रोहित उत्तम लयीत, मग उगाच चर्चा कशाला? वरिष्ठ खेळाडूच्या निवृत्तीविषयी BCCI चे सचिव देवाजित सैकिया यांचे स्पष्ट मत (Photo-X)
क्रीडा

रोहित उत्तम लयीत, मग उगाच चर्चा कशाला? वरिष्ठ खेळाडूच्या निवृत्तीविषयी BCCI चे सचिव देवाजित सैकिया यांचे स्पष्ट मत

भारतीय संघाचा माजी कर्णधार रोहित शर्माच्या भवितव्याबाबत चाललेल्या तर्कवितर्कांना खतपाणी घालण्यास भारतीय क्रिकेट नियामक मंडळाचे (बीसीसीआय) सचिव देवाजित सैकिया यांनी गुरुवारी स्पष्ट नकार दिला.

Swapnil S

मुंबई : भारतीय संघाचा माजी कर्णधार रोहित शर्माच्या भवितव्याबाबत चाललेल्या तर्कवितर्कांना खतपाणी घालण्यास भारतीय क्रिकेट नियामक मंडळाचे (बीसीसीआय) सचिव देवाजित सैकिया यांनी गुरुवारी स्पष्ट नकार दिला. रोहित सध्या सर्व सामन्यांमध्ये उत्कृष्ट कामगिरी करत असून त्याच्याबाबतच्या चर्चा अनाठायी असल्याचे त्यांनी सांगितले.

न्यूझीलंडचा आगामी महत्त्वाचा दौरा आणि पुढील वर्षी होणाऱ्या एकदिवसीय विश्वचषकाची रणनीती आखण्यासाठी गुरुवारी मुंबई येथील बीसीसीआयच्या मुख्यालयात बीसीसीआय आणि निवड समितीची बैठक पार पडली. या महत्त्वपूर्ण आढावा बैठकीला भारताचा कसोटी व एकदिवसीय कर्णधार शुभमन गिल, टी-२० कर्णधार श्रेयस अय्यर, मुख्य प्रशिक्षक गौतम गंभीर आणि सेंटर ऑफ एक्सलन्सचे (सीओई) क्रिकेट संचालक व्ही. व्ही. एस. लक्ष्मण उपस्थित होते. मात्र, निवड समिती अध्यक्ष अजित आगरकर या बैठकीला उपस्थित राहू शकले नाहीत. अत्यंत अल्प कालावधीच्या सूचनेवर ही बैठक बोलावण्यात आल्यामुळे आणि आगरकर शहराबाहेर असल्याने ते उपस्थित राहू शकले नाहीत, असे सैकिया यांनी स्पष्ट केले. तांत्रिक अडचणींमुळे ते ऑनलाइनही बैठकीसाठी हजेरी नोंदवू शकले नाहीत.

दरम्यान, आढावा बैठकीनंतर पत्रकारांशी बोलताना सैकिया यांनी रोहितचे समर्थन केले. “रोहित सध्या केवळ एकदिवसीय क्रिकेट खेळत आहे. इंग्लंडविरुद्धच्या शेवटच्या सामन्यात त्याने १३८ धावांची शानदार खेळी केली होती, मग त्याच्या भवितव्याबाबत चर्चा कशासाठी,” असा सवाल सैकिया यांनी उपस्थित केला. त्यामुळे अशा अफवांना कोणतेही खतपाणी घालण्याची मंडळाची इच्छा नसल्याचे त्यांनी नमूद केले.

बैठकीमध्ये आगरकर यांच्या अध्यक्षपदाच्या कराराच्या वाढीबाबत कोणतीही चर्चा झाली नसल्याचे सैकिया यांनी सांगितले. तसेच लक्ष्मण यांच्या बीसीसीआयमधील नव्या भूमिकेबाबत पसरणाऱ्या अफवांचाही त्यांनी समाचार घेतला. अशा नव्या अफवांवर प्रतिक्रिया देण्याची मंडळाची कोणतीही इच्छा नसून, असा कोणताही विचार किंवा चर्चा झालेली नाही, असेही त्यांनी स्पष्ट केले.

एकूणच या बैठकीद्वारे बीसीसीआयने सर्व मुद्द्यांवर चर्चा केली असून कोणताही धक्कादायक निर्णय घेण्याचे टाळले, असेच दिसून येते.

तीन जणांच्या जपानी व्हिसासाठी अर्ज

आशियाई क्रीडा स्पर्धेसाठी भारतीय संघाचे मुख्य प्रशिक्षक व्ही. व्ही. एस. लक्ष्मण यांच्या विशेष विनंतीवरून मयांक यादव, कार्तिक त्यागी आणि मोहसीन खान या वेगवान गोलंदाजांना भारतीय संघाच्या सराव सत्रासाठी नेट बॉलर्स म्हणून जपानला पाठवण्याची तयारी केली आहे. यासाठी बीसीसीआयने त्यांच्या जपानी व्हिसासाठी अर्ज केला आहे. हे तिघेही २० सप्टेंबर रोजी भारतीय संघ दिल्लीतून रवाना होण्यापूर्वी व्हिसा मिळाल्यास २६ सप्टेंबरच्या पहिल्या सामन्यापर्यंत संघासोबत राहतील. श्रेयस अय्यर या स्पर्धेत भारतीय संघाचे नेतृत्व करणार आहे.

(संबधित इंग्रजी बातमी वाचण्यासाठी येथे क्लिक करा.)

राज्याच्या 'विधि व न्याय' विभागाच्या सचिवांना HC चा दणका; बजावली अवमान नोटीस, माफीनामाही फेटाळला

नवी मुंबई विमानतळावरून ३० लाख प्रवाशांचा प्रवास; ४६ शहरांशी हवाई जोडणीचा विस्तार

...तरच व्यापार करार! भारताला सवलतीचे दर द्या; केंद्रीय मंत्री पियूष गोयल यांचा अमेरिकेला इशारा

Palghar : रेशनकार्ड काढून देण्यासाठी लाचेची मागणी; तहसील कर्मचाऱ्याला ACB ने रंगेहाथ पकडले

Mumbai : बीकेसी-कुर्ला मार्गावर डबलडेकर बस चालवणे अशक्य; उंचीमुळे १५० नवीन ईव्ही डबलडेकर बस पुन्हा रखडल्या