क्रीडा

पाकिस्तान हॉकी संघाची माघार; पंजाब येथे होणाऱ्या आशियाई चॅम्पियन्स ट्रॉफी स्पर्धेसाठी येण्यास नकार

पाकिस्तान हॉकी पुरुष संघाने आगामी आशियाई चॅम्पियन्स ट्रॉफी हॉकी स्पर्धेतून माघार घेतली आहे. त्यामुळे बांगलादेशचा या स्पर्धेत समावेश करण्यात आला आहे. सुरक्षेचे कारण देत पाकिस्तानने कनिष्ठ आशिया चषकाप्रमाणेच पंजाब येथे होणाऱ्या आशियाई स्पर्धेत सहभागी न होण्याचे ठरवले आहे.

Swapnil S

नवी दिल्ली : पाकिस्तान हॉकी पुरुष संघाने आगामी आशियाई चॅम्पियन्स ट्रॉफी हॉकी स्पर्धेतून माघार घेतली आहे. त्यामुळे बांगलादेशचा या स्पर्धेत समावेश करण्यात आला आहे. सुरक्षेचे कारण देत पाकिस्तानने कनिष्ठ आशिया चषकाप्रमाणेच पंजाब येथे होणाऱ्या आशियाई स्पर्धेत सहभागी न होण्याचे ठरवले आहे.

आशियाई क्रीडा स्पर्धेचे विजेतेपद पटकावणारा हरमनप्रीत सिंगच्या नेतृत्वाखालील भारतीय पुरुष संघ आगामी आशियाई चॅम्पियन्स ट्रॉफी स्पर्धेत आपल्या मोहिमेची सुरुवात २७ ऑक्टोबर रोजी बांगलादेशविरुद्धच्या सामन्याने करणार आहे. ही स्पर्धा २७ ऑक्टोबर ते ५ नोव्हेंबर दरम्यान पंजाबमधील दोन वेगवेगळ्या शहरांमध्ये खेळवली जाणार असून, यात जालंधर येथील ऑलिम्पियन सुरजित सिंग हॉकी स्टेडियम आणि मोहाली येथील ऑलिम्पियन बलबीर सिंग सीनियर आंतरराष्ट्रीय हॉकी स्टेडियमचा समावेश आहे.

जालंधर येथे २७ ऑक्टोबर ते २ नोव्हेंबर दरम्यान स्पर्धेचे सर्व लीग सामने खेळवले जातील, तर स्पर्धेतील अंतिम टप्प्यातील सामने मोहाली येथे हलवण्यात येणार आहेत. मोहाली येथील स्टेडियमवर ४ नोव्हेंबर रोजी उपांत्य फेरीचे सामने आणि ५ नोव्हेंबर रोजी कांस्य व सुवर्णपदकासाठीचे अंतिम सामने खेळवले जातील. या स्पर्धेत भारत, मलेशियन, जपान, दक्षिण कोरिया, चीन आणि बांगलादेश हे आशियातील आघाडीचे सहा हॉकी देश सहभागी होणार आहेत. जपानमध्ये नुकतेच आशियाई क्रीडा स्पर्धेचे सुवर्णपदक यशस्वीपणे राखणारा आणि पाच वेळा चॅम्पियन्स ट्रॉफी जिंकलेला भारतीय संघ अव्वल मानांकित संघ म्हणून या स्पर्धेत उतरेल.

२७ ऑक्टोबर रोजी होणाऱ्या दिमाखदार उद्घाटन सोहळ्यानंतर लगेचच भारत आणि बांगलादेश यांच्यातील सामना खेळवला जाईल. सर्व सहा संघ एकेरी राऊंड-रॉबिन लीग फेरीत एकमेकांशी भिडणार असून प्रत्येक संघ पाच सामने खेळेल. गुणतक्त्यातील अव्वल चार संघ उपांत्य फेरीत प्रवेश करतील. बांगलादेशनंतर भारताचा सामना २९ ऑक्टोबर रोजी चीनविरुद्ध, ३० ऑक्टोबर रोजी जपानविरुद्ध, १ नोव्हेंबर रोजी मलेशियाविरुद्ध आणि २ नोव्हेंबर रोजी दक्षिण कोरियाविरुद्ध होणार आहे. भारताचे सर्व लीग सामने भारतीय वेळेनुसार संध्याकाळी सात वाजता सुरू होणार असून, २८ ऑक्टोबर, ३१ ऑक्टोबर आणि ३ नोव्हेंबर रोजी स्पर्धेत विश्रांतीचे दिवस असतील.

पंजाबमधील उत्साही घरच्या प्रेक्षकांसमोर खेळताना भारतीय संघ आपला हाच दबदबा कायम ठेवण्यासाठी मैदानात उतरणार असल्याचे हॉकी इंडियाचे अध्यक्ष दिलिप तिर्की यांनी सांगितले.

माघारीचे कारण काय?

* सुरुवातीला पाकिस्तान या स्पर्धेत सहभागी होणार होता. पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान यांनी गेल्या महिन्यात तशी पुष्टीही केली होती. ऐनवेळी माघार घेण्याची शक्यता लक्षात घेऊन ओमान आणि बांगलादेश यांना राखीव संघ म्हणून ठेवण्यात आले होते.

* मात्र, दोन दिवसांनंतर पाकिस्तान हॉकी फेडरेशनने आपल्या सहभागाबाबत चिंता व्यक्त केली आणि आशियाई हॉकी महासंघाला विनंती केली की, त्यांचे सामने तटस्थ ठिकाणी हलवण्यात यावेत. मात्र ती विनंती फेटाळण्यात आल्याने पाकिस्तानला माघार घ्यावी लागली.

* विशेष म्हणजे, सुरक्षेबाबत चिंता व्यक्त करत पाकिस्तानने गेल्या वर्षी तामिळनाडूमध्ये झालेल्या एफआयएच कनिष्ठ विश्वचषक आणि आशिया चषक स्पर्धेतूनही माघार घेतली होती. आता पाकिस्तानच्या माघारीमुळे बांगलादेशला आशिया स्पर्धेत स्थान लाभले आहे.

ओदिशाकडून प्रत्येक खेळाडूला ११ लाख

ओदिशाचे मुख्यमंत्री मोहन चरण मांझी यांनी २०२६च्या आशियाई क्रीडा स्पर्धेत सुवर्णपदक जिंकणाऱ्या पुरुष आणि महिला हॉकी संघातील प्रत्येक खेळाडूला ११ लाख रुपये आणि प्रत्येक सपोर्ट स्टाफ सदस्याला (प्रशिक्षकीय चमू) ५.५ लाख रुपयांचे रोख बक्षीस जाहीर केले. पुरुष विभागात भारताने मलेशियाचा ५-१ असा धुव्वा उडवला, तर महिलांनी चीनला १-० असे नमवले. या स्पर्धेच्या एकाच आवृत्तीत पुरुष आणि महिला अशा दोन्ही संघांनी अव्वल स्थान पटकावण्याची ही पहिलीच वेळ होती. या पारितोषिकाद्वारे ओदिशा शासनाने हॉकी त्यांच्यासाठी किती खास आहे, हे पुन्हा दाखवून दिले.

इतिहासात सर्वाधिक ५ वेळा भारताने आशियाई चॅम्पियन्स ट्रॉफीचे जेतेपद मिळवले आहे. भारताने २०११, २०१६, २०१८ (पाकिस्तानसोबत संयुक्त विजेते), २०२३ आणि २०२४ मध्ये जेतेपद पटकावले आहे.

(संबधित इंग्रजी बातमी वाचण्यासाठी येथे क्लिक करा.)

दिल्लीची नाकेबंदी, झुरळे आक्रमक; रेल्वे रद्द, मेट्रो, इंटरनेट सेवा बंद, ड्राय-डे जाहीर; परवानगी नाकारली तरी CJP आंदोलनावर ठाम

माशी मारण्यासाठी हातोड्याचा वापर नको; सर्व काही ठप्प करता येणार नाही, सुप्रीम कोर्टाचे केंद्राला निर्देश

विप निवडणुकीत बंडोबांचे आव्हान; नागपूरच्या उमेदवारीवरून भाजपमध्ये दुफळी, शिवसेना शिंदे गटाच्या मंगेश चिवटेंची माघार

Mumbai : रस्ते धुलाईला ब्रेक! पाणीटंचाईच्या पार्श्वभूमीवर आठ कोटींचा प्रस्ताव स्थायी समितीने फेटाळला

'एसटी'च्या भूखंडांवर व्यावसायिक इमले; प्रत्येक जागेसाठी स्वतंत्र निविदा बंधनकारक