मुल्लनपूर : विराट कोहली आणि देवदत्त पडिक्कल यांनी शानदार फटकेबाजी करत पंजाब किंग्जविरुद्ध रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूच्या विजयात चमकदार कामगिरी केली. रविवारी झालेल्या या सामन्यातील विजयामुळे अवघ्या ४८ तासांत बंगळुरूने पंजाबविरुद्ध गत पराभवाचा बदला घेतला.
पंजाबने दिलेले १५८ धावांचे लक्ष्य बंगळुरूने १८.५ षटकांत ३ फलंदाज गमावून पार केले. या विजयामुळे बंगळुरूने गुणतालिकेत तिसऱ्या स्थानी झेप घेतली.
पडिक्कलने ३५ चेंडूंत ६१ धावांची वादळी खेळी खेळली. त्याने अवघ्या २२ चेंडूंत आयपीएलमधील आपले पहिले अर्धशतक झळकावले. विराट कोहली आणि पडिक्कल या जोडीने बंगळुरूला सोपा विजय मिळवून दिला. कोहलीने ५४ चेंडूंत ७३ धावांची नाबाद खेळी खेळली. या जोडीने ११.३ षटकांत १०३ धावांची महत्त्वपूर्ण भागीदारी केली.
अर्शदीप सिंगला कोहलीने मारलेल्या पुल शॉटने लक्ष वेधून घेतले. त्याला पडिक्कलने छान साथ दिली. फिरकी गोलंदाजांविरुद्ध त्याने बॅकफुटला खेळणे पसंत केले. या जोडीने अप्रतिम समन्वय साधत धावा जमवल्या.
तत्पूर्वी बंगळुरूचे फिरकीपटू कृणाल पंड्या आणि सुयश शर्मा यांनी अचूक टप्प्यावर गोलंदाजी करत पंजाबला निर्धारित २० षटकांत १५७ धावांवर रोखले. बंगळुरुने नाणेफेकीचा कौल जिंकत प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. स्लो असलेल्या या खेळपट्टीवर डावखुरा फिरकीपटू कृणालने ४ षटकांत २५ धावा देऊन २ फलंदाजांना माघारी धाडले. तर फिरकीपटू सुयशने ४ षटकांत २६ धावा देत २ फलंदाजांना बाद केले. प्रभसिमरन सिंगने १७ चेंडूंत संघातर्फे सर्वाधिक ३३ धावा जमवल्या.
विराट कोहलीने या सामन्यात नाबाद ७३ धावांची खेळी खेळत संघाच्या विजयात मोलाचा वाटा उचलला. आयपीएलमधील कोहलीचे हे ५९ वे अर्धशतक ठरले. कोहलीने पहिल्या २० चेंडूंत ४ चौकार लगावले. त्यानंतर पुढच्या २४ चेंडूवर त्याने एकही मोठा फटका मारला नाही. एकेरी-दुहेरी धावा काढत त्याने धावफलक पुढे नेले. आक्रमक झालेल्या पडिक्कलला त्याने स्ट्राईक दिली.
आरसीबीने अखेरच्या ४ षटकांत ८ यॉर्कर चेंडू टाकले. पंजाबचे यान्सेन आणि शशांक यांनी या चेंडूंवर धावा जमवल्या मात्र शेवटच्या ४ षटकांत त्यांना केवळ २८ धावाच जमवता आल्या.