मेस्सीचा अलविदा! आंतरराष्ट्रीय फुटबॉलमधून निवृत्तीची घोषणा संग्रहित छायाचित्र
क्रीडा

मेस्सीचा अलविदा! आंतरराष्ट्रीय फुटबॉलमधून निवृत्तीची घोषणा

विश्वातील सर्वोत्तम फुटबॉलपटू म्हणून लोकप्रिय असलेल्या अर्जेंटिनाच्या लिओनेल मेस्सीने सोमवारी आंतरराष्ट्रीय कारकीर्दीला अलविदा केला.

Swapnil S

ब्युनस आयर्स : विश्वातील सर्वोत्तम फुटबॉलपटू म्हणून लोकप्रिय असलेल्या अर्जेंटिनाच्या लिओनेल मेस्सीने सोमवारी आंतरराष्ट्रीय कारकीर्दीला अलविदा केला. वयाच्या ३९व्या वर्षी मेस्सीने इन्स्टाग्रामवर विशेष पत्र लिहून आंतरराष्ट्रीय फुटबॉलमधून निवृत्तीची घोषणा केली. क्लबपातळीवरील स्पर्धांमध्ये मेस्सी खेळणार असला तरी अर्जेंटिनाकडून तो आता खेळताना दिसणार नाही.

आपल्या कारकीर्दीत सहा विश्वचषक स्पर्धांमध्ये भाग घेणाऱ्या मेस्सीने २०२२ मध्ये कतार येथे अर्जेंटिनाला विश्वचषक जिंकून दिला होता. त्यानंतर जून-जुलै महिन्यात अमेरिका येथे झालेल्या २०२६च्या फुटबॉल विश्वचषकात मेस्सीच्या नेतृत्वात अर्जेंटिनाने अंतिम फेरीपर्यंत धडक मारली होती. मात्र त्यांना स्पेनकडून अंतिम फेरीत पराभव पत्करावा लागला. मेस्सीचे वडील जॉर्ज यांचे ८ ऑगस्ट रोजी निधन झाले. बराच काळापासून ते आजाराशी झुंज देत होते. विश्वचषकातील पराभवानंतरच मेस्सीने हे पत्र लिहिले होते, असे समजते. मात्र वडिलांच्या प्रकृतीमुळे त्याने निवृत्तीची घोषणा लांबवली.

“हा निर्णय घेताना मला खूप वेदना झाल्या आणि अजूनही होत आहेत, परंतु हीच योग्य वेळ आहे हे मला समजले आहे. मी नेहमीच माझी पूर्ण क्षमता पणाला लावली. केवळ गेल्या काही वर्षांत आम्ही विजेतेपदे जिंकली म्हणूनच नव्हे, तर त्याआधीही मी या जर्सीसाठी सर्वस्व पणाला लावले होते,” असे मेस्सी म्हणाला. मेस्सीचा भारतात वेगळा चाहता वर्ग असून संपूर्ण फिफा विश्वचषकादरम्यान अर्जेंटिनाच्या आणि विशेषत: मेस्सीच्या १० क्रमांकाच्या जर्सीला जगभरात मोठा प्रतिसाद लाभायचा.

मेस्सीने २००६ मध्ये विश्वचषकातील पहिला सामना खेळला. २०२२ मध्ये विश्वचषक उंचावेपर्यंत त्याचा हा प्रवास अनेक संघर्षांनी भरलेला होता. २०१४मध्ये अर्जेंटिनाला जर्मनीकडून विश्वचषकाच्या अंतिम फेरीत पराभव पत्करावा लागला होता. त्यावेळी अनेकांनी मेस्सीवर टीका केली होती. “गेल्या २० वर्षांत दिलेल्या प्रेमाबद्दल सर्वांचे आभार. आता मी तुमच्यातीलच एक बनून बाहेरून संघाला पाठिंबा देईन,” असेही मेस्सीने म्हटले आहे.

दरम्यान, क्लब पातळीवर व्यावसायिक फुटबॉल किती काळ खेळणार याबाबत इंटर मियामीच्या या कर्णधारने काही स्पष्ट केलेले नाही. नुकत्याच झालेल्या लढतीत इंटर मियामीने सीएफ मॉन्ट्रियलचा ७-१ असा पराभव केला, ज्यात मेस्सीने ४ गोल नोंदवले होते.

भारतीयांचे मेस्सीप्रेम

२०११मध्ये मेस्सी कोलकाता येथील सॉल्ट लेक स्टेडियममध्ये सामना खेळण्यासाठी आला होता. त्यानंतर २०२५मध्ये डिसेंबर महिन्यात तो १४ वर्षांनी पुन्हा भारतात परतला. मेस्सीचे जगभरात असंख्य चाहते आहेत. मात्र भारतात त्याला विशिष्ट प्रेम लाभले. हैदराबाद, कोलकाता, मुंबई, दिल्ली या शहरांना मेस्सीने भेट दिली. मुंबईतील वानखेडे स्टेडियमवर मेस्सीला पाहण्यासाठी चाहत्यांनी तुडुंब गर्दी केली होती.

कारकीर्दीचा आढावा

  • पदार्पण : १७ ऑगस्ट, २००५ वि. हंगेरी

  • अखेरचा सामना : १९ जुलै, २०२६ वि. स्पेन

  • सामने : २०७

  • गोल : १२५

  • विश्वचषक जेतेपद : १

  • कोपा अमेरिका : २०२१, २०२४

बार्सिलोनामध्ये खेळ बहरला

मेस्सीची कारकीर्द बार्सिलोनाकडून झळाळली. त्याला स्पेनच्या चाहत्यांकडून प्रचंड प्रेम लाभले. त्याने १७ हंगामांत बार्सिलोनाचे प्रतिनिधित्व करताना ७७८ सामन्यांत ६७२ गोल केले. तसेच ३५ विजेतेपद संघाला मिळवून दिले. ला लिगामध्ये मेस्सी विरुद्ध रोनाल्डोच्या रेयाल माद्रिद संघाची जुगलबंदी पाहण्याजोगी होती.

हे महत्त्वाचे!

  • यंदाच्या विश्वचषकात मेस्सीने ८ गोल केले. तसेच फिफा विश्वचषकात सर्वाधिक गोल करणाऱ्यांच्या यादीत तो २१ गोलसह दुसऱ्या स्थानी आहे.

  • विश्वचषकातील सलग सात सामन्यांत गोल करणारा मेस्सी हा एकमेव खेळाडू आहे. यामध्ये २०२२च्या उपांत्यपूर्व, उपांत्य व अंतिम फेरीचाही समावेश आहे.

  • कारकीर्दीत दोन वेळा फिफा विश्वचषकातील सर्वोत्तम खेळाडू ठरणारा मेस्सी हा एकमेव आहे. त्याने २०१४ व २०२२मध्ये हा पराक्रम केला.

  • मेस्सीने २०२६च्या विश्वचषकात पाचव्यांदा सामनावीर पुरस्कार पटकावला. याबरोबरच त्याने विश्वचषकात सर्वाधिक सामनावीर पुरस्कार जिंकणाऱ्यांच्या यादीत अग्रस्थान पटकावत इंग्लंडच्या बेलिंघमवर (४ वेळा) सरशी साधली होती.

  • मेस्सी हा विश्वचषकात सर्वाधिक १० असिस्ट करणारा पहिला खेळाडू आहे. त्याने अर्जेंटिनाच्याच दिएगो मॅराडोना यांचा विक्रम मोडीत काढला होता.

(इंग्रजी बातमी वाचण्यासाठी येथे क्लिक करा.)

Mumbai : आजपासून रिक्षा, टॅक्सी प्रवास महागणार; भाड्यात १ ते २ रुपयांची वाढ

सांस्कृतिक पद्धतीने गणेशोत्सव साजरा करा; मुख्यमंत्री फडणवीसांचे पुणेकरांना आवाहन

राज्यातील २ कोटी ६ लाख मतदार वगळले; महाराष्ट्राची प्रारुप मतदार यादी जाहीर; १७ लाख दुबार, तर ३४ लाख मृत्यू झालेले मतदार

मुंबईकडे जाण्याची तयारी करा; मनोज जरांगेंचे मराठा समाजाला आवाहन

होऊ दे खर्च! फडणवीस, शिंदे, पवारांच्या बंगल्यांमध्ये ‘पाहुणचार’; अडीच वर्षांत २१ कोटींची उधळण, फडणवीसांपेक्षा शिंदेंचा खर्च दुप्पट