नवी दिल्ली : इंडियन प्रीमियर लीग म्हणजेच आयपीएलचा १९वा हंगाम सुरू होण्यासाठी आता अवघा तीन दिवसांचा अवधी शिल्लक आहे. त्यानिमित्ताने गतविजेत्या रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूने गतवर्षी चेंगराचेंगरीत मृत्यू पावलेल्या ११ जणांना अनोखी आदरांजली वाहण्याचा निर्णय घेतला आहे.
बंगळुरूचा संघ स्पर्धेच्या पहिल्या दिवशी सराव करताना ११ क्रमांकाची जर्सी परिधान करणार आहे. तसेच सामन्यात काळ्या रंगाची फीत दंडाभोवती बांधणार आहे. त्याशिवाय ११ मृतांच्या नातेवाईकांसाठी चिन्नास्वामी स्टेडियममध्ये काही तिकिटे राखीव ठेवण्यात येणार आहेत. बंगळुरूचे क्रिकेट संचालक मो बोबाट यांनी मंगळवारी याविषयी माहिती दिली. चेंगराचेंगरीत मृत झालेल्यांना आदरांजली वाहण्यासाठी हा उपक्रम असल्याचे बोबाट यांनी सांगितले.
गतवर्षी बंगळुरूने ३ जून रोजी आयपीएलचे जेतेपद मिळवले. त्यानंतर ४ जून रोजी चिन्नास्वामी स्टेडियमबाहेर झालेल्या विजय मिरवणुकीदरम्यान चेंगराचेंगरीमुळे ११ जणांचा मृत्यू झाला, तर अनेक चाहते गंभीर जखमे झाले. त्यानंतर काही महिन्यांसाठी चिन्नास्वामी स्टेडियम बंद होते. तसेच संघाच्या व्यवस्थापनावरही टीका करण्यात आली. मात्र आता चित्र सुधारले असून चिन्नास्वामी स्टेडियमवरच बंगळुरूचा संघ यंदा पहिला सामना खेळणार आहे. गतवर्षी त्यांनी पंजाब किंग्जला नमवून जेतेपद मिळवले होते.
काही आठवड्यांपूर्वी अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर टी-२० विश्वचषकाच्या महामुकाबल्यात भारताने न्यूझीलंडचा ९६ धावांनी फडशा पाडला. क्रांती घडवण्यासह इतिहासाची पुनरावृत्ती करून यंदा सूर्यकुमार यादवच्या नेतृत्वात भारताने एकंदर तिसऱ्यांदा, तर सलग दुसऱ्यांदा टी-२० विश्वचषक जिंकण्याचा पराक्रम केला. भारताच्या या विश्वविजयात अनेक हिऱ्यांचे मोलाचे योगदान लाभले. भारत हा सलग दोन टी-२० विश्वचषक जिंकणारा तसेच मायदेशात जेतेपद मिळवणारा पहिलाच संघ ठरला.
आता सर्वांना आयपीएलच्या १९व्या हंगामाचे वेध लागले आहेत. २८ मार्चपासून आयपीएलचा नवा हंगाम सुरू होईल. रजत पाटिदारच्या नेतृत्वात खेळणारा गतविजेता रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू संघ अपेक्षेप्रमाणे स्पर्धेचा सलामीचा सामना खेळणार आहे. बंगळुरूतील चिन्नास्वामी स्टेडियमवर होणाऱ्या या लढतीत बंगळुरूसमोर सनरायजर्स हैदराबादचे आव्हान असेल. तूर्तास १२ एप्रिलपर्यंतच्या २० सामन्यांचे वेळापत्रक जाहीर करण्यात आले असून पश्चिम बंगाल, तमिळनाडू व आसाम येथे निवडणुका होणार असल्याने पुढील वेळापत्रक नंतर जाहीर करण्यात येईल.
दरम्यान, यंदा मुंबई इंडियन्स आणि चेन्नई सुपर किंग्ज या पाच वेळच्या माजी विजेत्या संघांनी यावेळी अनोख्या शैलीत उत्सव साजरा केला. हंगामापूर्वी साधारण पत्रकार परिषद घेण्यापेक्षा यावेळी मुंबईने चाहत्यांसाठी बीकेसी येथे दोन दिवस ‘एम आय मिक्स’ या कार्यक्रमाचे आयोजन केले, तर चेन्नईने चेपॉक स्टेडियमवर माजी विजेत्या खेळाडूंना आमंत्रित करून आठवणींना उजाळा दिला. त्यामुळे या दोन्ही संघांच्या जल्लोषाची सध्या सगळीकडे चर्चा सुरू आहे. मुंबईच्या सोहळ्यात रोहित शर्मा, सूर्यकुमार यादव, कर्णधार हार्दिक पंड्या यांच्यासह सर्व खेळाडू उपस्थित होते. यावेळी चाहत्यांना मोफत गिफ्टही वाटण्यात आले. दुसरीकडे चेन्नईने सुरेश रैना, अंबाती रायुडू, मॅथ्यू हेडन, माईक हसी यांसारख्या चेन्नईच्या माजी खेळाडूंना आमंत्रित करून पाच चषकांसह छायाचित्र काढले.
आयपीएलनंतर भारताची पुढील वर्षी ऑक्टोबर-नोव्हेंबर या कालावधीत दक्षिण आफ्रिका येथे रंगणाऱ्या एकदिवसीय विश्वचषकाच्या दृष्टीने तयारी सुरू होईल. शुभमन गिल भारताच्या एकदिवसीय संघाचा कर्णधार असून अन्य १९ खेळाडू कोण असतील, याची चाहत्यांनाही पुसटशी कल्पना आहे. मात्र निवड समिती या खेळाडूंच्या कामगिरीवर आयपीएलमध्ये लक्ष ठेवून असेल. निवड समितीचे अध्यक्ष मुंबईकर अजित आगरकर भूषवत आहेत. त्यांच्या अध्यक्षतेखालील समितीत शिवसुंदर दास, प्रग्यान ओझा, रुद्रप्रताप सिंग व अजय रत्रा हे अन्य चार विभागातील सदस्य होते. आगरकर हे पश्चिम विभागाचे प्रतिनिधित्व करतात.
रोहित शर्मा व विराट कोहली हे दोन्ही तारांकित खेळाडू एकदिवसीय विश्वचषकात खेळण्यास आतुर आहेत. मात्र वाढते वय व स्पर्धा यामुळे दोघांनाही युवा खेळाडूंकडून कडवी टक्कर मिळत आहे. रोहित-विराट यांनी गेल्या २-३ एकदिवसीय मालिकांमध्ये सातत्याने छाप पाडली आहे. तसेच के. एल. राहुल, जसप्रीत बुमरा यांच्यावर लक्ष असेल. बुमरा २०२३च्या विश्वचषकानंतर आजवर एकही एकदिवसीय लढत खेळलेला नाही. हार्दिक पंड्याचेही एकदिवसीय संघात पुनरागमन अपेक्षित आहे.
एकदिवसीय संघात सध्या स्थान नसलेले खेळाडू म्हणजेच संजू सॅमसन, तिलक वर्मा, सूर्यकुमार यादव, मोहम्मद सिराज यांच्यासाठी ही आयपीएल महत्त्वाची ठरेल. मोहम्मद शमी, युझवेंद्र चहलही निवड समितीचे लक्ष वेधण्यासाठी आतुर असतील. यशस्वी जैस्वाल, अभिषेक शर्मा, ऋषभ पंत यांनाही एकदिवसीय संघात स्थान मिळवण्यासाठी आयपीएलमध्ये जोरदार कामगिरी करावी लागेल.
दरम्यान, आयपीएलचा विचार करता यावेळी मुंबई आणि चेन्नई जेतेपद मिळवण्यासाठी आतुर असतील. दोन्ही संघांना गेल्या काही हंगामांत लौकिकाला साजेशी कामगिरी करता आलेली नाही. त्यामुळे यावेळी जेतेपदाचा षटकार कोण लगावणार, हे पाहणे रंजक ठरणार आहे. २८ मार्चची सर्वांना उत्सुकता आहे.
दयाल संपूर्ण हंगामाला मुकणार
बंगळुरूचा वेगवान गोलंदाज यश दयाल वैयक्तिक कारणास्तव यंदाच्या संपूर्ण आयपीएलला मुकणार आहे. यासंबंधी बंगळुरूचे क्रिकेट संचालक मो बोबाट यांनी माहिती दिली. यशच्या वैयक्तिक आयुष्यात ओढवलेल्या प्रसंगामुळे यंदा तो आयपीएलसाठी उपलब्ध नसेल. मात्र तो संघाचा भाग कायम राहील, असे मोबाट म्हणाले. जून २०२५मध्ये झालेल्या आयपीएलच्या अंतिम फेरीतच यश शेवटचा खेळला आहे. त्यानंतर हा २८ वर्षीय खेळाडू एकही स्पर्धा खेळलेला नाही. त्याशिवाय जोश हेझलूवड ऑस्ट्रेलियातून भारतात कधी दाखल होणार, याबाबत अद्याप पूर्ण माहिती नसल्याचे मोबाट यांनी सांगितले.
डकेटची अचानक आयपीएलमधून माघार
दिल्ली कॅपिटल्स संघाचा डावखुरा सलामीवीर बेन डकेटने स्पर्धा सुरू होण्यासाठी तीन दिवस असताना माघार घेतली आहे. इंग्लंडकडून खेळणाऱ्या ३१ वर्षीय डकेटला दिल्लीने लिलावात २ कोटी रुपयांत खरेदी केले होते. मात्र हरवलेला सूर व दिल्ली संघातील फलंदाजांचे पर्याय पाहता डकेटने माघार घेण्याचे ठरवले. तो आता कौंटी स्पर्धेत खेळणार आहे. याप्रकरणी आयपीएलमधून त्याच्यावर २ वर्षे निलबंनाची कारवाई केली जाईल. कोणत्याही विदेशी खेळाडूने लिलावात नाव नोंदवल्यावर स्पर्धेपूर्वी दुखापत वगळता अन्य कोणत्या कारणास्तव माघार घेतली, तर त्याला २ वर्षे निलंबित करण्यात येते.
इंडियन प्रीमियर लीग म्हणजेच आयपीएलचा १९वा हंगाम आता अवघ्या तीन दिवसांवर येऊन ठेपला आहे. चौकार-षटकारांची आतषबाजी, अफलातून झेल आणि सामन्याला कलाटणी देणाऱ्या भन्नाट स्पेलद्वारे सर्व खेळाडू चाहत्यांचे पुढील दोन महिने मनोरंजन करण्यासाठी सज्ज झाले आहेत. २८ मार्चपासून सुरू होणाऱ्या या रणधुमाळीत यंदाही १० संघ सहभागी होणार आहेत. त्यानिमित्ताने आजच्या सदरात ‘नवशक्ति’च्या वाचकांसाठी गतविजेता रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू आणि उपविजेता पंजाब किंग्ज या संघांचा घेतलेला हा धावता आढावा.
सलग दुसऱ्या जेतेपदाचे उद्दिष्ट!
रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू
कर्णधार : रजत पाटीदार
सर्वोत्तम कामगिरी: विजेतेपद (२०२५)
विराट कोहलीसह तमाम रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूच्या चाहत्यांची गतवर्षी स्वप्नपूर्ती झाली. १८व्या हंगामात प्रथमच बंगळुरूने आयपीएलचे पहिले जेतेपद काबिज केले. आता पुन्हा एकदा रजत पाटीदारच्या नेतृत्वात छाप पाडण्यासाठी हा संघ सज्ज आहे. विराटसह फिल सॉल्ट, जितेश शर्मा, टिम डेव्हिड असे दमदार फलंदाज त्यांच्या ताफ्यात आहेत. मात्र जोश हेझलवूड दुखापतीमुळे काही लढतींना मुकणार असल्याने बंगळुरूची गोलंदाजी चिंतेत आहे. यश दयालही वैयक्तिक कारणास्तव यंदा संपूर्ण हंगामाला मुकणार आहे. अशा स्थितीत भुवनेश्वर कुमार, जेकब डफी, नुवान थुशारावर भिस्त असेल. कृणाल पंड्या व सुयश शर्मा हे फिरकीपटू निर्णायक ठरतील. चिन्नास्वामी स्टेडियमवर २८ तारखेला हैदराबादविरुद्ध बंगळुरूचा संघ पहिला सामना खेळणार आहे.
संघ : रजत पाटीदार (कर्णधार), जॉर्डन कॉक्स, विराट कोहली, टिम डेव्हिड, देवदत्त पडिक्कल, फिल सॉल्ट, जितेश शर्मा, जेकब बेथल, कनिष्क चौहान, वेंकटेश अय्यर, विहान मल्होत्रा, मंगेश यादव, कृणाल पंड्या, रोमारिओ शेफर्ड, अभिनंदन सिंग, सात्विक देस्वाल, जेकब डफी, जोश हेझलवूड, भुवनेश्वर कुमार, विकी ओस्तवाल, रसिक सलाम, सुयश शर्मा, स्वप्निल सिंग, नुवान थुशारा.
जेतेपदाचा दुष्काळ यंदा संपुष्टात?
पंजाब किंग्ज
कर्णधार : श्रेयस अय्यर
सर्वोत्तम कामगिरी : उपविजेतेपद (२०१४, २०२५)
मुंबईकर श्रेयस अय्यरच्या नेतृत्वात पंजाब किंग्जने गतवर्षी तब्बल ११ वर्षांनी अंतिम फेरीत धडक मारण्याचा पराक्रम केला. मात्र त्यांना जेतेपदाने हुलकावणी दिली. यावेळी हा संघ जेतेपदाचा दुष्काळ संपुष्टात आणण्याच्या निर्धाराने मैदानात उतरेल. पंजाबच्या संघाची ताकद फलंदाजी असून या संघात आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण न केलेल्या खेळाडूंची संख्या अधिक आहे. प्रियांश आर्य, प्रभसिमरन सिंग, शशांक सिंग, नेहल वधेरा व मुशीर खान या खेळाडूंमुळे पंजाबकडे उत्तम फलंदाज आहेत. शिवाय श्रेयस व स्टोइनिसचा अनुभव आहेच. गोलंदाजीत लॉकी फर्ग्युसन वैयक्तिक कारणास्तव काही लढतींना मुकणार आहे. त्यामुळे अर्शदीप सिंग, फिरकीपटू युझवेंद्र चहल व विजय वैशाख यांच्यावर गोलंदाजीत मदार असेल.
संघ : श्रेयस अय्यर (कर्णधार), अर्शदीप सिंग, अझमतुल्ला ओमरझाई, बेन ड्वारशुइस, कूपर कोनोली, हर्नूर पन्नू, हरप्रीत ब्रार, लॉकी फर्ग्युसन, मार्को यान्सेन, मार्कस स्टोइनिस, मिचेल ओवन, मुशीर खान, नेहल वधेरा, प्रभसिमरन सिंग, प्रवीण दुबे, प्रियांश आर्य, प्याला अविनाश, शशांक सिंग, सूर्यांश शेडगे, विजयकुमार वैशाख, विशाल निशाद, विष्णू विनोद, झेव्हियर बार्टलेट, यश ठाकूर, युझवेंद्र चहल.