लखनऊ : भारताचा डावखुरा फलंदाज ऋषभ पंतसाठी इंडियन प्रीमियर लीगचा (आयपीएल) गेला हंगाम निराशाजनक ठरला. लखनऊ सुपर जायंट्सचे नेतृत्व करणाऱ्या पंतला अखेरच्या लढतीत झळकावलेल्या शतकाव्यतिरिक्त फारशी छाप पाडता आली नाही. त्यामुळेच यंदा पंत आगामी आयपीएलमध्ये सातत्याने तिसऱ्या क्रमांकावर फलंदाजी करण्याची शक्यता असून याद्वारे भारताच्या एकदिवसीय व टी-२० संघात पुनरागमन करण्याचे त्याचे लक्ष्य असेल.
काही आठवड्यांपूर्वी अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर टी-२० विश्वचषकाच्या महामुकाबल्यात भारताने न्यूझीलंडचा ९६ धावांनी फडशा पाडला. क्रांती घडवण्यासह इतिहासाची पुनरावृत्ती करून यंदा सूर्यकुमार यादवच्या नेतृत्वात भारताने एकंदर तिसऱ्यांदा, तर सलग दुसऱ्यांदा टी-२० विश्वचषक जिंकण्याचा पराक्रम केला. भारताच्या या विश्वविजयात अनेक हिऱ्यांचे मोलाचे योगदान लाभले. भारत हा सलग दोन टी-२० विश्वचषक जिंकणारा तसेच मायदेशात जेतेपद मिळवणारा पहिलाच संघ ठरला.
आता सर्वांना आयपीएलच्या १९व्या हंगामाचे वेध लागले आहेत. २८ मार्चपासून आयपीएलचा नवा हंगाम सुरू होईल. रजत पाटिदारच्या नेतृत्वात खेळणारा गतविजेता रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू संघ अपेक्षेप्रमाणे स्पर्धेचा सलामीचा सामना खेळणार आहे. बंगळुरूतील चिन्नास्वामी स्टेडियमवर होणाऱ्या या लढतीत बंगळुरूसमोर सनरायजर्स हैदराबादचे आव्हान असेल. तूर्तास १२ एप्रिलपर्यंतच्या २० सामन्यांचे वेळापत्रक जाहीर करण्यात आले असून पश्चिम बंगाल, तमिळनाडू व आसाम येथे निवडणुका होणार असल्याने पुढील वेळापत्रक नंतर जाहीर करण्यात येईल.
दरम्यान, २८ वर्षीय पंत गेल्या आयपीएल लिलावात आजवरचा सर्वाधिक महागडा खेळाडू ठरला होता. त्याच्यावर लखनऊचे संघमालक संजीव गोएंका यांनी २७ कोटींची बोली लावली होती. मात्र पंतला त्या हंगामात लौकिकाला साजेशी कामगिरी करता आली नाही. परिणामी लखनऊचा संघही साखळी फेरीतच गारद झाला. पंतने संपूर्ण हंगामात फक्त २६९ धावा केल्या. त्यापैकी ११८ धावांची खेळी त्याने शेवटच्या लढतीत साकारली. मधल्या फळीत पंत चौथ्या ते सहाव्यापैकी कोणत्याही स्थानी फलंदाजी करत होता.
मिचेल मार्श, एडीन मार्करम व निकोलस पूरन हे धडाकेबाज फलंदाजांचे विदेशी त्रिकूट लखनऊकडून पहिल्या तीन क्रमांकात फलंदाजी करायचे. मात्र लखनऊचे प्रशिक्षक जस्टिन लँगर यांनी स्वत: यंदा पंत तिसऱ्या क्रमांकावर फलंदाजी करताना पाहायला मिळू शकतो, असे सांगितले. त्यामुळे पूरन चौथ्या स्थानी फलंदाजीस येईल. आयुष बदोनी व अब्दुल समद असे फलंदाजही लखनऊकडे आहेत. “संघ व्यवस्थापनाला असे वाटत आहे की पंत तिसऱ्या क्रमांकासाठी उत्तम आहे. मार्करम व मार्श यांची सलामी जोडी यंदाही कायम असेल. मात्र तिसऱ्या क्रमांकाविषयी आम्ही नक्कीच विचार करत आहोत,” असे लँगर यांनी सांगितले.
पंत हा २०२४च्या टी-२० विश्वचषकात भारतीय संघाचा सदस्य होता. मात्र यंदा २०२६मध्ये जिंकलेल्या टी-२० विश्वचषकासाठी त्याचा विचार करण्यात आला नाही. तसेच एकदिवसीय संघात के. एल. राहुल भारताच्या प्रथम पसंतीचा यष्टिरक्षक असल्याने पंतला फारशी संधी मिळत नाही. त्यातच संजू सॅमसन, इशान किशनही शर्यतीत असताना पंतसाठी आगामी आयपीएल निर्णायक ठरेल, यात शंका नाही. १ एप्रिल रोजी दिल्लीविरुद्ध लखनऊचा संघ पहिला सामना खेळणार आहे.