अहमदाबाद : आयपीएलमध्ये रविवारी दुपारी झालेल्या लढतीत तळाच्या चेन्नई सुपर किंग्जने अग्रस्थानावरील गुजरात टायटन्सला ८३ धावांनी धूळ चारत पराभवाचा धक्का दिला. या विजयासह चेन्नईने हंगामाचा शेवट गोड केला, तर गुजरातला मात्र निर्णायक क्षणी दोन पराभव पत्करावे लागल्याने त्यांच्या अव्वल दोन संघांत स्थान मिळवण्याच्या आशा धूसर झाल्या आहेत.
अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर झालेल्या या लढतीत महेंद्रसिंह धोनीच्या नेतृत्वात खेळणाऱ्या चेन्नईने प्रथम फलंदाजी करताना २० षटकांत ५ बाद २३० धावांचा डोंगर उभारला. त्याचा पाठलाग करताना गुजरातचा संघ १८.३ षटकांत १४७ धावांत गारद झाला. त्यामुळे गुजरातचे १४ सामन्यांनंतर ९ विजयांसह १८ गुण आहेत. मात्र धावगतीच्या तुलनेत ते मुंबई व पंजाबपेक्षा पिछाडीवर आहेत. अशा स्थितीत मुंबई, पंजाब व बंगळुरू या तिघांपैकी कोणीही दोघांनी आपापली शेवटची लढत जिंकली, तर गुजरातची तिसऱ्या स्थानी घसरण होईल. दुसरीकडे चेन्नईला मात्र धडाकेबाज विजयानंतरही शेवटच्या स्थानी समाधान मानावे लागले. चेन्नई व राजस्थान दोघांनीही १४ सामन्यांत प्रत्येकी चार लढती जिंकून ८ गुण कमावले. मात्र राजस्थानची धावगती (-०.५४९) चेन्नईच्या (-०.६४७) तुलनेत सरस ठरल्याने ते नवव्या, तर चेन्नई १०व्या स्थानी राहिली. त्यामुळे चेन्नईचा संघ इतिहासात प्रथमच गुणतालिकेत तळाशी राहिला.
प्रथम फलंदाजी करताना आयुष म्हात्रे व डेवॉन कॉन्वे यांनी २२ चेंडूंत ४४ धावांची सलामी नोंदवली. आयुष ३४ धावांवर बाद झाल्यावर कॉन्वेने ६ चौकार व २ षटकारांसह हंगामातील पहिले अर्धशतक साकारले. उर्विल पटेल (३७) व शिवम दुबे (१२) यांनीही फटकेबाजी कायम राखली. त्यानंतर ब्रेविसने सूत्रे हाती घेत ४ चौकार व ५ षटकारांसह २३ चेंडूंतच नाबाद ५७ धावा फटकावल्या. त्याने रवींद्र जडेजासह (नाबाग २१) पाचव्या विकेटसाठी ७४ धावांची भागीदारी रचली. त्यामुळे चेन्नईने सव्वादोनशे धावांचा पल्ला गाठला.
लक्ष्याचा पाठलाग करताना गुजरातची तारांबळ उडाली. अंशुल कंबोजने तिसऱ्याच षटकात शुभमन गिलचा (१३) अडसर दूर केला, तर खलिल अहमदने धोकादायक जोस बटलरला (५) जाळ्यात अडकवले. शर्फेन रुदरफोर्डही शून्यावरच माघारी परतला. ३ बाद ३० वरून मग गुजरातचा संघ संकटात सापडला. साई सुदर्शन (४१) व शाहरूख खान (१९) यांनी चौथ्या विकेटसाठी ५५ धावांची भर घालून काहीशी झुंज दिली. मात्र अपेक्षित धावगती वाढत गेल्याने त्यांचे बळी गेले. जडेजानेच सुदर्शन व शाहरूखला बाद केले.
त्यानंतर फिरकीपटू नूर अहमदने तळाच्या गोलंदाजांना बाद केले. राहुल तेवतिया (१४), रशिद खान (१२), अर्शद खान (२०) यांना नूरने माघारी पाठवले. अखेरीस अंशुलच्या गोलंदाजीवर साईकिशोरचा झेल धोनीने पकडून चेन्नईच्या विजयावर शिक्कामोर्तब केले. गुजरातचा संघ १४७ धावांत गारद झाला. त्यांच्यासाठी अंशुल व नूरने प्रत्येकी ३ बळी मिळवले.
हेझलवूडच्या परतण्याने बंगळुरूची चिंता कमी
ऑस्ट्रेलियन वेगवान गोलंदाज जोश हेझलवूडचे भारतात आगमन झाले आहे. त्यामुळे विराट कोहलीचा समावेश असलेल्या बंगळुरूची चिंता कमी झाली आहे. यंदाच्या आयपीएलमध्ये हेझलवूडने १० सामन्यांत १८ बळी मिळवले आहेत. मात्र दुखापतीमुळे तो काही सामन्यांना मुकला. तसेच आयपीएल स्थगित करण्यात आल्यावर हेझलवूड मायदेशी परतला होता. त्यावेळी तो भारतात येणार नाही, असेच वाटले. ऑस्ट्रेलिया-दक्षिण आफ्रिका यांच्यात ११ जूनपासून लंडन येथे जागतिक कसोटी अजिंक्यपदचा अंतिम सामना रंगणार आहे. यासाठी उर्वरित आयपीएलसाठी ऑस्ट्रेलियन बोर्डाने खेळाडूंना भारतात जाऊ नये की, याचा निर्णय सर्वस्वी खेलाडूंवर सोपवला होता. कोलकाताचा मिचेल स्टार्क परतला नसला, तरी हेझलवूडने मात्र पुन्हा भारतात येण्यास होकार दर्शवला.