मुंबई : आगामी रणजी करंडक स्पर्धेच्या सलामीच्या सामन्यासाठी आयुष म्हात्रेची मुंबई संघाच्या उपकर्णधारपदी निवड करण्यात आली आहे. तसेच भारताचा सलामीवीर यशस्वी जैस्वालचा मुंबईच्या १६ सदस्यीय संघात समावेश करण्यात आला आहे. विक्रमी ४२ वेळा विजेतेपद पटकावणारा मुंबई संघ ११ ते १५ ऑक्टोबर दरम्यान चंदीगडविरुद्ध आपला पहिला सामना खेळणार असून हा सामना वानखेडे स्टेडियमवर होणे अपेक्षित आहे.
मुंबई आणि चंदीगड संघ हरयाणा, राजस्थान, रेल्वे, तमिळनाडू आणि उत्तराखंड यांच्यासह एलिट-ड गटात समाविष्ट आहेत. या संघात भारताचा फलंदाज सर्फराझ खान याचाही समावेश आहे, जो यापूर्वी इराणी कपमध्ये जम्मू-काश्मीरविरुद्ध रेस्ट ऑफ इंडियाच्या विजयात सहभागी झाला होता. तसेच, ऑस्ट्रेलिया-अ संघाविरुद्धच्या दोन सामन्यांच्या अनधिकृत कसोटी मालिकेत भारताला १-० ने विजय मिळवून देण्यात महत्त्वाची भूमिका बजावणारा अष्टपैलू खेळाडू शम्स मुलानीचाही संघात समावेश आहे.
या वर्षाच्या सुरुवातीला भारताला १९ वर्षांखालील विश्वचषक विजय मिळवून देणाऱ्या म्हात्रेची संघाच्या उपकर्णधारपदी नियुक्ती करण्यात आली आहे. आयपीएलमध्ये चेन्नईकडून खेळतानाही त्याने छाप पाडली आहे. दरम्यान, मुंबईचा माजी कर्णधार आणि भारताचा अष्टपैलू खेळाडू शार्दुल ठाकूर दुखापतीमुळे उपलब्ध नसल्याचे समजते.
मुंबईचा संघ
सिद्धेश लाड (कर्णधार), आयुष म्हात्रे, यशस्वी जैस्वाल, दिव्यांश सक्सेना, मुशीर खान, सर्फराझ खान, सुवेद पारकर, आकाश आनंद, हार्दिक तामोरे, शम्स मुलाणी, तनुष कोटियन, अथर्व अंकोलेकर, तुषार देशपांडे, मोहित अवस्थी, सेल्व्हेस्टर डीसोझा, ओमकार तरमाळे.