ग्रँड चेस टूर अंतिम फेरी : प्रज्ञानंदची संधी हुकली; कीमरविरुद्धचा सामना बरोबरीत (Photo-X)
क्रीडा

ग्रँड चेस टूर अंतिम फेरी : प्रज्ञानंदची संधी हुकली; कीमरविरुद्धचा सामना बरोबरीत

ग्रँड चेस टूरच्या अंतिम फेरीतील पहिल्या क्लासिकल सामन्यात भारताचा ग्रँडमास्टर आर. प्रज्ञानंदने विजयाची नामी संधी गमावली.

Swapnil S

सेंट लुईस : ग्रँड चेस टूरच्या अंतिम फेरीतील पहिल्या क्लासिकल सामन्यात भारताचा ग्रँडमास्टर आर. प्रज्ञानंदने विजयाची नामी संधी गमावली. जर्मनीच्या व्हिन्सेंट कीमरविरुद्धच्या लढतीत प्रज्ञानंदने विजयाच्या अगदी जवळ पोहोचूनही मोठी चूक केली. यामुळे त्याला बरोबरीवर समाधान मानावे लागले. या बरोबरीमुळे दोन्ही खेळाडूंना ३-३ गुण मिळाले, तर प्रज्ञानंदच्या हातातील पूर्ण ६ गुण निसटले.

सामन्यादरम्यान प्रज्ञानंदने सुरुवातीपासूनच उत्कृष्ट खेळ करत डावावर पूर्ण नियंत्रण मिळवले होते. पांढऱ्या मोहऱ्यांसह खेळताना त्याने कीमरला सतत दबावात ठेवले. कीमरला त्याचा बचाव करणे कठीण जात होते आणि तो अत्यंत कठीण स्थितीत पोहोचला होता. मात्र, जर्मन खेळाडूने हार न मानता शेवटपर्यंत झुंज दिली. निर्णायक क्षणी प्रज्ञानंदने घाईघाईत एक मोठी चूक केली आणि विजय मिळवण्याची सोपी संधी गमावली. दुसऱ्या सामन्यात अमेरिकेच्या वेस्ली सो याने फॅबियानो कारुआनाविरुद्ध कोणताही धोका न पत्करता सामना बरोबरीत सोडवला. काही दिवसांपूर्वीच संपलेल्या सिंकफिल्ड चषक बुद्धिबळ स्पर्धेत प्रज्ञानंदला उपविजेतेपदावर समाधान मानावे लागले होते.

यंदाच्या ग्रँड चेस टूरची एकूण बक्षीस रक्कम ४ लाख ५० हजार अमेरिकन डॉलर आहे. गेल्या वर्षी ब्राझीलमधील साओ पावलो येथे झालेल्या स्पर्धेपेक्षा यामध्ये १ लाख डॉलरची वाढ करण्यात आली आहे. या स्पर्धेत आधी दोन क्लासिकल सामने खेळवले जातात, ज्यात प्रत्येक विजयासाठी ६ गुण आणि बरोबरीसाठी ३ गुण मिळतात. त्यानंतर रॅपिड विभागात विजयासाठी ४ गुण तर ब्लिट्झ फेरीत २ गुण दिले जातात. गुणतालिकेत एकूण २८ पैकी १५ गुण मिळवणारा खेळाडू अंतिम फेरीत प्रवेश करेल. विजेता खेळाडू २ लाख डॉलर, उपविजेता १ लाख २५ हजार डॉलर इतक्या रकमेचे पारितोषिक जिंकेल.

(संबधित इंग्रजी बातमी वाचण्यासाठी येथे क्लिक करा.)

मुंबईत 'कॅच द कल्प्रीट ऑन कॅमेरा' मोहीम सुरू; नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांचे फोटो पाठवण्याचे आवाहन

Mumbai : हुंडाबळी, आत्महत्या घटल्या; मात्र, छळाच्या घटनांमध्ये झाली वाढ

प्रवाशांचे सामान, दागिने चोरीचे प्रमाण वाढले; मुंबई विमानतळावरील पोलिसांचे तपासाचे आव्हान कायम

भाजपच्या सर्वच नगरसेवकांची कानउघाडणी; सभागृहातील गदारोळ, सत्ताधारी-विरोधक संघर्ष

राहुल गांधींची कॉपी करण्याचा फडणवीसांचा प्रयत्न फसला! सपकाळ यांची टीका