धेच्या अधिकृत जर्सी परिधान करण्यापूर्वी भारतीय खेळाडू २२ सप्टेंबर रोजी जपानविरुद्धच्या एकमेव टी-२० सामन्यासाठी त्यांचा नेहमीचा नियमित कपड्यांचा संच वापरतील. क्रिकेटपटूंच्या किटच्या मापाबाबत समस्या होती, त्यातील बहुतांश दुरुस्त करण्यात आल्या आहेत. उर्वरित काही खेळाडूंचे कपडे लवकरच संघाला पोहोचवले जातील, असे 'आयओए'च्या एका सूत्राने सांगितले. खेळाडूंना नेहमीच्या सामन्यांसाठी आणि आशियाई खेळांसाठी अशा दोन वेगवेगळ्या जर्सीची गरज असल्याने अशी अडचण निर्माण झाल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे.

दरम्यान, इतर भारतीय खेळाडूंना नागोया येथे राहण्याची व्यवस्था मिळण्यास झालेल्या विलंबाची दखल घेत 'बीसीसीआय'ने क्रिकेटपटूंसाठी स्वतःच्या स्तरावर स्वतंत्र हॉटेलची सोय केली आहे. नागोया येथील मैदानासह क्रिकेटच्या सुविधांवरही प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. आयोजकांनी पुरवलेल्या खोल्यांमध्ये किट बॅग ठेवण्यासही जागा नव्हती. त्यामुळे 'बीसीसीआय' ने उड्डाणापूर्वी स्वतःच्या व्यवस्थेने मोठे हॉटेल बुक केले. दुसरीकडे, 'आयओए' ने पुरवलेल्या निवासाच्या व्यवस्थेत भारतीय महिला क्रिकेट संघ राहत असून त्यांच्या निवासाचा कोणताही प्रश्न निर्माण झालेला नाही.

(इंग्रजी बातमी वाचण्यासाठी येथे क्लिक करा.)

Monsoon Update : मान्सूनचा काढता पाय; राजस्थानातून परतीचा प्रवास सुरू, हवामान खात्याची माहिती

लातूर बँकेच्या संचालकांना हटवण्याचे RBI चे आदेश

Mumbai : दादरमधील सीकेपी हॉलचा १२ ऑक्टोबरला लिलाव

पक्षचिन्हाच्या वादाबाबत ममता बॅनर्जी सर्वोच्च न्यायालयात

टॅरिफ विधेयकावर डोनाल्ड ट्रम्प यांची स्वाक्षरी