लंडन : इंग्लंडचा माजी कर्णधार केव्हिन पीटरसनची पुढील वर्षी आफ्रिकेत होणाऱ्या आयसीसी विश्वचषकाच्या पार्श्वभूमीवर इंग्लंडच्या एकदिवसीय आणि टी-२० संघाचा विशेष मार्गदर्शक (मेंटॉर) म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. या महिन्याच्या शेवटी श्रीलंका विरुद्ध होणाऱ्या टी-२० आणि एकदिवसीय मालिकेपासून पीटरसन मुख्य प्रशिक्षक ब्रेंडन मॅक्युलम यांच्या नेतृत्वाखालील कोचिंग स्टाफमध्ये सहभागी होईल. या कोचिंग टीममध्ये मार्कस ट्रेस्कोथिक, टिम साउदी, जीतन पटेल आणि सारा टेलर यांचाही समावेश आहे.
पीटरसन आगामी ऑस्ट्रेलिया आणि दक्षिण आफ्रिकेच्या व्हाईट-बॉल दौऱ्यात, तसेच पुढील उन्हाळ्यात पाकिस्तान आणि न्यूझीलंडविरुद्धच्या मायदेशातील मालिकेदरम्यान आणि विश्वचषक स्पर्धेतही संघासोबत कार्यरत राहील. इंग्लंड क्रिकेट बोर्डाने (ईसीबी) जारी केलेल्या निवेदनात पीटरसनने आनंद व्यक्त केला आहे. “दक्षिण आफ्रिकेत होणाऱ्या विश्वचषकात संघाला मदत करण्यासाठी विचारणा होणे हा माझ्यासाठी मोठा बहुमान आहे. २०१४ नंतर पहिल्यांदाच इंग्लंडचा गणवेश परिधान करणे ही माझ्यासाठी अत्यंत विशेष गोष्ट आहे. आमच्याकडे अत्यंत प्रभावी खेळाडूंचा भरणा असलेला संघ असून ब्रेंडन यांच्या थिंक टँकचा भाग होण्यासाठी मी उत्सुक आहे,” असे पीटरसन म्हणाला.
१० वर्षांच्या आंतरराष्ट्रीय कारकिर्दीत पीटरसनने इंग्लंडसाठी १३६ एकदिवसीय आणि ३७ टी-२० सामने खेळले असून ५,५०० हून अधिक धावा केल्या आहेत. याशिवाय १०४ कसोटी सामन्यांमध्ये त्याने ८,१८१ धावा केल्या आहेत. आयपीएल २०२५ दरम्यान त्याने 'दिल्ली कॅपिटल्स'चा मेंटॉर म्हणूनही काम पाहिले होते.