भारताचा अनमोल एक्का, अंतिम फेरीत प्रवेश पक्का; युवा हॉकी संघाचा उपांत्य लढतीत मलेशियावर ३-१ असा दमदार विजय X| @TheHockeyIndia
क्रीडा

भारताचा अनमोल एक्का, अंतिम फेरीत प्रवेश पक्का; युवा हॉकी संघाचा उपांत्य लढतीत मलेशियावर ३-१ असा दमदार विजय

कर्णधार अनमोल एक्काचे दोन गोल आणि गोलरक्षक विवेक लाक्राचा चमकदार बचाव यांच्या जोरावर गतविजेत्या भारतीय संघाने मलेशियाचा ३-१ असा पराभव केला. या विजयासह भारताने सलग चौथ्यांदा कनिष्ठ आशिया चषक हॉकी स्पर्धेच्या अंतिम फेरीत धडक मारली आहे.

Swapnil S

मोकी (चीन) : कर्णधार अनमोल एक्काचे दोन गोल आणि गोलरक्षक विवेक लाक्राचा चमकदार बचाव यांच्या जोरावर गतविजेत्या भारतीय संघाने मलेशियाचा ३-१ असा पराभव केला. या विजयासह भारताने सलग चौथ्यांदा कनिष्ठ आशिया चषक हॉकी स्पर्धेच्या अंतिम फेरीत धडक मारली आहे. सलग चौथे आणि एकूण सहावे विजेतेपद जिंकण्याच्या ध्येयाने मैदानात उतरलेला भारतीय संघ आता पाकिस्तान आणि दक्षिण कोरिया यांच्यातील दुसऱ्या उपांत्य सामन्यातील विजेत्या संघाशी भिडणार आहे.

सामन्याच्या दुसऱ्या सत्रात १६ व्या मिनिटाला भारताला चौथा पेनल्टी कॉर्नर मिळाला, ज्यावर कर्णधार अनमोल एक्काने सुरेख गोल करत भारताला १-० अशी आघाडी मिळवून दिली. या स्पर्धेत अनमोलने पेनल्टी कॉर्नरवरून गोल करण्याची आपली मालिका कायम ठेवत वैयक्तिक १६ गोल पूर्ण केले आहेत. मलेशियाने १७व्या मिनिटाला प्रत्युत्तर देण्याचा प्रयत्न केला, परंतु भारतीय बचावफळीने त्यांचा प्रयत्न उधळून लावला.

सामन्याच्या ३६व्या मिनिटाला मनमीत सिंग राय याला आणि ४१व्या मिनिटाला प्रभदीप सिंग याला पिवळे कार्ड दाखवण्यात आल्याने भारताला १० खेळाडूंसह खेळावे लागले. अशा कठीण परिस्थितीतही गोलरक्षक विवेक लाक्राने अत्यंत प्रभावी कामगिरी केली. ३४ व्या मिनिटाला दुहेरी बचाव केल्यानंतर, ५३व्या मिनिटाला मलेशियाला मिळालेला पेनल्टी स्ट्रोक डावीकडे झेप घेत लाक्राने अतिशय कौशल्याने रोखला.

या बचावकार्यानंतर लगेचच चौथ्या सत्रात ५१व्या मिनिटाला सुखविंदरने गोल करत भारताची आघाडी २-० अशी वाढवली. ५४व्या मिनिटाला अनमोलने पुन्हा एकदा पेनल्टी कॉर्नरचे गोलमध्ये रूपांतर करत भारताला ३-० अशी भक्कम आघाडी मिळवून दिली. सामन्याच्या शेवटच्या २४ सेकंदात मलेशियाच्या एम. राहूलने पेनल्टी कॉर्नरवर गोल नोंदवून सांत्वनपर १ गोल केला, मात्र तोपर्यंत भारताने ३-१ असा विजय निश्चित केला होता.

एकूणच भारतीय युवा संघाने केलेली कामगिरी कौतुकास्पद असून आता रविवारी ते अंतिम फेरीत जेतेपद मिळवतील, अशी अपेक्षा आहे.

(संबधित इंग्रजी बातमी वाचण्यासाठी येथे क्लिक करा.)

Maratha Reservation : उत्सवात विघ्न नाही; मनोज जरांगेंचा निर्वाळा, अंतरवाली सराटीत आज बैठक, मुंबई आंदोलनाचा कार्यक्रम ठरणार

Mumbai Rain : आजपासून पुन्हा पाऊस; मुंबईत यलो अलर्ट

BRICS Summit 2026 : आजपासून दिल्लीत ब्रिक्स शिखर परिषद

Navi Mumbai : सचिवांच्या तोंडाला काळे; MPSC च्या विरोधात संभाजी ब्रिगेडचे आंदोलन

लंडनमध्ये विश्व मराठी साहित्य संमेलन, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदें यांची घोषणा