नवी दिल्ली : महाराष्ट्राच्या विश्वजित मोरे याने २३ वर्षांखालील जागतिक कुस्ती अजिंक्यपद स्पर्धेत ऐतिहासिक कामगिरी करत रौप्यपदक पटकावले आहे. जागतिक कुस्ती स्पर्धेत ग्रीको-रोमन प्रकारात रौप्यपदक जिंकणारा तो पहिला भारतीय मल्ल ठरला आहे.
याआधी त्याच्या नावावर दोन कांस्यपदके जमा होती. अंतिम फेरीत जॉर्जियाच्या कोबा कारुमिद्झेविरुद्ध झालेल्या अतिशय अटीतटीच्या लढतीत १२-१३ अशा गुणांनी पराभव पत्करावा लागल्यामुळे मोरेचे सुवर्णपदक थोडक्यात हुकले आणि त्याला रौप्यपदकावर समाधान मानवा लागले. मोरेने आपल्या मोहिमेची सुरुवात मेक्सिकोच्या इसाक मारिन माताविरुद्ध १०-८ अशा चुरशीच्या विजयाने केली. त्यानंतर उपांत्यपूर्व फेरीत त्याने इराणचा २० वर्षांखालील जागतिक विजेता आर्मिन शम्सिपूर याच्यावर ८-१ असे दणदणीत वर्चस्व गाजवले. या सामन्यादरम्यान इराणच्या मल्लाच्या डाव्या खांद्याला दुखापत झाल्यामुळे भारतीय मल्लासाठी विजय सुकर झाला. मोरेने पहिल्या फेरीत डावाचा प्रयत्न केला होता, मात्र तो व्यवस्थित अंमलात आला नाही. त्यानंतर त्याने इराणच्या मल्लाला फिरवून चार गुणांची कमाई केली, ज्यामुळे शम्सिपूरला दुखापत झाल्याचे दिसून आले. वेदनेने विव्हळत असलेल्या इराणी मल्लने वैद्यकीय वेळेची मागणी केली आणि शेवटच्या मिनिटाला तो प्रतिकार करू शकला नाही.
रशियाच्या मलिक गिगिएव्हविरुद्ध झालेला उपांत्य सामना अतिशय चुरशीचा ठरला, ज्यामध्ये मोरेने ७-४ अशा फरकाने बाजी मारली.