हैदराबाद : इंडियन प्रीमियर लीगमध्ये (आयपीएल) सोमवारी होणाऱ्या लढतीत अग्रस्थानी विराजमान असलेला राजस्थान रॉयल्स संघ विजयी पंच लगावण्यासाठी उत्सुक असेल. हैदराबादमधील राजीव गांधी स्टेडियमवर होणाऱ्या या सामन्यात त्यांची संघर्ष करत असलेल्या सनरायजर्स हैदराबादशी गाठ पडणार आहे. हैदराबाद राजस्थानचा विजयीरथ रोखू शकणार का, हे पाहणे रंजक ठरेल.
मार्च महिन्याच्या सुरुवातीला अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर टी-२० विश्वचषकाच्या महामुकाबल्यात भारताने न्यूझीलंडचा ९६ धावांनी फडशा पाडला. सूर्यकुमार यादवच्या नेतृत्वात भारताने एकंदर तिसऱ्यांदा, तर सलग दुसऱ्यांदा टी-२० विश्वचषक जिंकण्याचा पराक्रम केला. भारताच्या या विश्वविजयात अनेक हिऱ्यांचे मोलाचे योगदान लाभले. भारत हा सलग दोन टी-२० विश्वचषक जिंकणारा तसेच मायदेशात जेतेपद मिळवणारा पहिलाच संघ ठरला. त्यानंतर काही दिवसांच्या विश्रांतीनंतर भारताचे सर्व तारे पुन्हा आयपीएलच्या निमित्ताने मैदानात दिसत आहेत.
२८ मार्चपासून आयपीएलच्या १९व्या पर्वाला प्रारंभ झाला. काही लढतींमध्ये धावांचा वर्षाव पाहायला मिळाला, तर काही सामन्यांत गोलंदाजांनी फलंदाजांना रोखले. तसेच बहुतांश लढतींमध्ये नाणेफेक जिंकून धावांचा पाठलाग करणारा संघ जिंकला. यंदादेखील प्रत्येक संघाला १४ सामने खेळायचे आहेत. त्यांपैकी ७ लढती या घरच्या मैदानात, तर उर्वरित ७ लढती प्रतिस्पर्धी संघाच्या मैदानात होतील. त्यामुळे स्पर्धेचा ज्वर हळूहळू वाढत आहे.
दरम्यान, रियान परागच्या नेतृत्वात खेळणारा राजस्थान संघ यंदा भन्नाट लयीत आहे. चारपैकी चारही लढती जिंकून राजस्थान गुणतालिकेत अग्रस्थानी आहे. चेन्नई, गुजरात, मुंबई, बंगळुरू या संघांना राजस्थानने नमवले आहे. यामध्ये सर्वाधिक योगदान हे १५ वर्षीय डावखुरा फलंदाज वैभव सूर्यवंशी व त्याचा साथीदार यशस्वी जैस्वाल यांचे आहे. वैभवने ४ सामन्यांत २००, तर यशस्वीने १८३ धावा केल्या आहेत. तसेच ध्रुव जुरेलही लयीत आहे. पराग व शिम्रॉन हेटमायर यांना मात्र कामगिरी उंचवावी लागणार आहे. गोलंदाजीत नांद्रे बर्गर व जोफ्रा आर्चर यांची विदेशी जोडी आग ओकत आहे. तसेच संदीप शर्मा, तुषार देशपांडेही छाप पाडत असून पर्पल कॅपच्या शर्यतीत राजस्थानचाच रवी बिश्नोई अग्रस्थानी आहे. त्यामुळे त्यांचे पारडे या लढतीसाठी जड आहे.
दुसरीकडे इशान किशनच्या नेतृत्वात खेळणाऱ्या हैदराबादला अद्याप सातत्य दाखवता आलेले नाही. चारपैकी १ लढत त्यांनी जिंकली आहे. नुकताच पंजाबविरुद्ध २१९ धावा करूनही त्यांचा पराभव झाला. अभिषेक शर्मा व ट्रेव्हिस हेड यांची जोडी लयीत आहे. मात्र मधल्या फळीत किशन, हेनरिच क्लासेन यांना सातत्य दाखवण्याची गरज आहे.
पॉवरप्लेनंतर हैदराबादची धावगती मंदावत आहे. गोलंदाजीत पॅट कमिन्सची अनुपस्थितीत हैदराबादला प्रकर्षाने जाणवत आहे. हर्षल पटेल, इशान मलिंगा व जयदेव उनाडकट यांना तितका प्रभाव पाडता आलेला नाही. त्यामुळे सोमवारी घरच्या मैदानात ते कसा खेळ करणार, याकडे लक्ष असेल. फिरकीपटू हर्ष दुबे व शिवांग कुमार यांची जोडी मात्र कमाल करत आहे. या लढतीवर पावसाचे सावट नसून दोन्ही संघांतील फलंदाजांकडून आतषबाजी अपेक्षित आहे. मात्र ज्या संघाचे गोलंदाज चांगली कामगिरी करतील, तोच लढतीत विजेता होईल.
खेळपट्टीचा अंदाज
या लढतीवर पावसाचे सावट नसेल. तसेच हैदराबादमध्ये साधारणपणे फलंदाजांना पोषक खेळपट्टी असते, त्यामुळे चौकार-षटकारांची उधळण अपेक्षित आहे. यंदाच्या हंगामात येथे सध्या एकच लढत झाली असून त्यावेळी हैदराबादचा संघ १५६ धावाच करू शकला होता.
उभय संघांत आतापर्यंत २१ सामने झाले आहेत. त्यांपैकी हैदराबादने १२, तर राजस्थानने ९ लढती जिंकल्या आहेत. आकडेवारी हैदराबादच्या बाजूने असली तरी सध्या राजस्थान भन्नाट फॉर्मात असल्याने त्यांना हैदराबादचा संघ रोखू शकणार का, याकडे लक्ष असेल.
प्रतिस्पर्धी संघ
सनरायजर्स हैदराबाद : इशान किशन (कर्णधार), पॅट कमिन्स, ट्रेव्हिस हेड, रविचंद्रन स्मरण, सलिल अरोरा, हेनरिच क्लासेन, अनिकेत वर्मा, अभिषेक शर्मा, हर्ष दुबे, लियाम लिव्हिंगस्टोन, नितीश रेड्डी, शिवम मावी, ब्रेडन कार्स, क्रेन्स फुलेत्रा, कामिंदू मेंडिस, हर्षल पटेल, शिवांग कुमार, डेव्हिड पायने, अमित कुमार, प्रफुल हिंगे, इशान मलिंगा, साकिब हुसैन, ओमकार तरमाळे, जयदेव उनादकट, झीशान अन्सारी.
राजस्थान रॉयल्स : रियान पराग (कर्णधार), शुभम दुबे, यशस्वी जैस्वाल, लुहान प्रिटोरियस, वैभव सूर्यवंशी, अमन राव, शिम्रॉन हेटमायर, ध्रुव जुरेल, रवी सिंग, दोनोवन फरेरा, दसुन शनका, रवींद्र जडेजा, जोफ्रा आर्चर, नांद्रे बर्गर, ब्रिजेश शर्मा, तुषार देशपांडे, क्वेना मफाका, ॲडम मिल्ने, सुशांत मिश्रा, विघ्नेश पुथूर, रवी बिश्नोई, संदीप शर्मा, कुलदीप सेन, यश पुनिया, युधवीर सिंग.
वेळ : सायंकाळी ७.३० वाजता
थेट प्रक्षेपण : स्टार स्पोर्ट्स १, १ हिंदी आणि जिओहॉटस्टार ॲप