(Photo-X/@_mkverma)
क्रीडा

SA vs WI, ICC T20 WC26 : दक्षिण आफ्रिकेकडून विंडीजचा धुव्वा; भारतीय संघाला दिलासा, मार्करमच्या शानदार खेळीमुळे थाटात उपांत्य फेरीत धडक

कर्णधार एडीन मार्करमने (४६ चेंडूंत नाबाद ८२ धावा) गुरुवारी शानदार अर्धशतकी खेळी साकारली. त्यामुळे दक्षिण आफ्रिकेने सुपर-आठ फेरीत सलग दुसरा विजय नोंदवताना वेस्ट इंडिजचा ९ गडी व २३ चेंडू राखून धुव्वा उडवला.

Swapnil S

अहमदाबाद : कर्णधार एडीन मार्करमने (४६ चेंडूंत नाबाद ८२ धावा) गुरुवारी शानदार अर्धशतकी खेळी साकारली. त्यामुळे दक्षिण आफ्रिकेने सुपर-आठ फेरीत सलग दुसरा विजय नोंदवताना वेस्ट इंडिजचा ९ गडी व २३ चेंडू राखून धुव्वा उडवला. या विजयासह आफ्रिकेने थाटात उपांत्य फेरी गाठली, तसेच भारतीय चाहत्यांनाही दिलासा दिला.

अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर झालेल्या सुपर-आठ फेरीच्या पहिल्या गटातील या लढतीत विंडीजने प्रथम फलंदाजी करताना २० षटकांत ८ बाद १७६ धावांपर्यंत मजल मारली. मात्र आफ्रिकेने हे लक्ष्य १६.१ षटकांत अवघ्या एका फलंदाजाच्या मोबदल्यात गाठले. मार्करमने ७ चौकार व ४ षटकारांसह ४६ चेंडूंतच ८२ धावा फटकावताना विश्वचषकातील तिसरे अर्धशतक साकारले. त्याला क्विंटन डीकॉक (२४ चेंडूंत ४७) व रायन रिकल्टन (२८ चेंडूंत नाबाद ४५) यांची उत्तम साथ लाभली.

आफ्रिकेने सलग दुसरा विजय मिळवल्याने त्यांचे उपांत्य फेरीतील स्थान जवळपास पक्के झाले आहे. तूर्तास ते पहिल्या गटात (२ सामन्यांत ४ गुण) अग्रस्थानी आहेत. त्यांची आता झिम्बाब्वेशी रविवारी अखेरच्या साखळी लढतीत गाठ पडेल. विंडीजला मात्र पराभव पत्करावा लागल्याने त्यांना रविवारी भारताविरुद्ध विजय अनिवार्य असेल. कारण भारताने गुरुवारी रात्री झिम्बाब्वेला धूळ चारली. त्यामुळे रविवारी भारत-वेस्ट इंडिज यांच्यात होणारा सामना एकप्रकारे उपांत्यपूर्व लढत असेल.

तत्पूर्वी, विंडीजची एकवेळ बिकट अवस्था होती. कगिसो रबाडा व लुंगी एन्गिडी यांच्यापुढे ते ६ बाद ७१ असा संकटात होते. कर्णधार शाय होप (१६), शिम्रॉन हेटमायर (२), रोवमन पॉवेल (९), रॉस्टन चेस (२) यांनी निराशा केली. मात्र जेसन होल्डर (३१ चेंडूंत ४९) व रोमारिओ शेफर्ड (३७ चेंडूंत ५२) यांनी धडाकेबाज खेळ केल्यामुळे विंडीजने पावणेदोनशे धावांपलीकडे मजल मारली. मात्र तरीही त्यांचा पराभव झाला.

भारत आणि श्रीलंका येथे संयुक्तपणे टी-२० विश्वचषक क्रिकेट स्पर्धेचे आयोजन करण्यात येत आहे. ७ फेब्रुवारी ते ८ मार्च या कालावधीत रंगणाऱ्या या स्पर्धेत यंदाही गेल्या वेळेप्रमाणे २० संघ सहभागी झाले आहेत. भारत २०१६नंतर प्रथमच टी-२० विश्वचषकाचे यजमानपद भूषवत आहे. रोहितच्या नेतृत्वात २०२४मध्ये भारताने टी-२० विश्वचषक उंचावला. आता भारतापुढे जेतेपद टिकवण्याचे आव्हान असेल.

संक्षिप्त धावफलक

वेस्ट इंडिज : २० षटकांत ८ बाद १७६ (रोमारिओ शेफर्ड नाबाद ५२, जेसन होल्डर ४९; कगिसो रबाडा २/२२, लुंगी एन्गिडी ३/३०) पराभूत

वि. दक्षिण आफ्रिका : १६.१ षटकांत १ बाद १७७ (एडीन मार्करम नाबाद ८२, क्विंटन डीकॉक ४७, रायन रिकल्टन नाबाद ४५)

सामनावीर : एडीन मार्करम

महाराष्ट्रात मराठीचीच सक्ती! मुख्यमंत्र्यांचे विधानसभेत राज्यपालांच्या अभिभाषणावर उत्तर; ठाकरे बंधूंना एकत्र आणण्याचे श्रेय माझे!

निरपराधांची हत्या सहन करणार नाही! पंतप्रधान मोदींचा इस्रायली संसदेत ‘हमास’वर हल्ला

राष्ट्रवादीच्या राष्ट्रीय अध्यक्षपदी सुनेत्रा पवार; पक्षाच्या अधिवेशनात एकमताने झाली निवड

अपघात की घातपात? हाच तपासाचा उद्देश; अजित पवारांच्या दुर्घटनेबाबत CIDची माहिती; घातपात आढळल्यास गुन्हा दाखल करणार

मोदींचे इन्स्टाग्रामवर १० कोटी फॉलोअर्स; डोनाल्ड ट्रम्प त्यांच्या जवळपासही नाहीत