वैभव, यशस्वी यांच्यावर संजय मांजरेकरांचा निशाणा 
क्रीडा

वैभव, यशस्वी यांच्यावर संजय मांजरेकरांचा निशाणा

सूर्यावंशी आणि यशस्वी जैस्वाल या युवा खेळाडूंकडून झालेल्या शिस्तभंगाच्या उल्लंघनाकडे दुर्लक्ष करून या दोन्ही संस्था त्यांना अशा वर्तनाची पुनरावृत्ती करण्याचे प्रशिक्षणच देत असल्याचे मांजरेकर यांनी म्हटले आहे.

Swapnil S

मुंबई : भारताचे माजी फलंदाज संजय मांजरेकर यांनी आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषद (आयसीसी) आणि भारतीय क्रिकेट नियामक मंडळ (बीसीसीआय) यांच्यावर जोरदार टीका केली आहे. वैभव सूर्यावंशी आणि यशस्वी जैस्वाल या युवा खेळाडूंकडून झालेल्या शिस्तभंगाच्या उल्लंघनाकडे दुर्लक्ष करून या दोन्ही संस्था त्यांना अशा वर्तनाची पुनरावृत्ती करण्याचे प्रशिक्षणच देत असल्याचे मांजरेकर यांनी म्हटले आहे.

जैस्वाल आणि सूर्यावंशी हे दोघेही मैदानावर प्रतिस्पर्धी खेळाडूंशी वादात अडकले होते. यावर 'एक्स'वर पोस्ट करताना मांजरेकर म्हणाले की, जर तुम्ही अशा खेळाडूंना गैरवर्तन करूनही मोकळे सोडणार असाल, तर तुम्ही त्यांना पुन्हा तसेच वागण्याचे प्रशिक्षण देत आहात. हे खेळ आणि स्वतः खेळाडूंच्या भविष्यासाठी अत्यंत घातक असल्याचे त्यांनी नमूद केले.

कोलंबो येथील दुसऱ्या कसोटीच्या पहिल्या दिवशी यशस्वी जैस्वाल आणि श्रीलंकेचा वेगवान गोलंदाज असिथा फर्नांडो यांच्यात वादावादी झाली होती. याप्रकरणी दोघांच्याही मानधनातून २५ टक्के कपात करण्यात आली असून प्रत्येकी एक डिमेरिट पॉईंट देण्यात आला आहे. पहिल्या डावातील १७ व्या षटकात फर्नांडोने जयस्वालला बाद केल्यानंतर हा प्रकार घडला होता. दुसऱ्या दिवसाचा खेळ सुरू होण्यापूर्वी जयस्वालने आपल्या वर्तनाचा बचाव करताना, कोणी मर्यादा ओलांडली तर भारतही चोख प्रत्युत्तर देईल असे सांगितले होते.

त्याआधी जून महिन्यात १५ वर्षीय फलंदाज वैभव सूर्यावंशी 'भारत अ' आणि 'श्रीलंका अ' यांच्यातील सामन्यादरम्यान प्रतिस्पर्धी खेळाडूंशी वाद घालताना दिसला होता. सुपर ओव्हरमध्ये पराभव झाल्यानंतर सूर्यावंशी आणि श्रीलंकेच्या खेळाडूंमध्ये तणाव निर्माण झाला होता. सूर्यावंशीच्या या वर्तनावर टीका झाली असली तरी बीसीसीआयकडून त्याच्यावर कोणतीही शिस्तभंगाची कारवाई करण्यात आली नव्हती.

भारताची जपानशी सलामी

टोकियो : जपानमध्ये होणाऱ्या आशियाई क्रीडा स्पर्धेत भारतीय पुरुष क्रिकेट संघ २९ सप्टेंबरपासून आपल्या मोहिमेची सुरुवात करेल. तर दुसरीकडे, भारतीय महिला संघ १८ सप्टेंबर रोजी यजमान जपानविरुद्ध पहिला सामना खेळणार आहे. नागोयाजवळील कोरोगी पार्क येथे या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. चीनमध्ये झालेल्या मागील आवृत्तीत दोन्ही भारतीय संघांनी सुवर्णपदकावर नाव कोरले होते. त्यामुळे यंदाच्या स्पर्धेतही श्रेयस अय्यरच्या नेतृत्वाखालील पुरुष संघ आणि हरमनप्रीत कौरच्या नेतृत्वाखालील महिला संघ सुवर्णपदकाचे प्रबळ दावेदार मानले जात आहेत.

या स्पर्धेत दोन्ही भारतीय संघांना मानांकन मिळाले असून ते थेट उपांत्यपूर्व फेरीपासून आपल्या मोहिमेची सुरुवात करतील. महिलांच्या ड्रॉमध्ये भारताचा उपांत्यपूर्व फेरीतील प्रतिस्पर्धी आधीच निश्चित झाला आहे. दुसरीकडे, पुरुष संघाला उपांत्यपूर्व फेरीत 'अ' गटातील (अफगाणिस्तान, जपान आणि नेपाळ) दुसऱ्या क्रमांकावरील संघाचा सामना करावा लागेल. स्पर्धेत महिलांची अंतिम लढत २२ सप्टेंबर रोजी तर पुरुषांचा अंतिम सामना ३ ऑक्टोबर रोजी रंगणार आहे. पुरुषांच्या गटात भारत, बांगलादेश, पाकिस्तान आणि श्रीलंका या संघांना मानांकन देण्यात आले आहे. तर महिलांच्या गटात भारतासह आठ संघांना मानांकन मिळाले आहे.

(संबधित इंग्रजी बातमी वाचण्यासाठी येथे क्लिक करा.)

Mumbai : टॅक्सी, रिक्षांच्या मीटरचे फेरप्रमाणीकरण ३० नोव्हेंबरपर्यंत; १ सप्टेंबरपासून मुंबईत रिक्षा, टॅक्सींचे भाडे वाढणार

नियम तोडाल तर कारवाई होणारच; मुंढेंचा इशारा; सणासुदीत भेसळयुक्त विक्रेत्यांवर FDA ची नजर, नवी नियमावली आज करणार जारी

मोहन भागवत यांच्या कार्यक्रमाला न्यूयॉर्कचे महापौर जोहरान ममदानी यांचा विरोध

ओबीसी 'क्रिमीलेयर' निकषाबाबत १ सप्टेंबरला सुनावणी

बुलेट ट्रेनचा खर्चही सुस्साट! मुंबई-अहमदाबाद प्रकल्पाचा खर्च झाला दुप्पट; १ लाख कोटीवरून २ लाख कोटी