बंगळुरू : इंडियन प्रीमियर लीगचा (आयपीएल) १९वा हंगाम सध्या रंगतदार टप्प्यावर आहे. प्रत्येक सामन्यानंतर गुणतालिकेचे चित्र पालटत असून शनिवारी चाहत्यांना पुन्हा एकदा मनोरंजनाची दुहेरी मेजवानी अनुभवायला मिळणार आहे. शनिवारी दुपारी होणाऱ्या लढतीत लयीत असलेल्या रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूविरुद्ध दिल्ली कॅपिटल्सच्या फिरकीपटूंचा प्रामुख्याने कस लागणार आहे. चिन्नास्वामी स्टेडियमवरील या सामन्यात फलंदाजांना रोखणे कठीण असेल.
मार्च महिन्याच्या सुरुवातीला अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर टी-२० विश्वचषकाच्या महामुकाबल्यात भारताने न्यूझीलंडचा ९६ धावांनी फडशा पाडला. सूर्यकुमार यादवच्या नेतृत्वात भारताने एकंदर तिसऱ्यांदा, तर सलग दुसऱ्यांदा टी-२० विश्वचषक जिंकण्याचा पराक्रम केला. भारताच्या या विश्वविजयात अनेक हिऱ्यांचे मोलाचे योगदान लाभले. भारत हा सलग दोन टी-२० विश्वचषक जिंकणारा तसेच मायदेशात जेतेपद मिळवणारा पहिलाच संघ ठरला. त्यानंतर काही दिवसांच्या विश्रांतीनंतर भारताचे सर्व तारे पुन्हा आयपीएलच्या निमित्ताने मैदानात दिसत आहेत.
२८ मार्चपासून आयपीएलच्या १९व्या पर्वाला प्रारंभ झाला. काही लढतींमध्ये धावांचा वर्षाव पाहायला मिळाला, तर काही सामन्यांत गोलंदाजांनी फलंदाजांना रोखले. तसेच बहुतांश लढतींमध्ये नाणेफेक जिंकून धावांचा पाठलाग करणारा संघ जिंकला. यंदादेखील प्रत्येक संघाला १४ सामने खेळायचे आहेत. त्यांपैकी ७ लढती या घरच्या मैदानात, तर उर्वरित ७ लढती प्रतिस्पर्धी संघाच्या मैदानात होतील. त्यामुळे स्पर्धेचा ज्वर हळूहळू वाढत आहे.
दरम्यान, रजत पाटीदारच्या नेतृत्वात खेळणाऱ्या बंगळुरूने पाचपैकी ४ लढती जिंकल्या आहेत. हैदराबाद, चेन्नई, मुंबई, लखनऊ या संघांना बंगळुरूने धूळ चारली, तर फक्त राजस्थानकडून त्यांना एकमेव पराभव पत्करावा लागला. मुख्य म्हणजे बंगळुरूने यंदा घरच्या मैदानात म्हणजेच चिन्नास्वामी येथे तीनही लढती जिंकल्या आहेत. त्यामुळे ते शनिवारी घरच्या प्रेक्षकांसमोर चौथा विजय साकारण्यासाठी उत्सुक असतील.
ऑरेंज कॅपच्या शर्यतीत आघाडीवर असलेला विराट कोहली (२२८ धावा), पाटीदार, टिम डेव्हिड, फिल सॉल्ट असे एकापेक्षा एक धडाकेबाज फलंदाज बंगळुरूकडे आहेत. जोश हेझलवूड व भुवनेश्वर कुमारची वेगवान जोडी व कृणाल पंड्या, सूयश शर्मा यांची फिरकी जोडी बंगळुरूची ताकद आहे. रसिक दरनेही गेल्या २ सामन्यांत छाप पाडली आहे. त्यामुळे कागदावर बंगळुरूचा संघ वरचढ दिसत आहे.
दुसरीकडे अक्षर पटेलच्या नेतृत्वात खेळणाऱ्या दिल्लीने पहिले दोन सामने जिंकून धडाक्यात सुरुवात केली होती. मात्र त्यानंतर दिल्लीला सलग दोन पराभव पत्करावे लागले आहेत. त्यामुळे आता विजयपथावर परतण्यासाठी दिल्लीचा संघ उत्सुक असेल. कुलदीप यादव, अक्षर व विपराज असे फिरकी त्रिकुट दिल्लीकडे आहे. लुंगी एन्गिडी व नटराजन लयीत आहे. फलंदाजीत राहुल, पथुम निसांका व ट्रिस्टन स्टब्स यांच्यावर दिल्लीची मदार आहे.
उभय संघांत आतापर्यंत ३३ सामने झाले आहेत. त्यांपैकी बंगळुरूने २०, तर दिल्लीने १२ लढती जिंकल्या आहेत. एक सामना रद्द करण्यात आला होता. त्यामुळे आकडेवारी बंगळुरूच्या बाजूने असून दिल्लीला त्यांना रोखावे लागेल.
खेळपट्टीचा अंदाज
चिन्नास्वामी येथे फलंदाजांना नेहमीच सहाय्य लाभले आहे. मैदानही आकाराने लहान असल्यामुळे येथे चौकार-षटकारांची आतषबाजी अपेक्षित आहे. मात्र शनिवारी वापरण्यात येणारी खेळपट्टी काहीशी संथ स्वरूपाची असू शकते. त्यामुळे गोलंदाजांनाही मदत मिळेल.
प्रतिस्पर्धी संघ
रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू : रजत पाटीदार (कर्णधार), जॉर्डन कॉक्स, विराट कोहली, टिम डेव्हिड, देवदत्त पडिक्कल, फिल सॉल्ट, जितेश शर्मा, जेकब बेथल, कनिष्क चौहान, वेंकटेश अय्यर, विहान मल्होत्रा, मंगेश यादव, कृणाल पंड्या, रोमारिओ शेफर्ड, अभिनंदन सिंग, सात्विक देस्वाल, जेकब डफी, जोश हेझलवूड, भुवनेश्वर कुमार, विकी ओस्तवाल, रसिक सलाम, सुयश शर्मा, स्वप्निल सिंग, नुवान थुशारा.
दिल्ली कॅपिटल्स : अक्षर पटेल (कर्णधार), अभिषेक पोरेल, अजय मंडल, आशुतोष शर्मा, आकिब नबी, डेव्हिड मिलर, दुश्मंता चमीरा, करुण नायर, के. एल. राहुल, कुलदीप यादव, कायले जेमिसन, लुंगी एन्गिडी, माधव तिवारी, मिचेल स्टार्क, मुकेश कुमार, नितीश राणा, पथुम निसांका, पृथ्वी शॉ, साहिल पारेख, समीर रिझवी, टी. नटराजन, त्रिपुराना विजय, ट्रिस्टन स्टब्स, विपराज निगम.