लखनऊ : इंडियन प्रीमियर लीगमध्ये (आयपीएल) बुधवारी रंगणाऱ्या लढतीत अनुभवी ऋषभ पंतच्या नेतृत्वासह फलंदाजीचा कस लागणार आहे. पंतच्या कर्णधारपदाखाली लखनऊ सुपर जायंट्स संघ घरच्या मैदानात म्हणजेच इकाना स्टेडियमवर बुधवारी दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध हंगामातील सलामीचा सामना खेळणार आहे.
मार्च महिन्याच्या सुरुवातीला अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर टी-२० विश्वचषकाच्या महामुकाबल्यात भारताने न्यूझीलंडचा ९६ धावांनी फडशा पाडला. सूर्यकुमार यादवच्या नेतृत्वात भारताने एकंदर तिसऱ्यांदा, तर सलग दुसऱ्यांदा टी-२० विश्वचषक जिंकण्याचा पराक्रम केला. भारताच्या या विश्वविजयात अनेक हिऱ्यांचे मोलाचे योगदान लाभले. भारत हा सलग दोन टी-२० विश्वचषक जिंकणारा तसेच मायदेशात जेतेपद मिळवणारा पहिलाच संघ ठरला. आता २० दिवसांच्या विश्रांतीनंतर भारताचे सर्व तारे पुन्हा आयपीएलच्या निमित्ताने मैदानात दिसत आहेत.
२८ मार्चपासून आयपीएलच्या १९व्या पर्वाला धडाक्यात प्रारंभ झाला. बंगळुरू-हैदराबाद, मुंबई-कोलकाता या लढतींमध्ये धावांचा वर्षाव पाहायला मिळाला, तर चेन्नईविरुद्ध राजस्थानने गोलंदाजीच्या बळावर बाजी मारली. यंदादेखील प्रत्येक संघाला १४ सामने खेळायचे आहेत. त्यांपैकी ७ लढती या घरच्या मैदानात, तर उर्वरित ७ लढती प्रतिस्पर्धी संघाच्या मैदानात होतील.
दरम्यान, २८ वर्षीय पंत गेल्या आयपीएल लिलावात आजवरचा सर्वाधिक महागडा खेळाडू ठरला होता. त्याच्यावर लखनऊचे संघमालक संजीव गोएंका यांनी २७ कोटींची बोली लावली होती. मात्र पंतला त्या हंगामात लौकिकाला साजेशी कामगिरी करता आली नाही. परिणामी लखनऊचा संघही साखळी फेरीतच गारद झाला. पंतने संपूर्ण हंगामात फक्त २६९ धावा केल्या. त्यापैकी ११८ धावांची खेळी त्याने शेवटच्या लढतीत साकारली. मधल्या फळीत पंत चौथ्या ते सहाव्यापैकी कोणत्याही स्थानी फलंदाजी करत होता. मिचेल मार्श, एडीन मार्करम व निकोलस पूरन हे धडाकेबाज फलंदाजांचे विदेशी त्रिकुट लखनऊकडून पहिल्या तीन क्रमांकात फलंदाजी करायचे. मात्र लखनऊचे प्रशिक्षक जस्टिन लँगर यांनी स्वत: यंदा पंत तिसऱ्या क्रमांकावर फलंदाजी करताना पाहायला मिळू शकतो, असे सांगितले. जोश इंग्लिस, आयुष बदोनी, अब्दुल समद हे फलंदाजही लखनऊकडे आहेत. पंत हा २०२४च्या टी-२० विश्वचषकात भारतीय संघाचा सदस्य होता. मात्र यंदा २०२६मध्ये जिंकलेल्या टी-२० विश्वचषकासाठी त्याचा विचार करण्यात आला नाही. एकदिवसीय संघातही राहुलला प्रथम प्राधान्य दिले जाते. त्यामुळे पंतसाठी आगामी आयपीएल निर्णायक ठरेल, यात शंका नाही.
दुसरीकडे अक्षर पटेलच्या नेतृत्वात खेळणारा दिल्लीचा संघदेखील गेल्या हंगामाचे अपयश पुसून काढत नवी सुरुवात करण्यासाठी आतुर असेल. दिल्लीला गतवर्षी पाचव्या स्थानी समाधान मानावे लागले. एकवेळ दिल्लीने सुरुवातीच्या पाचपैकी चार लढती जिंकल्या होत्या. मात्र दुसऱ्या टप्प्यात त्यांची कामगिरी खालावली. लखनऊला त्यांच्याच मैदानात नमवून विजयारंभ करण्याचे दिल्लीचे लक्ष्य असेल.
शमी, मयांकच्या तंदुरुस्तीची लखनऊला चिंता
लखनऊ संघाची गोलंदाजी अनुभवी मोहम्मद शमी व युवा मयांक यादव या वेगवान जोडीवर असेल. भारतीय संघातून स्थान गमावलेला शमी आयपीएलद्वारे निवड समितीचे लक्ष वेधण्यास आतुर असेल, तर १५० पेक्षा अधिक किमी वेगाने गोलंदाजी करू शकणारा मयांक संपूर्ण हंगामात तंदुरुस्त राहणार का, हे पाहणे रंजक ठरेल. फिरकीपटू दिग्वेश राठी लखनऊसाठी हुकमा एक्का ठरू शकतो. त्याशिवाय आनरिख नॉर्किए, आवेश खान, प्रिन्स यादव यांच्याकडून गोलंदाजीत अपेक्षा आहे. वानिंदू हसरंगा अद्याप जायबंदी असल्याने तो अनुपलब्ध असेल.
राहुलवर दिल्लीच्या फलंदाजीची भिस्त
दिल्लीच्या संघात यंदा फलंदाजांचे असंख्य पर्याय उपलब्ध आहेत. मात्र अनुभवी के. एल. राहुलवरच दिल्लीची प्रामुख्याने भिस्त असेल. त्याशिवाय पृथ्वी शॉ याला संधी मिळणार का, याकडे लक्ष असेल. अभिषेक पोरेल, करुण नायर, नितीश राणा यांच्यासह पथुम निसांका, डेव्हिड मिलर, आशुतोष शर्मा, ट्रिस्टन स्टब्स असे धडाकेबाज फलंदाज त्यांच्याकडे आहेत. गोलंदाजीत मिचेल स्टार्कच्या अनुपस्थितीत लुंगी एन्गिडी, आकिब नबी आणि फिरकीपटू कुलदीप यादव यांच्यावर मदार असेल.